Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलMissile : अग्निबाण रचना

Missile : अग्निबाण रचना

कथा : प्रा. देवबा पाटील

कोणताही अग्निबाण एकदा उडवल्यानंतर तो जळून नष्ट होत असतो. तसेच या गुणित अग्निबाणाचाही वेगळा झालेला खालचा प्रत्येक अग्निबाण जळून नष्ट होत जातो. अशा शक्तिमान अग्निबाणाच्या मदतीने उपग्रह आकाशात सोडतात.

अवकाश सफरीत यक्षाच्या यानामध्ये बसून जात असताना दीपा व संदीप या बहीण भावांचे सामान्य ज्ञान बघून यक्ष खूश झाला. “तुम्हाला बरीच माहिती आहे.” यक्ष आनंदाने म्हणाला.

“पण या अवकाशात सोडण्यात येणा­ऱ्या उपग्रहांची काही विशिष्ट अशी रचना असते. ती सांगा ना.” दीपाने विचारले.

“प्रत्येक उपग्रह हा आपल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यात विशिष्ट कामे करणारे विशिष्ट विभाग असतात. उदाहरणार्थ त्यात एक उपकरण विभाग असतो. त्यात निरनिराळी उपकरणे बसवलेली असतात. एक शक्ती म्हणजे ऊर्जा पुरवठा विभाग असतो. तो यानाच्या सर्व विभागांच्या कार्यासाठी ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतो. एक नियंत्रणकक्ष असतो. एक संपर्क विभाग असतो. त्यावर मोठमेाठी तबकड्यांची एरियल्स असतात. त्याद्वारे वैज्ञानिक उपग्रहांशी संपर्क साधतात. त्यात अवकाशवीरांसाठी एक स्वतंत्र खोली असते.” यक्षाने संक्षिप्त माहिती दिली.

“आकाशात कृत्रिम उपग्रह कसे सोडतात?” संदीपनचे विचारले.

“उपग्रह आकाशात सोडण्यासाठी प्रचंड शक्तीची आवश्यकता असते. अग्निबाणामध्ये खूप जास्त शक्तीचे इंधन भरून शक्तिशाली अग्निबाण तयार करतात नि त्या अग्निबाणाच्या वरच्या टोकावर उपग्रह बसवलेला असतो. कधीकधी दोन टप्प्यांचे अग्निबाण वापरतात. पहिल्या अग्निबाणावर दुसरा बसवतात व वरच्याच्या टोकावर अवकाशयान किंवा उपग्रह बसवतात. प्रत्येक अग्निबाणाला पुरेसे इंधन असलेले त्याचे स्वतंत्र इंजिन असते. पहिला अग्निबाण उपग्रहाला आवश्यक त्या उंचीवर नेतो व त्यापासून वेगळा होऊन गळून पडतो. दुसरा अग्निबाण दिशा बदलून आडवा होतो आणि उपग्रहाला आडव्या दिशेने गती देतो. या गतीमुळेच उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार किंवा लंबगोलाकार कक्षेत फिरू लागतो. आडवी गती दिल्यानंतर दुसरा अग्निबाणही उपग्रहापासून वेगळा होतो व हळूहळू खाली येऊन वातावरणात आला की जळून जातो. ब­ऱ्याचदा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी तीन टप्प्यांच्या अग्निबाणांच्या शृंखलेचा उपयोग करतात.” यक्षाने सांगितले.

“तीन टप्प्यांचा अग्निबाण कसा असतो?” दीपाने प्रश्न केला.

“दिवाळीतील काही अग्निबाण हेही दोन टप्प्यांचे असतात हे माहीत आहे का तुम्हाला?” यक्षाने
प्रश्न केला.

“ते काही आम्हाला माहीत नाही.” दोन्हीही बहीण-भावाने उत्तर दिले.

यक्ष म्हणाला, “दिवाळीच्या अग्निबाणातील पहिला टप्पा म्हणजे आपण त्याच्या वातीला पेटविल्यानंतर तो वर उडतो व उंच जातो हा असतो. तेथे उंचावर गेल्यावर त्याच्या वरच्या कप्प्यातील शोभेच्या दारूची पावडर पेट घेते व आसमंतात चांदण्यांचा म्हणजे रंगीत चमकदार ठिणग्यांचा वर्षाव करते. हा झाला त्याचा दुसरा टप्पा. मात्र अवकाशात जाणा­ऱ्या अग्निबाणमध्ये वरच्या कप्प्यात या पेटणा­ऱ्या दारूच्या पावडरऐवजी दुसरा अग्निबाण असतो.”

“पण तीन टप्प्यांचा अग्निबाण कसा काय असतो?” संदीपने आधीचा दीपाचा प्रश्न पुन्हा विचारला.

यक्ष पुढे म्हणाला, “एकापेक्षा जास्तीचे अग्निबाणही एकावर दुसरा, दुस­ऱ्यावर तिसरा असे एकमेकांना जोडून शक्तिशाली अग्निबाणांची शृंखला तयार करतात. त्यांनाच गुणित अग्निबाण म्हणतात. ते जर तीन असले, तर त्यांना त्रिकांड अग्निबाण म्हणतात. यातील खालच्या पहिल्या मोठ्या अग्निबाणाला बत्ती लावून ठिणगी पडून त्याचा भडका उठतो आणि त्या धडाक्याने संपूर्ण त्रिकांड अग्निबाणाचे उड्डाण होते. आकाशात झेपावल्यानंतर ठरावीक कालावधीने व ठरावीक क्रमाने खालच्याचे इंधन संपण्यापूर्वीच वरील अग्निबाण एकापाठोपाठ एक पेटत जातात.”

यक्ष सांगू लागला, “या अग्निबाणांची रचना अशी केलेली असते की, प्रत्येक वेळी त्याचा वरील भाग उड्डाणधक्का घेतल्यानंतर खालील पेटत्या अग्निबाणापासून वेगळा होतो आणि त्या निरुपयोगी झालेल्या खालील भागाला मागे सोडून उरलेला अग्निबाण पुढे जात राहतो. कोणताही अग्निबाण एकदा उडवल्यानंतर तो जळून नष्ट होत असतो. तसेच या शक्तिशाली समूह वा गुणित अग्निबाणाचाही वेगळा झालेला खालचा प्रत्येक अग्निबाण जळून नष्ट होत जातो. अशा शक्तिमान अग्निबाणाच्या मदतीने उपग्रह आकाशात सोडतात.”

यक्ष पुढे सांगू लागला, “गुणित अग्निबाणाचा खालचा एक एक भाग जसजसा त्यापासून वेगळा होतो तसतसे त्याचे वजन कमी कमी होत जाते व तो अधिक जास्त वेगाने पुढे म्हणजे वर वर जाऊ लागतो. तो आकाशात एका ठरावीक उंचीवर, विशिष्ट ठिकाणी जाताच शेवटचा अग्निबाण त्याच्या टोकावरील उपग्रहाला विशिष्ट दिशेने एक जोरदार धक्का देतो. त्याबरोबर उपग्रहाची दिशा बदलते व तो पुढील पूर्वनिश्चित कार्याच्या पूर्वनियोजित प्रवासासाठी पुढे जातो. हा धक्काही टप्प्याटप्प्यानेच दिला जातो. उपग्रह आकाशात सोडल्यानंतर शेवटच्या अग्निबाणाचेही काम संपते व तो उपग्रहापासून वेगळा होतो नि आकाशातच जळून खाक होतो.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -