Sunday, May 19, 2024
Homeमहामुंबईइमारत दुर्घटनाप्रकरणी घरमालकांविरोधात गुन्हा दाखल

इमारत दुर्घटनाप्रकरणी घरमालकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी) : कुर्ला येथील नाईक नगर सोसायटीमधील डी विंग कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीमधील घरमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान बुधवारीही ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात असून बाजूच्या धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरु आहे.

नेहरू नगर पोलिस ठाणे हद्दीतील नाईक नगर को- ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई ही तळ अधिक तीन माळ्याची इमारत रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कोसळली. सदर अपघाता दरम्यान एकूण १९ रहिवाशांचा मृत्यू व १५ जण जखमी झाले आहेत. ही इमारत राहण्यास धोकादायक असल्याचे महानगरपालिका यांनी यापूर्वी घोषित केले होते. तरीदेखील घर मालक व इतर अनोळखी इसमाने भाडेकरू इसमांना राहण्यास दिली व त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाले आहेत.

यासाठी रजनी राठोड, किशोर नारायण चव्हाण, बाळकृष्ण राठोड, व इतर घर मालक तसेच दिलीप विश्वास यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कुर्ला नेहरू नगर येथील नाईक नगर सोसायटीमधील ४ इमारती १९७३ मध्ये बांधण्यात आल्या होत्या. २०१६ मध्ये या इमारतींना धोकादायक जाहिर करण्यात आले होते. इमारतीचे लाईट आणि पाणी कापण्यात आले होते.

मात्र, सोसायटीने इमारत दुरुस्त करता येऊ शकते असा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर केला. यामुळे इमारतीला धोकादायक यादीमधून वगळण्यात आले होते. ही इमारत कोसळल्याने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देणाऱ्या ऑडिटरची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -