Saturday, May 4, 2024

‘बाप’

कथा : डॉ. विजया वाड

मी निबंधाचा विषय दिला होता, ‘मी हुंडाबळी होणार नाही’ समर्थ स्त्रियांना विचारवंत करणं माझं उद्दिष्ट होतं. त्याच विषयावर कॉलेजमध्ये डिबेट रंगलं. मुलं-मुली निमिषा बोलली. तिचे विचार कुणाहीपेक्षा चमकदार होते. बोलता ती म्हणाली, “आहे कुणी माईचा लाल इथे? जो माझा हात धरेल!”

“मी तयार आहे.” एक बुटल्या म्हणाला.

“पण मी तयार नाही. वय, वजन, उंची, कसं मापात हवं!” हशा पिकला. “रँक होल्डर आहे. मुंबई विद्यापीठाचा! उंचीचं सोडा! बौद्धिक उंची बघा.”

“चलो फिर! मी जात-पात मानीत नाही.” ती म्हणाली. एक समूह शहारा! “शुभमुहूर्त!” “नो प्रॉब्लेम.” “परवानगी?” “मी सज्ञान आहे.” आणि असं ते लग्न लागलं. विवाह गाजत-वाजत तत्क्षणी हॉलमध्ये गाजबाज गाजला. दोघं आपापली नावं मेंटेन करीत बुटल्याच्या घरी गेली. आईला फोनवर कळवलं होतं. निमिषा म्हणाली, “मी प्रथा बिथा मानीत नाही.”

“मी पण.” बुटल्याची आई म्हणाली.

“बुरसटलेले रीतिरिवाज मला मंजूर नाहीत.” “मला पण.” निमिषा आईचे बोलणे ऐकून सर्द झाली. ही पन्नाशीची बाई! मला उलटा जबाब देते? मला? इगोहर्ट झाला ना!

“आपण त्या लग्न बिग्न प्रथांना फाटा देऊया.” “एका पायावर चालेल.” “माझ्याशी लग्न करशील?” बुटल्यानं धीर करून विचारलं. तो ४’- १०” अन् ही ५’-७”. “अलबत्” बुटल्या जाम खूश झाला.

“मग कधी करायचं? लग्न?” त्यानं विचारलं “आज… आता…ताबडतोब!” ती ठाशीवपणे म्हणाली. “मी तुझे आई-वडील बोलावते.” बुटल्याची आई म्हणाली. “मला कोणीही नको आहे.” “का गं?” “पण ही जमात मजपाशी नव्हती… नाही…नसेल.”

बुटल्याच्या आईला वाईट वाटलं. “मग तू कुठे आहेस? खर्च कोण करतं?” “वसतिगृहात. एक श्रीमंत ‘दयावान’ ट्रस्ट करतो माझा खर्च.” “तू ग्रेटच आहेस.” आई हेव्यानं म्हणाली.

“एक बुटल्या तुला नवरा म्हणून चालेल?” बाबा आश्चर्यानं म्हणाले.
त्यांना पारंपरिक ‘वर’ म्हणजे ‘वरचढ’ ठाऊक होते. नवरीपेक्षा नवरा उंच, अधिक शिकलेला. हा बुटल्या?

“मी परंपरा, रूढी फारसा विचार करीत नाही. हसतील त्यांचे दात दिसतील, हा माझा पक्का विचार आहे. मी बुटल्यासोबत अभिमानानं मिरवेन. नवे पायंडे पाडीन.”

आणि मित्रांनो, ते लग्न लागलं… वाजत-गाजत लागलं, मित्रमंडळींनी ॲक्सेप्ट केलं. काही बाही लोक बोलले. तोंड वाजवून गप् बसले. ४’-१०”…५’-७”चा संसार सुखेनैव चालू झाला. निमिषा एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आली. सात महिन्यांचे पोट! मी चकित… “कसं शक्य आहे?” मी मनात म्हणाले. प्रजननक्षमता कमीत कमी उंचीत असते? बुटल्याला भेटले. सरळ विचारलं. धीर करून. “उंचीचा प्रॉब्लेम नाही आला?”

“आला तर!”

“कृत्रिम गर्भधारणा केली.” “अरे!” माझा आश्चर्योद्गार.

“काय आहे सुंदरता असून, जाणूनबुजून तिने माझ्याशी विवाह केला. मी उपकृत झालो. जन्मभरासाठी! मज सुखी केले. माझी तिला वाटत होती का? बिलकुल नव्हती…

“जोडीने हिंडत फिरत होतो.” “वा!” मी कौतुकले.

“वर्षभराने मी म्हणालो, तुला आई व्हायचे नाही निमिषा?” “हो. व्हायचे आहे. मी कृत्रिम गर्भधारणा करू? शुक्रजंतूंचे इंजेक्शन घेऊ?” “घे…” मी परवानगी दिली.

“मनमोकळेपणाने दिवस राहिले. हे दुसऱ्या कुणाचे आहे? नाही ठाऊक!” “पण मॅडम, मी फार सुखी आहे. शेवटी जन्म देतो तो बाप ना? आणि खस्ता काढतो तो कोण? वाढवतो तो कोण?”

“ग्रेट आहेस. मोठ्ठा! माझ्या डोळ्याच मावत नाहीस.”

तो गोड हसला. मी डोळ्यातल्या निरांजनांनी त्याची दृष्ट काढली. खरंच मित्रांनो, बाप म्हणजे बाइज्जत पालन करतो तोच! तुम्हाला काय वाटतं? कळवा मला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -