Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीExclusive Photo : मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई

Exclusive Photo : मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी सुद्धा ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ईडीने एकाचवेळी परब यांच्या पुणे आणि मुंबईतील ७ ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

  • सर्व छायाचित्र – अरूण पाटील

परब यांच्यावर कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप असून, त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला असून, त्याअंतर्गत त्याच्या ७ ठिकाणी कारवाई सुरू आहे. ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ईडीने ही कारवाई सुरू केली.

परब यांनी जमीन खरेदीसाठी १ कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) ही कारवाई केली आहे. २०१९ मध्ये परब यांच्यावर गुन्हाही दाखल आहे. २०२० मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना १.१० कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे.

तसेच अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणातही अनिल परब यांचे नाव पुढे आले होते. अटक करण्यात आलेले मुंबई माजी पोलिस अधिकारी सचिन वाजे यांनी परब यांच्यावर अनेक आरोप केले होते. मंत्रीपदावर असताना कोट्यवधींची लाच घेतल्याचा परब यांच्यावर सर्वात मोठा आरोप आहे. बदली-पोस्टिंगमध्ये लाच घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

शिवसेना नेते परब हे यापूर्वीही ईडीच्या हिटलिस्टमध्ये होते. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणातही त्यांना समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणी परब यांना ५ हून अधिक समन्स बजावण्यात आले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता, त्यानंतर सीबीआय आणि ईडीने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलीस खात्यात बदल्यांचे रॅकेट अनिल परब यांच्यामार्फत सुरू असल्याचा संशय यंत्रणांना आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला होता. परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही झाला होता.

या प्रकरणी किरीट सोमय्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनिल परबांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. २५ कोटीचे रिसोर्ट बांधले. त्या बांधकामाचा खर्च कोणी केला? सचिन वाझेकडून १०० कोटी वसुली येत होती त्यातही अनिल परब यांचे नाव होते. उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांनी माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या नावाने बोगस एफआयआर करण्यात आला. पोलिसांना कुणाचा फोन येत होता? अनिल परबांनी बॅग भरायला घ्यावी. अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे राइट हँण्ड आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

तर या सरकारने मुंबईकर, महाराष्ट्र जनतेचा कोट्यवधीचा पैसा खाल्ला आहे. हे पैसे पुन्हा जनतेला मिळाले पाहिजे. यशवंत जाधव यांच्या डायरीत केबल मॅनला ५० लाख रुपये दिले याचाही खुलासा व्हायला हवा. नवाब मलिकांच्या बाबतीत कोर्टाने दाऊदसोबत थेट संबंध असल्याचे म्हटले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत संबंध ठेवायचे आणि जनतेचा पैसा लुबाडायचा हे सरकारचे काम आहे, असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

ईडीनं संपूर्ण माहिती घेऊन अनिल परब यांच्या ७ ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. ज्याठिकाणी धाडी टाकल्या तिथे तथ्य आढळले आहे. मलिकांच्या वेळीही सरकारने पाठराखण केली. मात्र त्यांचे दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी आढळले, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -