Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीलोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य

लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विशेष संस्थात्मक योगदान पुरस्कार

मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांचे प्रतिपादन

मुंबई : “लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो”, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन-२०२३चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर यांच्यासह मिलिंद बोकील, सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, डॉ. सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, डॉ.उज्ज्वला चक्रदेव आदी पाहुणे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे प्रसिद्धीसाठी नेहमीच अग्रेसर असते. राज्याच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालय हे निवडणूक कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राथम्याने करते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना विशेष संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मुगराजन एस. (वाशिम), रूचेश जयवंशी (हिंगोली), अशोक शिनगारे (ठाणे), डॉ.विपीन इटनकर (नागपूर), डॉ.राजेंद्र भोसले (अहमदनगर) आणि राजेश देशमुख (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन (वाशिम), दिलीप कच्छवे (हिंगोली), श्रीमती अर्चना कदम (ठाणे), श्रीमती मीनल कळसकर (नागपूर), जितेंद्र पाटील (अहमदनगर), पुण्याच्या श्रीमती आरती भोसले आणि श्रीमती मृणालिनी सावंत यांना विभागून पुरस्कार देण्यात आले.

त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारात गणेश राठोड (मेहकर, जि.बुलडाणा), धीरज मांजरे (कारंजा, जि.वाशिम), डॉ. सचिन खल्लाळ (वसमत, जि.हिंगोली), श्रीमती क्रांती डोंबे (कळमनुरी, जि.हिंगोली), राहुल मुंडके (पनवेल, जि.मुंबई उपनगर), श्रीमती वैष्णवी बीष्वा (भाप्रसे)(तुमसर, जि.भंडारा), संदीप भस्के (ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), श्रीमती ज्योती कावरे (सिन्नर, जि.नाशिक), डॉ.शशिकांत मंगरूळे (संगमनेर, जि.अहमदनगर), सुशांतकिरण बनसोडे (कागल, जि.कोल्हापूर) आणि गणेश मरकड (पलूस कडेगाव, जि.सांगली) या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, शिवडी, जत आणि कोल्हापूर उत्तर यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मतदार मित्र पुरस्कारात किन्नर मॉ ट्रस्ट व कोरो इंडिया या सामाजिक संस्थाचा गौरव करण्यात आला. निवडणुकीचे वार्तांकन करून जनजागृती करणारे लोकसत्ताचे पत्रकार निखिल अहिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी केले, तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी आभार मानले.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -