Tuesday, May 14, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सShrawan : अविरत बरसे श्रावण...

Shrawan : अविरत बरसे श्रावण…

  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

एकीकडे रिमझिमता पाऊस, दुसरीकडे सूर्याचं तेज व तिसरीकडे इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान असा निसर्गातला अनोखा त्रिवेणी संगम न्याहाळण्यात आम्ही मैत्रिणी दंग होऊन गेलो होतो.
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे…
या बालकवींच्या सुप्रसिद्ध काव्यपंक्तींचा साक्षात अनुभव देणारं हे दृश्य होतं. डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या पंचायतन मंदिराचं दर्शन घेऊन परतताना सरत्या श्रावणाची ही ओझरती झलक मनाला विलक्षण सुखावून गेली.

ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ खेळणारा व त्यात सर्वांना रमवणारा असा श्रावण मास म्हणजे निसर्गाने सृष्टीला दिलेलं हिरवं वरदानच जणू! श्रावण म्हणजे सणांचा राजा. हिरवा साज लेवून निसर्गात अलौकिक रूपांची उधळण करणाऱ्या या श्रावणाला शांताबाईंनी तर ‘साजण’ अशी लाडिक साद घातली आहे.
मन भावन हा श्रावण
प्रिय साजण हा श्रावण
भिजवी तन भिजवी मन
श्रावण प्रिय साजण
थरथरत्या अधरावर
प्रणयी संकेत नवा
ऋतू हिरवा ऋतू बरवा…

आषाढातल्या धो धो पावसाला सोनेरी किरण करांनी गोंजारून आणि प्रेमाने थोपटून शांत करणारा श्रावण सृष्टी सखीला खरंच सजणासारखाच हवाहवासा वाटत असणार, नाही का? श्रावणाची सर बरसते आणि सृष्टीतला प्रत्येक जीव शांत होतो आणि मग त्यासवे आनंदाची उधळण करणारी सणांची मालिकाही सुरू होते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी-गोपाळकाला ते बैलपोळा हे सारे सण उत्साहात साजरे होतात. याच सणांमुळे माणूस परस्परांच्या आणि निसर्गाच्याही अधिक जवळ येतो. यावेळी बऱ्याच वर्षांनी अधिक श्रावण मास आल्यामुळे आपण श्रावणाचा अधिक आनंद घेऊ शकलो.

अधिक श्रावण मासात एकीकडे जावयांचं कोडकौतुक तर दुसरीकडे सुना-मुलींच्या मंगळागौरी साजऱ्या करून त्यांचेही लाड पुरवले गेले. भाविकजनांनी श्रावणी सोमवारी धान्यमूठ अर्पण करून शिवशंकराची आराधना केली. नागपंचमीला शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या नागोबाला प्रसन्न करून श्रावणातले झुले आणि फुगड्यांचे खेळ रंगले, तर श्रीकृष्ण जन्माष्टमीला बाळ गोपाळांनी दहीहंडी आणि दहीकाल्याचा आनंद घेतला. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी सागराचं ऋण व्यक्त केलं, तर रक्षाबंधनाला भावा बहिणींची ओवाळणी पार पडली. प्रत्येक सणाला गोडधोड पक्वान्नांचा सगळ्यांनी आस्वाद घेतला. लहान-थोर सर्वांनाच आपलासं करणाऱ्या या श्रावणाची सांगता होते ती पिठोरी अमावस्येने. मुलांना चांगलं आयुष्य मिळावं, यासाठी आई पिठोरी अमावस्येला व्रत करते. या दिवशी शेतकरी बैलपोळ्याचा सणही साजरा करतात. बैलांना सजवून त्याची पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. एका अर्थाने वर्षभर त्यांनी केलेल्या कष्टातून उतराई होण्याची ही संधी असते.

सृष्टीत सुखाची करित पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला…
असं कुसुमाग्रज त्याचं स्वागत करतात, तर मंगेश पाडगावकर
पाचूच्या हिरव्या माहेरी
ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे
फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला
गगनाचा गाभारा…
अशा शब्दांत त्याचं सुंदर
वर्णन करतात.
सृष्टीतल्या सर्व जीवांना आनंद देऊन प्रत्येकाचा निरोप घेताना हा श्रावण लवकरच भाद्रपदात येणाऱ्या गणेशाच्या आगमनाची मंगल वार्ता देतो. सरता श्रावण जणू बाप्पांच्या स्वागतासाठी सारी सृष्टी सजवून ठेवतो. सरला तरी तोच आनंद, उत्साह, प्रसन्नता व जल्लोष वर्षभर आपल्या मनात आणि जीवनात सुख-दुःखाच्या थेंबक्षणांना झेलत श्रावण अविरतपणे बरसत राहतो.
जणू तो आपल्याच मनाला समजावत असतो :
“दाटूनी आला कृष्ण मेघ उरी
नयनी श्रावण सरी बरसती
हळूच लपुनी सूर्य पाहतो
इंद्रधनू ते क्षितिजावरती!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -