Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीKishori Pednekar : कोविड डेड बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी...

Kishori Pednekar : कोविड डेड बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स

पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना कोविड डेड बॉडी बॅग्ज घोटाळाप्रकरणी (Covid dead body bag scam) अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने समन्स बजावले आहे. त्यांच्याविरोधात कोरोना महामारी काळात झालेल्या मृत्यूंच्या बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

ईडीचा दावा आहे की, एक कंपनी जी बॉडी बॅग दुसऱ्या कंपनीला २००० रुपयांना देत होती. तिच कंपनी मुंबई महापालिकेला तब्बल ६,८०० रुपयांना विकत होती. या कंपनीसोबत देण्यात आलेले टेंडर तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सहीने दिले जात होते. पेडणेकर या सध्या ठाकरे गटाच्या नेत्या आहेत.

कोविड डेड बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात मुंबई पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पालिकेचे केंद्रीय खरेदी विभागाचे (CPD) माजी उपायुक्त रमाकांत बिरादार यांना मृत कोविड-१९ रूग्णांसाठी बॉडी बॅग खरेदी करताना झालेल्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समन्स धाडले होते. त्यानुसार ते चौकशीला सामोरेही गेले होते.

आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर आणि बीएमसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि १२० (बी) (गुन्हेगारी कट) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी हे प्रकरण खोटे असून त्यात आपणास मुद्दाम गोवले असल्याचे म्हटले आहे. त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने दबाव टाकण्याच्या हेतूने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -