Share

ऊर्मिला राजोपाध्ये

प्रदीर्घ काळानंतर काहीशा सैलावलेल्या आणि तणावरहीत मनोवस्थेत साजरी होत असणारी यंदाची विजयादशमी विजयाचा नवा अर्थ पटवून देणारी आहेच, त्याचबरोबर ज्याच्यावर विजय मिळवायचा त्या शत्रूचं आणि शस्त्रांचं बदलतं स्वरूपही दाखवून देणारी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शस्त्रपूजन, दैवतांचं स्तवन, सणांचा उल्हास आणि सायंकाळी होणारं रावणप्रतिमेचं दहन हे कार्यक्रम पार पडतील. पण हे सगळं करतानाची मानसिकता यंदा अनेक अर्थांनी वेगळी आहे, याबाबत शंका नाही. खरं तर, गेल्या दीड-पावणेदोन वर्षांच्या कालखंडाने प्रत्येकाला व्यक्तिगत अवकाशापासून जागतिक अवकाशापर्यंत अशा काही आंदोलनांमध्ये फिरवलं आहे की, आता प्रत्येकाच्या जाणिवा, समज, धारणा अधिक टोकदार झाल्या आहेत. मनामनात युद्धाची नवी परिभाषा तयार झाली आहे. आता प्रत्येकाच्या मनात विजयाचा नवा अर्थ जागृत झाला आहे. गेले अनेक महिने घराच्या उंबरठ्यात खिळलेल्या लोकांच्या मनातल्या सीमोल्लंघनाच्या व्याख्येलाही नवे आयाम जोडले गेले आहेत. म्हणूनच एकीकडे भयव्याकुळता कमी होत असताना दुसरीकडे जागतिक पातळीवर सत्ताधीशांचे चेहरेमोहरे आणि त्या अनुषंगाने वैश्विक राजकारणाचा चेहरामोहरा बदलत असताना साजऱ्या होणाऱ्या दसऱ्याचे संदर्भ बहुआयामी आणि बहुपेडी नसतील तरच नवल.

धार्मिकतेबरोबरच महत्त्वाचं अंग असणारं शस्त्रपूजन ही दसऱ्याची प्रमुख ओळख आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नुकतीच झालेली चकमक, चीनकडून सीमेलगतच्या भागामध्ये नव्याने केली गेलेली दंडेली, अफगाणिस्तानमधील तालिबानी अत्याचाराची घेतली जाणारी दखल आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत असताना या सर्व जागतिक परिस्थितीचा अंदाज घेत सुरू असणारी देशाची शस्त्रसज्जता, हे सगळेच विषय दसऱ्याच्या निमित्ताने ठळकपणे समोर येणारे आहेत. सध्या युद्धाचं स्वरूप बदलत आहे. योद्ध्यांच्या बदलत्या वार-पलटवाराचं नवं तंत्र प्रत्ययाला येत आहे. बदलत्या जागतिक समीकरणामुळे मित्र आणि शत्रू ओळखण्यासाठी जास्त ताकद पणाला लावावी लागत आहे. या सगळ्याचं भान राज्यकर्त्यांना आहे, तसंच ते सर्वसामान्य जनतेलाही आहे. म्हणूनच या विस्तारलेल्या जाणिवांनिशी, आपल्या माणसांच्या गमावलेल्या अतीव दु:खानिशी, राखेतून भरारी घेण्याच्या जिद्दीनिशी सामोरं जात साजरा होणारा हा उत्सव अनोखा म्हणायला हवा.

शस्त्रसज्जता, शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघन ही क्षात्रिय कर्म दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पार पडायची आणि साम्राज्यविस्तार करून पुरुषार्थ गाजवणाऱ्या नरवीरांच्या पराक्रमांचे पोवाडे ऐकायला मिळतात. देश एकसंध झाला, रयत आणि राजा हा भेद संपला, देशाची सार्वभौम लष्करशक्ती निर्माण झाली, पारंपरिक शस्त्रं कालबाह्य होऊन युद्धाच्या प्रगत पद्धतीनुरूप नव्याने शस्त्रसज्जता साधली आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. दसऱ्याचा संदर्भ घेऊन या शस्त्रसज्जतेकडे बघायचं झाल्यास या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे हे सहज लक्षात येईल.

शस्त्रधारींचं धाडस, मनोनिश्चय, शारीरिक आणि मानसिक शक्ती, साहस यामुळे युद्ध जिंकता येतं. आपल्याकडे ते आहेच, त्याचबरोबर देशातल्या क्षात्रतेजाला अस्सल देशप्रेमाचं कोंदणही आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार अशा आजूबाजूंच्या देशांकडे पाहिलं असता अनेक देशांमध्ये लष्करी हस्तक्षेपाने सत्ता परिवर्तन घडलेलं दिसतं. या देशांमध्ये वेळोवेळी सैन्याने क्रांती केलेली दिसते. भारतात मात्र ही बाब पाहायला मिळत नाही, कारण भारताची संरक्षण व्यवस्था सक्षम आहे. ही ढाल मजबूत असल्यामुळेच स्वातंत्र्यानंतर आक्रमणं झाली तरी, भारत अभंग राहिला. दुसरीकडे, संरक्षणशक्तीला भारतीय भक्तीचंही भान आहे. देशभक्तीने भारलेलं असं अंत:करण असल्यामुळेच भारतीय सैन्याने कधी क्रांती केली नाही. सैन्यशक्ती प्रबळ झाली, तर देशामध्ये सत्ता परिवर्तनाची भीती असते, पण आपल्याकडे असं होऊ शकत नाही. कारण आपल्या सैनिकांच्या मनामध्ये भारतीयत्व भिनलं आहे. संस्कृतीकडून मिळालेलं हे एक संचित आहे.

आपण शस्त्रसज्ज आहोतच; त्याचबरोबर शत्रूला सीमापार येऊ न देण्याचं सामर्थ्यही आपल्यामध्ये आहे. १९६२चं युद्ध सोडलं तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत १९६५, १९७१ ही युद्धं तसंच कारगील युद्धामध्ये, ईशान्य भारतामध्ये किंवा अलीकडच्या गलवान संघर्षामध्ये बंदुकीच्या बळावर कोणीही भारताचा इंचभर भूभागही बळकावलेला नाही, हे देखील भारताचं उल्लेखनीय यश म्हणावं लागेल. आज ईशान्य भारतामध्ये छुपं युद्ध सुरू आहे. तिथे भारतापासून वेगळं होण्याची मागणी होत आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम असे भूभाग ही मागणी लावून धरत आहेत, पण त्या क्षेत्रात अद्याप एकही इंच जमीन बाहेर गेलेली नाही. याचा अर्थ भारतीय जनमानस विभाजनाला संमती देणार नाही. या जनमानसाचा संपूर्ण पाठिंबा सैन्यशक्तीच्या पाठीशी एकवटला आहे. म्हणूनच आपण जिंकत आहोत. हीच बाब काश्मीरमध्ये लागू होते. पाकिस्तानने १९४७पासून आपल्या देशात अस्थिरता माजवण्याचे अनेक प्रयत्न केले. देशात दहशतवाद पसरवला पण भारतीय संरक्षण व्यवस्थेने काश्मीरची एक इंच जमीनही बाहेर जाऊ दिली नाही. सीमारक्षणाचं हे महत्त्वही खूप मोठं आहे.

भारतीय लष्कर जगातलं एक सशक्त लष्कर आहे. आज जगातल्या १२ ते १५ देशांमध्ये भारतीय सैन्य काम करतं. ते या देशांमध्ये शांतीव्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. अर्थात, असं असलं तरी लष्कराला सतत सतर्क राहावं लागतं, हेदेखील वास्तव आहे. आपल्या शेजारी दोन मोठे शत्रू आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोन शत्रूंचा भारताच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने भारतावर आक्रमण, आघात करत असतात. या व्यतिरिक्त भारतातदेखील अनेक अस्तनीतले निखारे आहेत. बाहेरच्या शक्तींप्रमाणेच हा अंतर्गत धोकादेखील भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो. या धोक्यापासून सावध राहण्याची गरज शस्त्रसज्जतेमुळेच पूर्ण होईल. भारतीय लष्करापुढे आव्हानांची मालिका आहे असंही आपण म्हणू शकतो. पाकिस्तानच्या संघर्षामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर असू, असं चीन म्हणतंय, तर आम्ही चीनला साह्य करू, असं पाकिस्तानचे अधिकारी स्पष्ट करतात. म्हणजेच आजही ते एकत्र काम करत आहेत. युद्ध झालंच तर पाकिस्तान चीनच्या बाजूने आहे. सध्या भारतीय लष्करापुढे या विखारी मानसिकतेला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान आहे.

पूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन होत असे. आता मात्र यासाठी एक ठरावीक मुहूर्त ठरवता येत नाही. धोका जाणवला की, तो थोपवण्यासाठी धावणं आणि गरज पडली तर सीमोल्लंघन करून शत्रूचा नि:पात करणं ही आजची युद्धनिती आहे. भविष्यात युद्ध झालं, तर ते पर्वतीय क्षेत्रात असणार आहे. कारण भारताची युद्धात्मक क्षेत्रं डोंगराळ भागात आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर असो, लेह-लडाख असो, अरुणाचल असो, डोकलाम असो हे सर्व भाग डोंगराळ असल्याने तंत्रज्ञानाचा वापर करून युद्ध खेळण्यासारखी परिस्थिती नाही. पहाडांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युद्ध करण्याची क्षमता कमी होते. तिथे सैन्यबळ सशक्त असायला हवं. म्हणूनच दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्रनिर्मितीमध्ये आपण प्रगतीचे नवे टप्पे गाठण्याचा संकल्प करायला हवा. भारताने सर्व प्रकारच्या संरक्षण सामग्रीमध्ये स्वावलंबी होणं ही काळाची गरज आहे. देशाला तंत्रज्ञानसिद्ध बनवायचं असेल, तर संशोधन क्षेत्रामध्येदेखील सातत्यपूर्वक काम करायला हवं.

Recent Posts

Salman Khan Firing case : सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या अनुज थापरची आत्महत्या नव्हे तर हत्या?

कुटुंबियांच्या दाव्याने उडाली खळबळ मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ १४ एप्रिल…

28 seconds ago

नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह आज रत्नागिरीत

जवाहर मैदानावर दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच…

7 hours ago

नाशिकमध्ये महायुती करणार आज शक्तीप्रदर्शन

डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक…

8 hours ago

मराठी पाट्या लावण्यासाठी सक्ती का करावी लागते?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची १९६० साली निर्मिती झाली. मुंबई टिकविण्यासाठी मराठी माणसांनी रक्त सांडले. वर्षामागून वर्षे…

9 hours ago

कामगारांना सुरक्षित वातावरण हवे

आशय अभ्यंकर, प्रख्यात अभ्यासक देश जागतिक पातळीवर विकासाच्या नवनवीन पायऱ्या पार करत असताना कामगारांची उत्तम…

10 hours ago

‘मॉरिशस रूट’ टाळण्यासाठी…

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार भारतातून मॉरिशसला निधी पाठवायचा, तेथे कंपनी स्थापन करायची आणि मग तो पैसा…

10 hours ago