Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणअवकाळीमुळे ‘हापूस’वर अवकळा

अवकाळीमुळे ‘हापूस’वर अवकळा

सतत मोहोर गळल्याने उत्पादन घटले; देशातील अनेक भागांत खवय्यांची पंचाईत

नवी मुंबई (वार्ताहर) : कोकणात यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून गेल्या सहा वर्षांत यंदाचे वर्ष हे सर्वांत कमी उत्पादनाचे ठरले आहे. हवामान बदल, तापमानात कमालीची वाढ, अवकाळी अतिवृष्टी, ढगाळ वातावरण यामुळे यावर्षी कोकणात दोन ते तीन वेळा मोहोर गळून गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळधारण न होणे, मोहोर संवर्धानात अडथळा आणि वातावरणात झालेल्या बदलांमुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने या सर्वांचा परिणाम आंब्याचे विशेषत: हापूस आंब्याचे उत्पादन घटण्यावर झाला आहे. परिणामी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे.

हापूसचा प्रवास हा मार्च, एप्रिलमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी असा सुरू होतो. तर महाड, म्हसळे, श्रीवर्धन, माणंगाव या तालुक्यांच्या तुलनेने यंदा अधिक प्रमाणात रोहा, मुरुड व अलिबाग तालुक्यात आंब्याचे उत्पादन जास्त आहे. पाली, सुधागड, पेण, कर्जत, खालापूर या तालुक्यांतही मागील काही वर्षांपासून हापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत
केले आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यात समुद्रातील खाऱ्या हवामानामुळे श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग तालुक्यांत हवामान पोषक आहे. मात्र हेच तालुके यावेळी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्रबिंदू होते. त्यामुळे हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात फळे देणारी मोठमोठी झाडे तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने धारातिर्थी पडली. तर, अनेक झाडे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. झाडे कमी आणि झाडांवर आंबे कमी असे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला मिळालेले अल्प उत्पादन विक्रीयोग्य करण्यासाठी प्रचंड खर्च आला आहे आणि प्रत्यक्षात हाती येणारा नफा हा अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी राज्य फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली आहे.

शिल्लक आंबा वाचवण्याची धडपड…
चांगल्या प्रतीचा आंबा मॉल किंवा ऑनलाइन कृषी माल पुरवणाऱ्या कंपन्यांकडे जातो. तर, १० ते १५ टक्के आंबा निर्यातीसाठी जातो. अर्ध्याहून अधिक आंबा हा एपीएमसीमध्ये घाऊक विक्रीसाठी जातो. यावर्षी मात्र सगळीकडे शांतता आहे. हापूस उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या बागांमध्येच आंबाच नाही. तशातच अवकाळीची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना शिल्लक आंबा वाचविण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -