Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रवणीत स्मशानभूमी अभावी मृत्यूनंतरही मृताची अंत्यसंस्कारासाठी ससेहोलपट

वणीत स्मशानभूमी अभावी मृत्यूनंतरही मृताची अंत्यसंस्कारासाठी ससेहोलपट

भर पावसात रस्त्यावरच अंत्य संस्काराची वेळ, लाकडे ओली असल्याने घ्यावा लागला डिझेलचा आधार

वणी (प्रतिनिधी) : सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या व वणी बाजूकडून गडावर (रडतोंडी पायरी मार्ग) जाणाऱ्या मार्गावर असलेल्या चंडीकापूर गावात स्मशान भूमीच नसल्याने ग्रामस्थांना भर पावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. यामुळे मृत आत्म्याच्या वेदना मृत्यूनंतरही संपत नसल्याचा व पार्थिवाची ससेहोलपट होत असल्याचा प्रत्यय आला. पार्थिवाचे हाल होत असल्याचे विदारक चित्र बघून शोकाकुल नातेवाइक व ग्रामस्थ अधिकच गहीवरले.

सप्तशृंगी गड, चंडीकापूर परीसरात गेल्या चार- पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून अशातच चंडीकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळू जोपळे यांच्या सुन सविता मंगेश जोपळे (वय २२) यांचे रविवारी, ता. १८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास चंडीकापूर येथे अंत्यविधी करण्याचे ठरले होते. चंडीकापूर येथे नोंदणीकृत स्मशान भूमी व शेड नसल्याने पूर्व परंपरेनूसार बारव ओहाळाच्या किनारी असलेल्या मोकळ्या परिसरात अंत्यविधी करण्याची तयारी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली होती. त्यासाठी अत्यंसंस्कारासाठी सरणही रचले. याच वेळी सप्तशृंगी गड व परीसरात जोरदार पाऊस आल्याने बारव ओहाळाला पूर येवू लागल्याने ओहळाच्या किनारी रचलेले सरण वाहून जावू नये म्हणून नातेवाईक व ग्रामस्थांनी धावपळ करीत रस्त्यावर आणले.

ओहळाला आलेला पूर व सुरु असलेला पाऊस यामूळे अत्यंविधीसाठी दुसरी जागा नसल्याने चंडीकापूर – भातोडे रस्त्यावरीस बारव ओहाळाच्या पुलावर रस्त्याच्या बाजूला अत्यंविधी करण्याचा निर्णय घेवून भर पावसात पुन्हा एकदा सरण रचून पार्थिवावर छत्रीचा आडोसा करुन अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी पाऊसामूळे चरणाची लाकडे ओले झाल्याने डिझेलचा वापर अधिक प्रमाणात करावा लागला.

मृत्यूनंतर शेवटच्या क्षणी भर पावसात मृत व्यक्तीवर अंत्यंसंस्कार होतांना पार्थिवाचे होत असलेल्या हालाचे विदारक चित्राने नातेवाईकामंध्ये संताप व्यक्त होता. चंडीकापूर येथे स्मशानभूमी नसल्याने वर्षानुवर्षे मुख्य चंडीकापूर – भातोडे रस्त्यावर बारव ओहळाच्या किनारी असलेल्या खाजगी मालकीच्या जागेत पूर्वापार पासून अंत्यविधी केले जात आहेत. सदर जागेत स्मशानभूमी व शेडसाठी जागा ग्रामपंचायतीची जागा नसल्याने व जमिन मालकाचा विरोध असल्याने पावसाळ्यात अंत्यविधी करताना ग्रामस्थांना मोठ्या हलाखीला तोंड द्यावे लागत आहे.

शेकडो वर्षांपासून परंपरेनूसार सदर जागेत ग्रामस्थ अंत्यसंस्कार करीत आहे. सदर जागेवर ग्रामस्थांच्या भावना असल्याने त्या जागेवरच स्मशानभूमीसाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी चंडीकापूरच्या सरपंच नंदा कुवर, दिंडोरी बाजार समितीचे संचालक पंडीत बहिरम, प्रकाश मोंढे, हरी गांगोडे, जयराम पालवी, धनराज कुवर आदींनी केली आहे.

चंडीकापूर येथे स्मशानभूमी नसल्याने पणजोबा आजोबांपासून बारव नाल्यालगतच्या जागेत अंत्यसंस्कार विधी केला जात आहे. सदरच्या जागेवरच स्मशानभूमी असावी अशी ग्रामस्थांची भावना असून याबाबत ग्रामपंचायतीचा ठरावही प्रशासनास दिला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. -निवृत्ती मोंढे, ग्रामपंचायत सदस्य, चंडीकापूर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -