Sunday, May 19, 2024

Dnyaneshwari : प्रज्ञाकांत

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्ञान देणं मौलिक! याचा दाखला देताना माऊली अशा दिव्य ज्ञानासाठी आतुर अर्जुन हा जणू नवरा मुलगा, असा उल्लेख करतात. म्हणून श्रीकृष्णांनी त्याला हे ज्ञानभांडार दिलं. म्हणजे आपली वक्तृत्वरूपी कन्या उजवली. यासाठी अर्जुनाचा उल्लेख येतो ‘प्रज्ञाकांत’ म्हणून. प्रज्ञा (म्हणजे इथे आत्मज्ञान) या कन्येचा (नवरा) कांत, म्हणून तो ‘प्रज्ञाकांत’!

संवादसुखाचं सर्वोच्च स्थान म्हणजे ग्रंथ ज्ञानेश्वरी होय. श्रीकृष्ण-अर्जुन संवादाचं सुंदर चित्र गीतेत महामुनी व्यासांनी रेखाटलं. त्यात रंग भरून ज्ञानदेवांनी लिहिली ‘ज्ञानेश्वरी’! त्यांच्या वाणीने ती रसमय झाली आहे. याचा अनुभव देणाऱ्या चौदाव्या अध्यायातील रसाळ ओव्या आज पाहूया.

अध्यायाच्या आरंभी नेहमीप्रमाणे माऊलींनी केलेलं गुरुवंदन येतं. हे वंदन अर्थात अपार आदराने भरलेलं! त्यानंतर येणारा भाग आत्मज्ञानाचं महत्त्व सांगणारा!

‘याप्रमाणे पार्थालाही आत्मज्ञानाची आवड व्हावी, म्हणून श्रीकृष्णांनी त्याची प्रौढी वर्णन केली.’ ओवी क्र. ६०
‘तो अर्जुनाची अशी स्थिती झाली की, त्याला सर्व अवयवांच्या ठिकाणी श्रवणाची इच्छा उत्पन्न होऊन, तो अवधानाची केवळ मूर्तीच बनला.’
ती अप्रतिम ओवी अशी –
‘तंव तया जाले आन।
सर्वांगी निघाले कान।
सपाई अवधान। आतला पां॥

ओवी क्र. ६१
‘सपाई’ या शब्दाचा अर्थ ‘संपूर्ण’, तर ‘आतला’ म्हणजे ‘नटला’. (मूर्तीच बनला).
किती उत्कट ओवी आहे ही! यातून श्रीकृष्णांची ज्ञान देण्याची शक्ती उमगते. तसेच अर्जुनाची हे ज्ञान घेण्याची आतुरता कळते. आता पुढची ओवी – ‘आपले सांगणे आकाशासही आवरले जाणार नाही, ते अर्जुन धारण करतो आहे, असे पाहून देवांनाही प्रेमाचे भरते आले.’

ओवी क्र. ६२
श्रीकृष्ण-अर्जुन या गुरू-शिष्यांतील किती हा जिव्हाळा! अर्जुनावरच्या प्रेमाने देवांना उचंबळून येतं. याचं कारण काय? तर अतिशय अवघड असं हे श्रेष्ठ ज्ञान! माऊलींनी त्यासाठी कोणती उपमा दिली आहे? आकाशालासुद्धा आवरलं जाणार नाही असं सांगणं (असं ज्ञान). या ज्ञानाचा अफाट आवाका यातून कळतो. हे असं सांगणं अर्जुनाने आतुरतेनं ऐकावं. त्यामुळे देवांना प्रेमाचं भरतं यावं! यानंतरची ओवी अशीच भावपूर्ण!

‘मग भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या वक्तृत्वरूपी कन्येस तू बुद्धिरूप वर मिळाल्यामुळे ती आज उजवली. कारण माझ्या बोलण्याच्या हौसेप्रमाणे तू उत्तम श्रोता मिळालास.’
‘मग म्हणे गा प्रज्ञाकांता।
उजवली आजि वक्तृत्वता।
जे बोलायेवढा श्रोता।
जोडलासी॥’ ओवी क्र. ६३

आता बघा, अर्जुनाला उद्देशून माऊलींनी कोणतं संबोधन योजलं आहे? ‘प्रज्ञाकांत!’ किती अर्थपूर्ण! या ओवीत वर्णिलं आहे वक्ता-श्रोता हे नातं. त्यासाठी दाखला कोणता दिला? कन्या आणि वर यांचा अगदी हृदयस्पर्शी दृष्टान्त! प्रत्येक पित्याला वाटतं आपल्या मुलीला अनुरूप वर मिळावा. असा वर मिळाला की विवाह ठरतो. इथे श्रीकृष्णांकडे असलेलं दिव्य ज्ञान कथन करणं हे जणू त्यांची कन्या. पित्यासाठी कन्या ही आवडती. ती वराला देणं हे महत्त्वाचं. तसं हे ज्ञान देणं मौलिक! हे यातून सुचवलं आहे. अशा दिव्य ज्ञानासाठी आतुर अर्जुन हा जणू नवरा मुलगा. म्हणून श्रीकृष्णांनी त्याला हे ज्ञानभांडार दिलं. म्हणजे आपली वक्तृत्वरूपी कन्या उजवली. यासाठी अर्जुनाचा उल्लेख येतो ‘प्रज्ञाकांत’ म्हणून. प्रज्ञा (म्हणजे इथे आत्मज्ञान) या कन्येचा (नवरा) कांत, म्हणून तो ‘प्रज्ञाकांत’!

यात अजून एक बहार आहे, अर्थ आहे कन्या-वर यांचं मिलन होतं, त्यातून ते अधिक संपन्न होतात. त्याप्रमाणे अर्जुन हा या श्रवणाशी जणू एकरूप झाला. किती एकरूप! तर आधी म्हटल्याप्रमाणे ‘त्याच्या सर्वांगाचे कान झाले’. त्यातून त्याच्या ठिकाणी ही ज्ञानसंपन्नता आली.

आज आपण पाहिलेल्या माऊलींच्या या अवीट ओव्या! त्या श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यातील प्रेम रंगवतात. त्याचबरोबर वक्ता-श्रोता यांचं उत्कट नातं रेखाटतात. ते ऐकताना मग आपली, श्रोत्यांची अवस्था कशी होते? तर अर्जुनाप्रमाणे, ‘सर्वांगी निघाले कान’…
manisharaorane196@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -