Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीDnyaneshwari : ऐका ‘अभ्यासा’ची युक्ती!

Dnyaneshwari : ऐका ‘अभ्यासा’ची युक्ती!

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

‘अभ्यासाने विषसुद्धा पचनी पडते, समुद्रावरही पायवाट होते.’ असा परमेश्वर-प्राप्तीसाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला ‘अभ्यासयोग’ आपल्या सहजसुंदर पद्धतीने मांडताना,
अभ्यासाचे महत्त्व सांगणारे दाखले ज्ञानदेव देतात.

श्रीकृष्ण हे महान गुरू! आपल्या आवडत्या अर्जुनाला ते ज्ञान देतात; पण कसं? तर अगदी टप्प्याटप्प्याने, पायरीपायरीने, सोपं करून! महामुनी व्यासांनी ते ज्ञान भगवद्गीतेत सहज वाटावं अशा तऱ्हेने सातशे श्लोकांमध्ये मांडलं.

ज्ञानदेव ते ज्ञान आपणा सर्वांना मराठीतून देतात. त्यात सोपेपणा आहेच, शिवाय त्यांची रसवंती भाषा आहे, म्हणून दाखले देऊन, चित्र साकारून ते सगळ्यांच्या बुद्धीत, हृदयात उतरतं. याचा अनुभव देणाऱ्या काही ओव्या आज पाहूया. बाराव्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे. “देवाची प्राप्ती करून घेण्याचे दोन मार्ग आहेत – ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग. त्यांपैकी कोणाला खरा योग समजला ते सांगा.”

यावर श्रीकृष्ण काय उत्तर देतात? “माझ्या ठिकाणी चित्त अर्पण केलेल्या भक्तांचा मी लवकर उद्धार करतो. म्हणून तू माझ्या ठिकाणी तुझे चित्त स्थिर कर.” श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश ज्ञानदेव, त्यापुढे कसा नेतात ते पाहा.

“जर तू तुझं मन, बुद्धी अर्पण करण्यास समर्थ नसशील, तर असे कर की, या आठ प्रहरांमध्ये एक क्षणभर तरी मन व बुद्धी यांना माझ्याकडे लाव. जितका वेळ ते माझ्यामध्ये असेल तितका वेळ त्याला विषयवासना याविषयी नावड उत्पन्न होईल.”

ज्ञानदेव किती अचूक ओळखतात माणसाचं मन! मन हे अतिशय चंचल, ओढाळ. ते देवाकडे लागावं ही आदर्श स्थिती आहे. पण हे एकदम घडणार नाही. म्हणून अर्जुनाला उपदेश येतो “एक क्षणभर तरी मन ईश्वराकडे लाव.” इथे शिष्याचं मन समजून उपदेश करणारे श्रीकृष्ण आपल्यापुढे साकारतात.

पण ही शिकवण सांगून ज्ञानदेवांची प्रतिभा थांबत नाही. हा विचार स्पष्ट करण्यासाठी ते सहज सुंदर दाखल्यांची मालिका देतात.

“अरे, ज्याप्रमाणे शरदऋतू सुरू झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे जसजसे माझ्या ठिकाणी तुझे चित्त गुंगेल, तसतसे ते प्रपंचातून बाहेर निघेल.” (ओवी क्र. १०७)

किंवा “ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसेंदिवस कमी होत जाऊन अमावस्येला नाहीसे होते (ओवी क्र. १०८) त्याप्रमाणे ते चित्त हळूहळू विषयवासनांतून निघून माझ्या ठिकाणी लागत शेवटी माझ्यात मिळून जाईल.” (ओवी क्र. १०९)

किती साजेसे दृष्टान्त आहेत हे! वर्षाऋतूत ज्या नद्या ओसंडून वाहतात, त्याच नद्यांचे पाणी शरद ऋतूत हळूहळू कमी होत जाते. पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दिसतो. पौर्णिमेपासून पुढे चंद्रबिंब थोडे थोडे कमी होत शेवटी अमावस्येला नाहीसे होते. इथे कळतं की, निसर्गात हे टप्पे आहेत. मनाचंही असंच आहे. ते एकदम ईश्वराशी एकरूप होणार नाही. हळूहळू होत जाणारी ही क्रिया, मनाचा धर्म ज्ञानदेव अचूक जाणतात म्हणून जबरदस्ती न करण्यास सांगतात. निसर्गातील कोणतीही घटना सावकाश एका क्रमाने होत जाते. तोच मनाचाही गुणधर्म आहे. म्हणून ‘मनाला फक्त एक क्षण तरी माझ्याकडे लाव.’ ही अभ्यासाची सुरुवात आहे. पुढे ते अर्जुनाला म्हणतात,
‘अगा अभ्यासुयोगु म्हणिजे। तो हा एकु जाणिजे।
येणे कांही न निपजे। ऐसे नाही॥ ओवी क्र. ११०

“अरे, अभ्यासयोग ज्याला म्हणतात, तो हाच, असे पक्के समज. यापासून प्राप्त होणार नाही, अशी कोणतीही वस्तू नाही!” ‘अभ्यासाने विषसुद्धा पचनी पडते, समुद्रावरही पायवाट होते.’ असे अभ्यासाचे महत्त्व सांगणारे दाखले ज्ञानदेव मांडतात. परमेश्वर-प्राप्तीसाठी श्रीकृष्णांनी सांगितलेला हा अभ्यासयोग आपल्या अशा सहजसुंदर पद्धतीने सांगतात.

हा अभ्यासयोग सर्व काळात, सर्व ठिकाणी उपयोगी पडणारा आहे. आज खूप सुधारणा झाल्या आहेत. माणूस चंद्रावर यान घेऊन गेला. पण मन कसं आवरावं त्याला समजत नाही. म्हणून सर्वांनी आजही हा अभ्यासयोग आचरावा, जीवनाला आकार द्यावा… श्रीगुरूंना प्रणाम करावा…

(manisharaorane196@gmail.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -