Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखDiwali : सुखाची, आनंदाची दिवाळी...

Diwali : सुखाची, आनंदाची दिवाळी…

  • डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभ्यासक

रोजच्या जगण्यातला तोचतोचपणा दूर करणारे, उत्साह आणि आनंदाचे वारे प्रवाहित करणारे, आध्यात्मिक तसेच आत्मिक आणि कौटुंबिक आनंद देणारे सण म्हणजे जणू जीविताशी जोडल्या गेलेल्या धमन्या असतात. म्हणूनच सणवारांशिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही. सणांच्या निमित्ताने सर्व क्षेत्रांमध्ये बघायला मिळणारी विविध स्वरूपाची तेजी आणि वैयक्तिक तसेच सामाजिक पातळीवर होणारी भावनात्मक आणि वैचारिक घुसळण जगण्याची नवनवीन व्याख्या सांगून जाते. अगदी खरेदीपासून सजण्या-धजण्यापर्यंत प्रत्येक अंगाने साजरे होणारे प्रत्येक उत्सवपर्व जगण्याच्या मिती अधिक परिपूर्ण, संपन्न करून टाकते. अशात दिवाळीची महती काय वर्णावी? ही तो दिव्यांची आवली…! लाखो दिवे प्रज्वलित करून तमाचे अस्तित्व शून्य करण्यासाठी अवतरलेले हे मंगलमयी दिवस म्हणजे जणू आनंदाचे कुंभच… असे असताना सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावाने भरलेल्या दिवसांमध्ये तर या सणाचे महत्त्व शतपटीने वाढल्यासारखे वाटणे अगदी स्वाभाविक आहे, कारण सध्या संत्रस्त करणाऱ्या नानाविध घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. जागतिक पातळीपासून अगदी शेजारच्या नाक्यापर्यंत पसरलेली त्यांची व्याप्ती या ना त्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचून उपद्रवमूल्य दाखवून देत आहे. रशिया-युक्रेनमधील लांबलेले युद्ध असो वा अलीकडचा इस्त्रायल-हमासमधील चिघळणारा संघर्ष… या युद्धजन्य परिस्थितीच्या सावटाखालून संपूर्ण जगासवे आपलीही होरपळ होणे अटळ आहे. या आणि अशाच काही घटनांमुळे विश्वयुद्धाइतकी भयानकता अनुभवत असताना आपण त्यापासून वगळले जाणे शक्य नाही. म्हणूनच यंदाची भयाच्या सावटाखालील दिवाळी साजरी करत असताना होरपळीचे प्रत्यक्ष चटके सहन करणाऱ्या सगळ्यांच्या दु:खाची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे सर्वप्रथम इथे नमूद करावेसे वाटते. शेवटी आपली संस्कृती समस्त जगताचे हित आणि सुख चिंतणारी आहे. आपण केवळ स्वत:चाच नव्हे तर इतरांचाही विचार करतो. म्हणूनच संस्कृतीने सांगितल्याप्रमाणे आणि मिळालेल्या संस्कारांनुसार आचरण ठेवत यंदाच्या या दीपपर्वाचे स्वागत करावे, हे उत्तम. एकीकडे समस्त जग दहशतवादाचा सामना करत असताना, दुष्ट शक्तींशी दोन हात करत असताना आपण वैयक्तिक आनंदाबरोबरच हे सामाजिक भान राखत, विश्वबंधुत्वाच्या कल्पनेला आकार देत दिवाळीचे स्वागत केले, तर ते समयोचित ठरेल यात शंका नाही.

वर्षभरातील सणांच्या रेलचेलीतील दिवाळी हा सर्वांचा अत्यंत आवडता सण. हा सण दिव्यांचा, तेजाचा, प्रकाशाचा, आनंदाचा असल्यामुळे आपण सर्वजण तो अत्यंत उत्साहात साजरा करतो. आपली संस्कृती तेजाची आराधना करणारी आहे. या देशाचे नावच ‘भारत’ आहे. भा म्हणजे तेज आणि त्याच्या उपासनेत नित्य असणारे, ते भारतीय! असे असल्यामुळे दिवे लावणे ही आपली परंपरा आहे, दिवे फुंकरून विझवणारी नव्हे! दिवाळी हा दीपोत्सव जागोजागी कंदील आणि पणत्या लावून सजलेला दिसतो. घरात होणारे वेगवेगळे खमंग पदार्थ रसनातृप्ती करणारे असतात. हलक्याशा चाहुलीने नुकतीच कुठे थंडी अवतरलेली असते आणि अशा वेळेला तेला-तुपात केलेले पदार्थ सहजपणे चालतात आणि पचतातही! थोडक्यात दिवाळीत अलोट आनंदाबरोबर आरोग्यरक्षणाचीही हमी मिळते. दिवाळीचा प्रत्येक दिवस अनुपम उत्साहाचा असतो. वसुबारसेने दिवाळीचा आरंभ होतो. ही गोवत्स द्वादशी आहे तसेच तिला गुरुद्वादशी देखील म्हणतात. वसू या शब्दाचा एक अर्थ संपत्ती असा सुद्धा आहे. भारतीय संस्कृतीने धन अथवा लक्ष्मीला त्याज्य मानलेले नाही.

संतश्रेष्ठ तुकोबा आपल्याला –
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी॥

असे सांगतात. याचा अर्थ धन हे उत्तम व्यवहार करून म्हणजेच प्रामाणिकपणे मिळवावे आणि ते चांगल्या कार्याला खर्ची घालावे. वसुबारसेचा हा दिवस गाई-वासराचाही असतो. या दिवशी सवत्स धेनूचे पूजन केले जाते. तिला गोडधोड खायला घातले जाते. भारतीय संस्कृतीचे हेच वैशिष्ट्य आहे की, इथे आम्ही पशूंची देखील काळजी घेतो. बैलपोळा अथवा नागपंचमी यासारखे कित्येक सण याची साक्ष देतील. प्राचीन काळी गाय ही संपत्ती मानली जात होती. कित्येक राजे यज्ञावेळी सहस्रावधी गाई दान करीत असल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. अशा या गोधनाची, आपल्या पोषणाची व्यवस्था करणाऱ्या गोमातेची पूजा करून दिवाळीच्या मंगलपर्वाचा आरंभ होतो. त्यानंतर धनत्रयोदशी हा दिवस, ज्याला काहीजण धनतेरस असेही संबोधतात. या दिवशी भगवान धन्वंतरींची जयंती असल्याचे मानले जाते. या दिवशी व्यापारी मंडळी आपल्या वह्यांची-चोपड्यांची पूजा करतात आणि अर्थातच आगामी वर्ष उत्तम जाण्याची प्रार्थना करतात. वैद्य मंडळी भगवान धन्वंतरींची पूजा करतात. धने आणि गूळ हा प्रसाद सेवन करून हा दिवस आनंदपूवक साजरा केला जातो.

नरक चतुर्दशी हा भगवंताने नरकासुरावर मिळवलेल्या विजयाचा दिन मानला जातो. यावेळी त्यांची पत्नी सत्यभामा ही देखील सोबत होती. दुष्ट, अधम, अधर्मी अशा वृत्तींचा वध अथवा नाश करणे, हे आपल्याकडे नेहमीच योग्य मानले गेले आहे. ‘अहिंसा परमो धर्मः’ हे ठाऊक आहेच पण त्याचबरोबर ‘धर्म हिंसा तथै वच’ असेही वचन असल्याचे लक्षात ठेवायला हवे. नरकासुराला मारून त्याच्या कैदेत असणाऱ्या अनेक राजांची भगवंतांनी सुटका केली, त्याचप्रमाणे त्याच्या कैदेतील सोळा हजार एकशे कुमारिकांनाही सोडवले. दुसऱ्याच्या कैदेत अथवा शत्रूच्या कैदेत राहिलेल्या अशा मुलींसमोर ‘घरवापसी’ हा पर्याय आजच्या काळातसुद्धा शिल्लक नसेल, तर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी तो कसा असेल? अशावेळी तळे वा एखादी विहीर जवळ करणे वा विष घेऊन स्वत:ला संपवणे एवढाच पर्याय त्यांना उरत असे. पण हे लक्षात घेऊन भगवंतांनी त्यांना आपल्या भाऱ्या बनवले. खरेतर, एका परीने हे त्यावेळचे मोठे सामाजिक कार्यच होते. कारण त्यामुळेच या सर्व मुली संभाव्य बदनामीपासून दूर राहू शकल्या हे इथे लक्षात घ्यायला हवे. काहीजण याचा वेगळा अध्यात्मिक अर्थही लावतात. भगवंतांचे एक नाव ‘हृषिकेश’ असे आहे. हृषिक म्हणजे सर्व प्रकारची इंद्रिये होय. त्यांचा ईश अर्थात स्वामी म्हणजे ‘ऋषिकेश’ होय. त्यामुळे शरीरात असणाऱ्या १,६०,१०८ नाड्यांचा अधिपती म्हणजे भगवंत होय! इथे त्यांची पूर्वी झालेली आठ लग्नेसुद्धा विचारात घेतलेली आहेत.

त्यानंतर लक्ष्मीपूजनाचा दिवस येतो. या दिवशी धन अर्थात लक्ष्मीचे पूजन करतो कारण आपण तिचे उपासक आहोत. व्यापारी वर्ग नवीन वह्या-चोपड्या काढतात कारण दुसऱ्या दिवसापासून नवीन विक्रम संवत सुरू होते. नव्या वह्यांची पूजा करून हा वर्ग नवीन संवत्सरासाठी सज्ज होतो. या दिवशी घरोघरी लक्ष्मीची पूजा संपन्न होते. तबकात लक्ष्मीची प्रतिमा, नाणी, चलनातील नोटा, सध्याच्या काळात वापरात असणारे कार्डरूपी चलन, पासबुक, घरातील दागदागिने, अलंकार आदी सर्व प्रकारच्या संपत्तीचे पूजन करून ते वृद्धिंगत होण्याची मनेच्छा व्यक्त केली जाते. देवी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी केली जाणारे सजावट विलोभनिय असते. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने लोक देवळा-राऊळांमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतात. एकमेकांची भेट घेऊन सहभोजनाचा आनंद लुटतात. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होते आणि एका मंगलमय आनंदाचे तरंग चहू दिशांना पसरतात.

बलिप्रतिपदेला भगवंतांनी बळीराजाला आश्वासन दिले होते की, पुढचा इंद्र बनेपर्यंत मी तुझ्या सन्निध राहीन. त्याला पाताळाचे राज्य सोपवले. पाताळ म्हणजे काहीतरी वाईट नव्हे बरं का! श्रीमद्भागवत वाचली असणाऱ्यांना सप्तस्वर्गाप्रमाणे सप्तपाताळ लोक असल्याचे नक्कीच ठाऊक असेल. अतल, सुतल, तलातल, पाताल वगैरे सात प्रकारचे पाताळ असल्याची कल्पना आपल्याकडे आहे. यातील पातळाचे वर्णन म्हणजे मुबलक पाणी, सर्व प्रकारची समृद्धी, उत्तम निसर्ग आदी प्रकारांनी केले आहे. पाताळ म्हणजे पृथ्वीचा खालचा भाग असे म्हणायचे असेल, तर भारताच्या खाली म्हणजेच पृथ्वीच्या गोलाच्या पलीकडे असणारी अमेरिका म्हणायला लागेल! अस्तू, विस्तारभयास्तव त्याच्या खोलात अधिक जात नाही. त्या बलीच्या नावाने हा दिवस ओळखला जातो. या दिनी पत्नी पतीला ओवाळते आणि तो एखादी उत्तम गोष्ट ओवाळणीत देतो.

अखेरचा दिवस हा भाऊबिजेचा होय. ही कथा अशी की, यमाची बहीण यमुनाने आपल्या भावाला तिच्या घरी जेवायला बोलावले होते. त्याप्रमाणे यम गेला आणि भोजन करुन संतुष्ट मनाने परतला. त्याची आठवण म्हणून या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जेवायला जातो आणि तिला ओवाळणी म्हणून एखादी चांगली भेट देतो. अशा प्रकारे एकूणच हा सण सर्वजणांची आठवण ठेवत (म्हणजे अगदी यमाची सुद्धा) साजरा केला जातो. अशी ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि आपल्या देशासाठी शांतीची जावो!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -