Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआली माझ्या घरी दिवाळी...

आली माझ्या घरी दिवाळी…

अनुराधा दीक्षित

मी सहावी-सातवीत असेन, आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता. तो वाचताना मला गहिवरून यायचं. कारण तो आमच्या परिस्थितीशी खूप निगडित वाटायचा.

त्यात एका गरीब कुटुंबाचं वर्णन होतं. घरात मला वाटतं आई-वडील आणि दोन-तीन भावंडं अशी माणसं होती. आई गावात चार घरी मोलमजुरी करायची. बापही असंच थोडंफार कमवायचा. कोणी मजुरीच्या ऐवजी खायला शिळपाकं किंवा चहा वगैरे देऊन राबवून घ्यायचे. मुलं लहान, पण परिस्थितीने समजदार झालेली. रोज दोन वेळच्या हातातोंडाची मिळवणी करता नाकीनऊ येत. कधी कधी पाणी पिऊन रात्री झोपावं लागे. मग मुलं पोटाला घट्ट फडकं बांधून राहत. म्हणजे भूक लागत नसे. एकदा आईला एका दयाळू मालकिणीने तीन-चार भाकऱ्या दिल्या. दुसऱ्या दिवशी दिवाळी होती. पण घरात गोडाधोडाचं करायला काहीच नव्हतं. मुलं आज भाकरी खायला मिळणार म्हणून खूश होती. ती आईकडे खायला मागू लागली. आईने डब्यात भाकऱ्या ठेवल्या होत्या. पण त्यांना द्यायला गेली तर डब्यात काहीच नव्हतं. मोठ्या मुलीला… ताईला… विचारलं, तर ती काही बोलली नाही. आईला वाटलं हिनेच बहुधा भुकेल्या पोटी खाऊन टाकल्या. ती तिला खूप ओरडली. पाठीत धपाटा घातला. पण ताई काही बोलली नाही.

दुसऱ्या दिवशी सगळीकडे फटाके वाजू लागले. आकाशकंदील लागले. नवीन कपडे घालून लोकं आनंदाने मिरवत होती. पण या ताईच्या घरी मात्र सगळी एवढंसं तोंड करून बसली होती. आई तिच्यावर अजून रागावलेलीच होती.

तिने आपल्या भावंडांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, ‘आज आपल्याकडे पण आपण दिवाळी साजरी करूया!’ पण, कशी करणार? घरात तर काहीच नव्हतं. तेव्हा ताई घरात जाऊन एक डबा घेऊन आली. तिने तो उघडला. त्यात साताठ छोटे छोटे लाडू होते. आईने विचारलं, ‘हे कुणी दिले?’ तेव्हा ती म्हणाली, ‘तू काल आणलेल्या भाकऱ्यांचा चुरा करून, त्यात घरात होता तो थोडा गूळ मिसळला आणि त्याचे लाडू केले!’

सर्वांनी दिवाळी म्हणून लवकर उठून आंघोळी केल्या होत्या. स्वच्छ कपडे घालून आज तरी आपल्या ताटात आई काहीतरी शिजवून घालील या आशेवर ती कच्चीबच्ची होती. पण ताईने सर्वांच्याच हातात एकेक लाडू ठेऊन त्या दिवशीची दिवाळी गोड केली होती! आईने ताईला पोटाशी धरलं. तिच्या कालचा सारा प्रकार लक्षात आला. ताईने स्वतः उपाशी राहून दिवाळी गोड करण्यासाठी हे सारं केलं होतं. सगळ्यांच्या तोंडावर आनंद पाहून आई आणि ताईच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आले.

आमच्या घरीही परिस्थिती बेताचीच. त्यात आम्ही तेव्हा पाच पाठोपाठच्या बहिणी होतो. शिवाय घरात एक काका. अशी खाणारी तोंडं बरीच आणि कमावणारे माझे वडील. साधी पोस्टमनची नोकरी. त्यांच्या एकट्याच्या पगारात सारा खर्च भागणं कठीणच. त्यामुळे दोन वेळा पुरेसं जेवण हीच चैन होती. मग आई त्यातल्या त्यात घरी किलोभर पोहे आणायला सांगून त्यातले थोडे दूध गूळ घालून शिजवायची. मग सकाळी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या की, दादा देवांची पूजा करत. त्या पोह्यांचा नैवेद्य दाखवून झाला की, मग आम्हा सर्वांना केळीच्या पानावर त्यातले थोडे थोडे पोहे वाढायची. आमचे खाऊन झाले की, अगदी जे थोडेसे उरायचे, ते अक्षरशः चवीपुरते असायचे. तेवढेच ती खायची. पण एक होतं की, आमच्यावर स्वाभिमानाने जगण्याचे, आपलं दैन्य उघड न करण्याचे संस्कार आमच्यावर होते. त्यामुळे शेजारच्या घरातून कितीही खमंग वास येत असला, तरी आमची जीभ कधी चळली नाही.

एकदा दिवाळीच्या दिवशी असेच आम्ही सगळे एकत्र बसून पोहे खात होतो, तेव्हा शेजारच्या काकू आमच्याकडे आल्या. येताना त्या कागदातून मोठं पुडकं घेऊन आल्या होत्या. ‘अगो सरस्वती, आज दिवाळी ना! म्हणून पोरींसाठी हे आणलंय.’ असं म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या पानावर एकेक चकली आणि एकेक लाडू वाढला! आम्ही आई -दादांच्या तोंडाकडे बघत होतो. ते रागावतील की काय असं वाटत होतं. तेवढ्यात काकू म्हणाल्या, ‘रागावू नको गो त्यांना. लहान आहेत त्या. मी मोठी आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा. तेव्हा माझं ऐकायचं!’ त्यांच्यापुढे बोलायची कोणाची हिंमत नव्हती. त्यामुळे आईने डोळ्यांनीच मूकसंमती दिली आणि सर्वांनी काकूंकडच्या फराळाचा आस्वाद घेतला.

आईने मात्र काकूंना गोड शब्दांत सांगितलं, ‘अहो वैनी, आजचे दिवस काही उद्या राहात नाहीत. पुढच्या वर्षी मुलीही थोड्या मोठ्या होतील. जमेल तसं आम्ही करू हो फराळाचं! आज तुम्ही आमचं तोंड गोड केलंत, त्याबद्दल खरंच आभार! पण यापुढे याची काही गरज नाही. अहो, लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा हट्टीकट्टी गरिबी चांगली असं म्हणतात!’ आईने त्यांना कुंकू लावून हातावर प्रसाद म्हणून चमचाभर पोहे घातले. वाकून नमस्कार केला. काकू निघून गेल्या. पण आईने गोड शब्दांत काकूंना सुनावलेले शब्द मात्र माझ्या कायमच लक्षात राहिले.

शाळकरी असताना दिवाळीच्या सुट्टीत संगमेश्वरला देवपाटात मी आजोळी जायची. तिथे माझी आजी एकटीच राहायची. तिची थोडीशी शेती खंडाने दिली होती. त्याचं थोडंसं भात यायचं. त्या काळात ते लाल भाताचे पोहे आजी उखळात कांडायची. कांडताना हळदीची पानं त्यात टाकल्यामुळे एक छानसा वास त्याला यायचा. शिवाय आजीकडे जिवंत झऱ्याचं पाटाच्या पाण्याची धार चोवीस तास पडत असे. ते पाणी अतिशय गोड आणि पाचक होतं. पदार्थाला चांगली चव यायची आणि भूकही सडकून लागायची. त्या पोह्यांचे आजी जे गूळपोहे शिजवायची, त्याची चव अप्रतिम असायची. त्याच घरच्या पोह्यांचा चिवडा तर इतका खमंग असायचा की, तोंडात टाकल्यावर विघळायचा. मिटक्या मारत तो खायला जायचा. आजीची पण गरिबी असली, तरी कोंड्यांचा मांडा कसा करावा हे तिच्याकडून शिकण्यासारखं होतं. तिच्या हाताला चव होती. ती अक्षरशः सुगरण होती. ती पुरणपोळी इतकी मऊसूत, लुसलुशीत बनवायची की, अधाशासारख्या खाव्याशा वाटायच्या! ती खूप लाड करायची. त्यामुळे दिवाळीत तिच्याकडे जायला मी उत्सुक असायची.

माझी आत्तेही तिथून जवळच्या देवरूखला राहायची. तिची मुलं पण समवयस्क असल्याने मी सुट्टीत तिच्याकडेही चार दिवस राहून यायची. आतेकडे खाण्यापिण्याची चंगळ असायची. तीही सुगरण होती. तिला विविध प्रकारचे पदार्थ करण्याची आवड होती. दिवाळीचे बरेच पदार्थ ती करायची. भावंडांबरोबर एकत्र खाण्यात मजा यायची.

आमच्या आत्तेच्या तोंडात तेव्हा एक गाणं नेहमी असायचं… ‘आली दीपवाळी, गड्यांनो, आली दीपवाळी। लाडू, करंज्या, शंकरपाळी, खाऊ कडबोळी… गड्यांनो, आली दीपवाळी…’ आजही तिचं किनऱ्या आवाजातलं गायलेलं गाणं दिवाळी आली की, हमखास आठवतं.

आता दिवस बरेच पालटलेत. मुलांच्या फर्माईशीनुसार काही वर्षांपूर्वीपर्यंत घरात दिवाळीचे पदार्थ मी करत असे. पूर्वी दिवाळीचे पदार्थ हे फक्त दिवाळीतच व्हायचे. बाकी मग त्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागे. पण आता बारा महिने हे सगळे पदार्थ बाजारात आयते मिळतात. आज बायका नोकरीधंदे करू लागल्या. या सगळ्यांसाठी त्यांच्याकडे वेळही नसतो. पैसाही हातात खुळखुळत असल्याने आता दिवाळीच्या पदार्थांची ऑर्डर दिली की, घरपोच उत्तम चवीचे पदार्थ मिळतात! वर्षाचे बाराही महिने दिवाळी साजरी होते. त्यामुळे ह्या पदार्थांची अपूर्वाई किंवा नावीन्य उरलेले नाही. ‘पैसा फेक, तमाशा देख’ या चालीवर सारं काही घरबसल्या ऑनलाइन मिळतं! हा काळाचा महिमा!

आता एक उत्सव, मज्जा एवढ्यापुरतीच दिवाळी राहिली आहे. नवीन कपडे, आकाशकंदील, रोशणाई, मिठाया यांच्यासाठी एकमेकांत जणू स्पर्धाच चाललेली दिसते! असो.

आपण मात्र या दीपपर्वाच्या शुभसमयाला आपलं आयुष्य सद्विचारांनी, सदाचाराने नेहमीच उजळून जावो! ज्ञानाचा लखलखीत प्रकाश सर्वत्र पडो अशीच शुभकामना करूया!

दीपज्योति: परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन:। दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोस्तुते।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -