Loksabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी चर्चेचे गुऱ्हाळ

Share

१७व्या लोकसभेचा कार्यकाळ लवकरच समाप्त होत असल्याने देशाच्या १८व्या लोकसभेसाठी लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि त्याचक्षणी देशामध्ये आचारसंहिता लागू होईल. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी बाकी असला, तरी निवडणुकांचे पडघम साधारणत: सात-आठ महिन्यांपासूनच देशामध्ये वाजण्यास सुरुवात झालेली आहे.

भाजपा देशामध्ये २०१४ पासून सत्तेवर आहे. २०१९ लाही देशाची सत्ता भाजपानेच संपादन केली होती आणि २०२४ ला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपाच सत्ता संपादन करण्याची दाट शक्यता आताच दिसत आहे. भाजपाचा अश्व सत्ता संपादनाच्या दिशेने वाटचाल करीत असताना त्या अश्वाला अडविण्याची क्षमता सध्या तरी कोणत्याही पक्षामध्ये अथवा आघाडीमध्ये पाहावयास मिळत नाही. भाजपाला सत्तेपासून अडविण्यासाठी काँग्रेस पक्षाने अन्य विरोधी पक्षाची एकजूट करत भाजपाविरोधात निवडणूक लढाई लढण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तथापि निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वीच या इंडिया आघाडीला फुटीचे ग्रहण लागलेले आहे.

इंडिया आघाडीतील मातब्बर समजले जाणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम ठोकत भाजपाशी मैत्री स्वीकारली आहे. इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून गणल्या जाणाऱ्या काँग्रेसला २०१४ पासून लागलेली राजकीय घरघर अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ज्या मातब्बरांनी काँग्रेस पक्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांच्या घरातील पुढील पिढी मात्र काँग्रेस पक्षाचा त्याग करत भाजपामध्ये जात आहे. एकेकाळ माधवराव सिंधिया हे काँग्रेसमधील मातब्बर प्रस्थ म्हणून ओळखले जायचे. काही वर्षांपूर्वी त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम ठोकला व भाजपात प्रवेश केला.

मुंबई काँग्रेस म्हणजेच मुरली देवरा हे अनेक वर्षांचे गणित होते. त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा त्याग करत मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. शंकरराव चव्हाण हे काँग्रेसमधील अजून एक मातब्बर प्रस्थ आणि गांधी घराण्याचे कडवट व विश्वासू शिलेदार. त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा त्याग करत भाजपात प्रवेश केला. देशाच्या विविध राज्यांमध्ये काँग्रेसचे अनेक मातब्बर हे पक्षाचा त्याग करत भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. इंडिया आघाडीचा काँग्रेस हा मुख्य चेहरा असतानाही त्याच पक्षामध्ये ठिकठिकाणी गळती लागत आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी भाजपाचा कसा सामना करणार?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यात ज्या काँग्रेसने इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला, खटाटोप केला, त्याच काँग्रेसला आघाडीमध्ये कोणी फारसे जुमानत नसल्याचे अलीकडच्या घडामोडींदरम्यान स्पष्ट झाले आहे.

आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी या तीन पक्षांनी तर आपला प्रभाव असणाऱ्या राज्यांमध्ये काँग्रेसला न जुमानता ‘एकला चलो रे’ची भूमिकाही जाहीर करत स्वत:च जागावाटप जाहीर केले होते. आपला पंजाब व दिल्लीमध्ये काँग्रेसशी युती करण्यात स्वारस्य नाही. तृणमूल काँग्रेसदेखील पश्चिम बंगालला सामावून घेण्यास रुची दाखवत नाही. समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रभाव नसल्याचे सांगत जागा देण्यास आडकाठी केली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली. अखेरीस आपने पंजाब व दिल्लीमध्ये, तर समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात काँग्रेसला जागावाटपात स्थान देण्याची तयारी दाखविली आहे.

जी काँग्रेस सत्तासंपादनासाठी आक्रमक होण्याची भाषा बोलत आहे, त्या पक्षाच्या सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा लढविण्यास नकार देत राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून मागच्या दाराने संसदेत प्रवेश केला आहे. राहुल गांधीदेखील उत्तर प्रदेशऐवजी दुसऱ्या राज्यातील सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेत आहेत. मतदारसंघ न मिळाल्यास पुन्हा ते केरळच्या वायनाडू मतदारसंघाला पसंती देण्याची शक्यता आहे. अमेठी व रायबरेली या पारंपरिक मतदारसंघातून गांधी परिवार काढता पाय घेत असल्याचे चित्र आता तरी सुरुवातीच्या टप्प्यात निर्माण झालेले आहे.

रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी या गेल्या काही वर्षांपासून पक्षांतर्गत राजकारणात सक्रिय असल्या तरी पक्षामध्ये आणि जनसामान्यांमध्ये प्रभाव निर्माण करण्यास त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा पडल्या आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला तुरळक भागांचा अपवाद वगळता इतरत्र फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. उत्तर प्रदेशसारख्या ८० जागा असलेल्या राज्यात ७० हून अधिक जागांवर विजय मिळविण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. मोदी-योगी करिष्म्यामुळे ते शक्यही आहे. भाजपाच्या सत्तेचा पायाच तेथेच रचला जाणार आहे. अयोध्या मंदिरामुळे भाजपाचा करिष्मा वाढीस लागला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोपऱ्यांत होत असलेली विकासकामांची मांदियाळी पाहता इंडिया आघाडीला भाजपाविरोधात प्रचार करण्यासाठी फारसे मुद्दे नसल्याची शोकांतिका आहे. केवळ मोदी विरोध करून देशाची सत्ता संपादन करणे त्यांना शक्य होणार नाही. त्यात इंडिया आघाडीमध्ये सुसंवाद नाही आणि अनेक भागांत अविश्वासाचे वातावरण आहे. आज आघाडीमध्ये सामील असणारा पक्ष उद्या भाजपाशी हातमिळवणी करणार नाही, याची कोणी खात्री देऊ शकणार नाही. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून आघाडीतील घटक पक्षांमध्ये आताच वादाचे फटाके फुटू लागले आहेत. त्या तुलनेत भाजपा व मित्र पक्षांमध्ये जागावाटपावरून कोठेही वाद निर्माण होत असल्याचे दिसून येत नाही.

महाराष्ट्राचा विचार करावयाचा झाल्यास ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी किमान ४५ जागांवर विजय मिळविण्याच्या ध्येयाने भाजपा गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनात्मक पातळीवर कार्यरत आहे. भाजपाच्या जोडीला शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने विरोधकांची ताकद दुभंगली गेली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे मविआची ताकद कमी झाली आहे. त्यात प्रकाश आंबेडकरांनी २५हून अधिक जागांची मागणी करत मविआला अडचणीत आणले आहे. जागावाटपावरून संघर्ष करणारी इंडिया आघाडी आणि विकासकामांच्या पाठबळावर जनसामान्यांपुढे मतदानासाठी जाऊ पाहणारी भाजपा पाहिल्यावर २०२४ची लढाई एकतर्फीच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Recent Posts

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

2 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

3 hours ago

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

7 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

7 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

7 hours ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

7 hours ago