Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआंगणेवाडीच्या देवी भराडीला साकडं आणि अडीच लाखांचं मताधिक्य...!

आंगणेवाडीच्या देवी भराडीला साकडं आणि अडीच लाखांचं मताधिक्य…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

कोकणातील आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडीमातेच्या दर्शनाला लाखो भक्तगण येत असतात. दरवर्षी दोन दिवस कोकण भक्तिसागरात न्हाऊन निघतं. देवी भराडी नवसाला पावते असे भक्तगण मानतात. यामुळेच कोकणसह महाराष्ट्रातून भाविक श्रद्धेने या देवीच्या दर्शनाला येतात. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत आंगणेवाडीच्या देवी भराडीच्या या उत्सवाला लाखो भक्तगण येत आहेत. जात, धर्म, पंथ आणि आताच्या समाजजीवनात महत्त्वाचा होत गेलेला पक्ष कोणताही असो सारेच भराडीमातेच्या सभामंडपात… विचार वेगळे असले तरीही अंतर्मनातील माते प्रतिचा भक्तिभाव तोच असतो.

गरीब, श्रीमंत, उच्च-निच असा कोणताही भेदभाव नसतो. यामुळे येणारा प्रत्येकजण श्रद्धेने, भक्तिभावाने येतो आणि सुख-समाधान, आनंद देवीपाशी मागतो. कोणी राजकारणी असतील ते आपल्या हातून जनसेवेचे चांगलं काम घडू दे अशी देवी चरणी प्रार्थना करतात. निवडणुकीत कोणी उभा राहणार असेल, तर स्वत:च्या विजयासाठी देवी मातेकडे सांगणं करतात. यात प्रत्येकजण देवीपाशी आपल्यासाठी गाऱ्हाणं घालतो, सांगणे करत असतो. अगदी दरवर्षी महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यांतून विविध राजकीय पक्षांचे नेते येतात. मनातले साकडे घालतात. देवी भराडी नवसाला पावते. यामुळेच दरवर्षी देवी भराडीच्या दर्शनाला लाखोंनी भक्तगण येत आहेत.

यावर्षी शिवसेनेचे उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून देवी भराडीकडे साकडे घातले म्हणे. आता मनातलं सांगणे देवीकडे वेगळेच अन् माध्यमांसमोर बोलताना राऊतांचा कांगावा वेगळाच हे त्या देवीलाही माहीतच आहे… भक्तीतही राजकारण आणणाऱ्यांना काय म्हणावे? खासदार विनायक राऊत यांना कोणतीही निवडणूक असो किंवा जाहीर सभा असो राणेंचे नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण चालतच नाही. अन् चालणारही नाही… त्या पलीकडे सकारात्मक राजकारण करण्याची यांची कुवतही नाही. गेल्या दहा वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कोणतेही भरीव, विकासात्मक काम खासदार राऊत दाखवू शकत नाहीत ही वस्तुस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही माहीत झालेली आहे.

राजकारण असो की समाजकारण वा कोणत्याही क्षेत्रात काम करताना आत्मविश्वास जरूर असावा; परंतु अतिआत्मविश्वास नक्कीच नसावा. सर्वसामान्य लोकांना गृहीत धरून नारायण राणेंना उमेदवारी मिळू देत म्हणायचं आणि त्यासाठी देवी भराडीला साकडं घालणे हे सारच राजकारणापलीकडचं आहे. निवडणुकीत उमेदवार कोण असावा हा खरंतर प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो. उमेदवारी कोणाला द्यायची, पक्षकार्यात कोणत्या अनुभवी व्यक्तीच्या अनुभवाचा पक्ष वाढीत उपयोग करावा हे सारं पक्षीय धोरणात ठरतं. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवायला कोणी इच्छुकच नाही. उबाठाकडे कोणी उमेदवार नाही. यामुळे उबाठाने विनायक राऊत यांचं नाव निश्चित केलं असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यातच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदार संघामध्ये पक्ष संघटन फारच कमी आहे. त्यामुळे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांनी कोकणातील या दोन्ही जागांवर दावाच केला नसावा. यामुळे खा. विनायक राऊत आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर झाली असावी.

खा. विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी आहेत. यापूर्वी उबाठा सेना सत्तेत होतीच. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख महाराष्ट्राचे अडीच वर्षे मुख्यमंत्रीही होते; परंतु कोकणासाठी काही केलंय म्हणून सांगण्यासारखं एकही काम नाही. सिंधू-रत्नची स्थापना केली; परंतु त्यामध्ये एका रुपयाचीही आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र, एककलमी कार्यक्रम राबविला गेला तो म्हणजे नारायण राणेंना विरोध करत सत्तेच्या अधिकाराचा गैरवापर करीत त्रास देता येईल तेवढा सर्वपातळीवर दिला गेला. हे वास्तव महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संघर्ष नवीन नव्हता आणि नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खा. विनायक राऊत यांनी महायुतीच्या उमेदवाराचा अडीच लाख मतांनी पराभव करण्याची घोषणा केली आहे. खरं तर फाजील आत्मविश्वास कुठून येतो कुणास ठाऊक. आजवर झालेल्या ग्रा. पं. निवडणुका, सहकारातील निवडणुकांमध्ये उबाठा कधीच कुठे दिसली नाही. गेल्या वर्षभरात तर उबाठा महाराष्ट्रात स्वत:चं अस्तित्व चाचपडत असताना अडीच लाखांचे मताधिक्क्य कोणत्या आधारे शक्य होईल याची गोळा-बेरीज आणि बेरजेचे राजकारण कुठेच दिसत नाही. यामुळेच विनायक राऊत यांच्या वरकरणी पोपटपंचीचे कौतुकच आहे.

आंगणेवाडीची देवी भराडी माता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी नेहमीच उभी राहिली. म्हणूनच नगरसेवक, मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री हा थक्क करणारा सारा प्रवास एखाद्या कथा-कादंबरीचा किंवा चित्रपटाचा विषय होईल असाच नारायण राणेंच्या आयुष्याचा आलेख आहे. राणे कधी विजयाने माजले नाहीत आणि एखाद्या राजकीय पराभवाने कधी खचले नाहीत. जेव्हा-जेव्हा राणे संपले म्हणून राणे विरोधक आवई उठवतात तेव्हा-तेव्हा नारायण राणे हे व्यक्तिमत्त्व राजकारणात अधिक उच्चपदावर विराजमान झालेलं असतं. हे अवास्तव नव्हे तर हे अखंड महाराष्ट्राने आणि कोकणानेही पाहिले आहे.

कोकणात राजकारण करणारे नेते पुढारी फक्त राणेंना विरोध आणि नारायण राणे यांच्या विरोधी स्टेटमेंट करण्याचे एकमेव काम करतात. यात त्यांना कोकणच्या विकासाचाही विसर पडलेला असतो. राणे यांच्या विरोधात मीडियामध्ये सतत बोलत राहणं यालाच विकास म्हणतात असा बहुधा गैरसमज राणे विरोधकांनी करून घेतला असावा. शेवटी आंगणेवाडीची भराडी माता कोणालाही उन्मत्त व्हायला देत नाही. त्यामुळे कोकणचे हित कशात आहे. कोण काय करू शकतो. या सर्व प्रश्नांची उत्तरं भराडीमातेपाशीच आहेत. कोणी कितीही माज, मस्ती आणि उन्माद दाखविला तरीही कोणाला कुठे बसवावं याचा निर्णय देवी भराडीमाता करेल याचा कोकणवासीयांना विश्वास आणि श्रद्धाही आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -