Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना 'फटकारले'

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ‘फटकारले’

सावरकरांचं नाव पुसायला निघालेल्या आणि धर्मांतरणाला समर्थन देणा-या कर्नाटक सरकारबद्दल ‘उद्धवजी’ तुमचं मत काय?

मुंबई : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार (Congress) आल्याने राज्यात ठाकरे गट प्रचंड खूश झाला होता. महाविकास आघाडीचे (MVA) नेते सातत्याने महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार असं वक्तव्य करत होते. मात्र कर्नाटक सरकारने नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांवर भाजपाकडून (BJP) सडकून टीका होत आहे. यासंदर्भात मत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आता ‘आता उद्धव ठाकरे यांची यावर प्रतिक्रिया काय आहे?’ असं म्हणत ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट टार्गेट केलं आहे.

सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कर्नाटक सरकारने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. कर्नाटकात मंत्रिमंडळ बैठकीत अभ्यासक्रमातील सावरकरांचा धडा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाजप सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदादेखील रद्द केला गेला आहे. या निर्णयांना भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे.

सत्तेसाठी केली तडजोड : देवेंद्र फडणवीस

एखादा धडा तुम्ही अभ्यासक्रमातून वगळू शकता, मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाही. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचं सरकार निर्णय घेत आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.

पुढे ते म्हणाले, माझा मविआला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? माझा एक प्रश्न उद्धव ठाकरेजींना आहे की, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघालेले आहेत, धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत तर आता तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. सत्तेसाठी तुम्ही तडजोड केली हे यातून अतिशय स्पष्ट होत आहे. हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरुन पुसू शकणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

अराजकतेचे उदाहरण म्हणजे काँग्रेस : चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेसला मत देणे म्हणजे या देशात किती अराजकता होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. उद्धव ठाकरेंनी यावर आता आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. आता उध्दव ठाकरे यांनी लंडनमधून किंवा महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय मान्य आहे का? आणि या नंतरही शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का, हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -