Friday, May 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : 'माझे ठाम मत, उद्धव येडा झाला'

Devendra Fadnavis : ‘माझे ठाम मत, उद्धव येडा झाला’

देवेंद्र फडणवीस यांची जहरी टीका

मुंबई : उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले.

“फडणवीसांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच शंका सध्या येत आहे, सरकारच जर खुन्यांच्या मागे उभे राहिले तर राज्यात गुन्हेगारी घटना वाढतील “अशी टीका पत्रकार परिषदेतून ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरेंच्याच डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका केली.

फडणवीस म्हणाले, उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मी त्यांच्या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. उद्धवजींनी आता काहीही म्हटले तरी मी त्यांना केवळ ‘गेट वेल सून’ एवढेच म्हणेन. मी आता ते लवकर बरे व्हावेत म्हणून केवळ ‘गेट वेल सून’ एवढ्याच शुभेच्छा देतो.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरुन सरकारवर होणारे आरोप फेटाळून लावले. राज्यात गेल्या काही काळात ज्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, त्या निश्चितच गंभीर आहेत. पण या सर्व घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडल्या आहेत. त्यामुळे याचा थेट कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे अयोग्य आहे. या गुन्हेगारी घटना आपापसातील हेवेदावे, भांडणांमुळे घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावरील हल्लाप्रकरणात सत्ताधारी पक्षातील महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, विजय वडेट्टीवार यांना फार काही माहिती नसते. ते काहीही बोलत असतात. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची चौकशी होईल. पण अलीकडच्या काळात जे गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत, त्यांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी वडेट्टीवारांना दिला.

दरम्यान, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका करताना आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तुमच्याबद्दल कीव वाटू लागली. राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते. पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते. परंतु अलीकडच्या काळात आपण ज्या पद्धतीने भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहात, ते बघितल्यानंतर आपल्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागते, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

जाहीर सभेतील आपली भाषणे, पत्रकार परिषदेतील आपली विधाने ऐकल्यानंतर आपण सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते. आपली ही अवस्था आपण स्वतःचा हाताने करवून घेतली. ‘असंगाशी संग’ केल्यानंतर असेच होणार. फडणवीस यांच्यावर आज आपण ज्या खालच्या भाषेत टीका केली तो तळ आम्हाला गाठता येणार नाही. पण तुमची भाषा, तुमचे टोमणे, तुमच्या शिव्या, तुमचे नैराश्य या साऱ्याच गोष्टी हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना करणे आमच्या हातात आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -