Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसत्तेत असूनही शिवसेनेला मतं मिळाली नाही -नारायण राणे

सत्तेत असूनही शिवसेनेला मतं मिळाली नाही -नारायण राणे

सिंधुदुर्ग : राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय तर संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. “सत्तेत असूनही शिवसेनेला जेवढी मतं मिळायला हवी होती तेवढीही मिळाली नाही. आम्ही विरोधात असूनही मविआची ८-९ मतं फोडली,” असे नारायण राणे म्हणाले. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “शिवसेनेला सत्तेत असूनही महाविकास आघाडीची जेवढी मते मिळायला हवी होती तेवढीही मते मिळाली नाहीत. त्यांचे ८-९ आमदार फुटतात. त्यांची विश्वासार्हता कुठे आहे? आम्ही विरोधात असूनही एकसंध राहिलो. उलट आम्ही त्यांचीच मते फोडली. राज्यात सत्तेत येण्यासाठी १४५ मतांची आवश्यकता असते. मात्र, या निकालाने तुम्ही अल्पमतात गेला आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.”

“आतापर्यंतच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत असे म्हणत होते. जी भाषा वापरायला नको होती ती भाषा वापरल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रुपण झाली,” अशी खोचक टीका राणे यांनी केली.

“निवडणुकीपर्यंत आमचेच आमदार निवडून येतील, अशा बढाया मारणाऱ्यांचे या निवडणुकीने पानिपत केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हायला हवे,” अशी टीका नारायण राणे यांनी केली.

“आमदारांची भाजपावर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजपाने जिंकली, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव आहे.”

तसेच, “तुम्ही महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेलंत. सत्तारुढ आणि विरोधक यांच्यात लोकशाहीमध्ये जे नातं असतं हे नातं तुम्ही या निमित्ताने धुळीला मिळवलं. तुम्हाला सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही. स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत आणि बढाया मारतात,” अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -