Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024चेन्नईकडून दिल्ली सर

चेन्नईकडून दिल्ली सर

अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर पाजले पराभवाचे पाणी

चेन्नई (वृत्तसंस्था) : एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरीही प्रत्येकाच्या थोड्या फार धावा जोडून चेन्नईने कसेबसे १६८ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी दिल्लीसमोर उभे केले. त्यानंतर मथीशा पथीराना आणि दीपक चहर यांची विकेट घेणारी आणि मोईन अली, रविंद्र जडेजा यांची धावा रोखणारी गोलंदाजी या बळावर चेन्नईने दिल्लीला २७ धावांनी पराभवाचे पाणी पाजले.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीपासूनच मान टाकली. २५ धावांवर त्यांचे तीन मोहरे टिपण्यात चेन्नई सुपर किंग्जला यश आले. त्यामुळे सुरुवातीलाच दिल्लीचा संघ बॅकफुटला गेला. त्यानंतर मनिष पांडे आणि रिली रोसूव यांनी संयमी खेळी खेळत दिल्लीच्या डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी थोडाफार सावरलाही होता. संघाला विजय मिळवून देण्यात त्यांची खेळी अपुरी ठरली. मनिष पांडेने २७, तर रिली रोसूवने ३५ धावा जोडल्या. या दोघांच्या विकेट ५ धावांच्या अंतराने पडल्याने विजय त्यांच्यापासून दूर गेला. तळात अक्षर पटेलने मोठे फटके तडकावत पराभवाचे अंतर कमी केले. तो थोडा आधी आला असता तर कदाचित सामना रंजक झाला असता. अक्षरने १२ चेंडूंत २१ फटकवल्या, तर ललित यादवने ५ चेंडूंत १२ धावा जोडल्या. दिल्लीचा डाव निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात १४० धावांवर आटोपला. चेन्नईने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. मथीशा पथीरानाने ३, तर दीपक चहरने २ विकेट मिळवल्या. मोईन अली, रविंद्र जडेजा या फिरकीपटूंच्या जोडीने धावा रोखण्यात चांगलेच यश मिळवले. जडेजाला एक विकेटही मिळाली.

कर्णधार एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा यांची फटकेबाजी आणि शिवम दुबे याच्या वादळी खेळीमुळे चेन्नईने निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात १६७ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फॉर्मात असलेले ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी संयमी सुरूवात करून दिली.

कॉनवे आणि गायकवाड यांनी ३२ धावांची सलामी दिली. डेवेन कॉनवे १० धावा काढून तंबूत परतला. तर ऋतुराज गायकवाड २४ धावांवर बाद झाला. दिल्लीच्या अक्षर पटेलने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. ऋतुराज बाद झाल्यानंतरम मोईन अली आणि अजिंक्य रहाणे यांनाही फार काळ मैदानात तग धरता आला नाही. मोईन अली अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्याला कुलदीप यादवने माघारी धाडले. तर अजिंक्य रहाणेने २१ धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. शिवम दुबे आणि अंबाती रायडू यांनी चेन्नईच्या डावाला आकार दिला.

दोघांनी आक्रमक फलंदाजी करत चेन्नईची धावसंख्या वाढवली. शिवम दुबेने १२ चेंडूंत २५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन खणखणीत षटकार लगावले. दुबे याची खेळी मिचेल मार्शने संपुष्टात आणली. अंबाती रायडूने १७ चेंडूंत २३ धावांची भर घातली. रायडू आणि दुबे बाद झाल्यानंतर जडेजा आणि धोनीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी झटपट धावांचा पाऊस पाडला. धोनी आणि जाडेजा यांनी १८ चेंडूंत ३८ धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. रविंद्र जडेजाने १६ चेंडूंत २१ धावांचे योगदान दिले. धोनीने ९ चेंडूंत २० धावा जोडल्या. मिचेल मार्शने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याने धोनी आणि जडेजा या दोन्ही मोठ्या फलंदाजांना एकाच षटकात बाद केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -