Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विदेशात जाऊन देशाची बदनामी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विदेशात जाऊन देशाची बदनामी

  • इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

काँग्रेस पक्षातील सर्वोच्च नेता म्हणून ओळखले जाणारे खासदार राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन मोदी सरकार, भारतीय संसद, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जे बेलगाम आरोप केले, ते भारतातील सर्वसामान्य जनतेलाही आवडणार नाहीत. आपल्या देशात आपल्या सरकारवर टीकाटिप्पणी करणे किंवा आपल्या सरकारच्या विरोधात आंदोलन करून आवाज उठवणे हा सर्व राजकीय पक्षांना संसदीय लोकशाहीने दिलेला हक्क आहे. पण विदेशातील भूमीवरून भारतातील सरकारवर हल्ला चढवणे हे कितपत योग्य आहे? राहुल गांधी यांचे पहिले भाषण केंब्रिज विद्यापीठात झाले, नंतर ब्रिटनच्या संसदेत झाले व त्यानंतर लंडनमधील चेथम हाऊसमध्ये झाले. एका भारतीय नेत्याला ब्रिटनच्या तीन नामांकित व मान्यवर संस्थांमध्ये भाषण करण्याचे निमंत्रण मिळते हेच मोठे आश्चर्यकारक होते. आपल्या नेत्याला ब्रिटनच्या संसदेत व केंब्रिज विद्यापीठात भाषणासाठी बोलावले याचा काँग्रेसवासीयांना निश्चितच अभिमान वाटला असेल. पण तिथे जाऊन ते मोदी सरकारवर घसरतील व भारतीय संसदेचे वस्त्रहरण करतील याची कुणी कल्पना केली नव्हती.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवरून भारतात लोकशाही संकटात म्हणून जो आक्रोश केला, त्याचे पडसाद संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. राहुल यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशी भाजपने मागणी केली. एवढेच नव्हे तर राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द करावे, अशीही मागणी काही वरिष्ठ नेत्यांनी केली. आणीबाणीच्या काळात ज्येष्ठ संसद सदस्य सुब्रम्हण्यम स्वामी यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली म्हणून त्यांचे संसद सदस्यत्व रद्द केले होते मग तोच निकष राहुल गांधी यांना लावून त्यांनाही शिक्षा द्यावी, या मागणीने जोर धरला.

भारतातील एक विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांना सरकारवर टीका करण्याचा निश्चितच अधिकार आहे, पण दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशातील सरकार, सत्ताधारी पक्ष व संसदीय कामकाम पद्धतीविषयी टाहो फोडणे याचे समर्थन कसे करता येईल? राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन मोदी सरकार आणि भारतीय संसदेवर जो निशाणा साधला, त्याबद्दल मोदी सरकारमधील केंद्रीयमंत्री व भाजपचे नेते – प्रवक्ते हे राहुल यांच्यावर तुटून पडले आहेत. त्यांना राहुल यांच्या बेजबाबदार वागण्या-बोलण्याचा संताप येणे स्वाभाविकच आहे. पण, देशातील विरोधी पक्षांचे दिग्गज नेते राहुल यांच्या बोलण्यावर चिडीचूप बसले आहेत. शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, जगमोहन रेड्डी, फारूख अब्दुल्ला, नितीशकुमार, अखिलेश यादव, मायावती, अगदी उद्धव ठाकरे यांनाही राहुल यांचे वर्तन योग्य वाटते का? भारतीय लोकशाही धोक्यात आहे, या राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवरून मांडलेल्या भूमिकेशी देशातील सर्व विरोधी पक्ष सहमत आहेत का?

पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतही विरोधी पक्ष त्यांच्या सरकारवर आक्रमकपणे टीका करीत असे, पण विदेशात जाऊन भारतातील लोकशाही संकटात आहे, अशी कोणी आवई उठवली नव्हती. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी परिवाराच्या बाहेरचे असले तरी काँग्रेस पक्ष एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीप्रमाणे चालवला जातो आहे, हे वास्तव आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. दर पाच वर्षांनी लोकसभा व राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. देशाचे मतदार हे सरकार कोणाचे असावे हे ठरवत आहेत. देशातील मीडियातून, पत्रकार परिषदांतून, जाहीर सभांतून काँग्रेस, डावे व अन्य प्रादेशिक विरोधी पक्ष रोज मोदी सरकारवर दुगाण्या झाडत आहेत. देशात लोकशाही आहे म्हणूनच व्यक्तिस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य आहे. सरकारवर कोणी काहीही आरोप करू शकतो. हे राहुल गांधींना कोण समजावून सांगणार? वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवर रोज सरकारच्या कारभारावर व निर्णयांवर मुक्त चर्चा व टीकाटिप्पणी होत असते, हे लोकशाही असल्यानेच शक्य आहे ना?

इंदिराजींनी पंतप्रधान असताना जून १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादली होती आणि लोकशाहीच्या मुसक्या बांधल्या होत्या, मग लोकशाहीची हत्या कोणी केली होती? भारतात लोकशाही धोक्यात आहे, असे ब्रिटन व युरोपमध्ये सांगून राहुल गांधी आपल्या अपरिपक्वतेचे दर्शन जगाला घडवत आहेत. गेल्या नऊ वर्षांत काँग्रेसची सतत घसरण चालू आहे. देशात केवळ तीन राज्यांत काँग्रेसचे मुख्यमंत्री उरले आहेत. देशात लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेसही मजबूत असली पाहिजे. पण साठ दशके देशावर सत्ता भोगलेल्या काँग्रेसवर लोकांचाच भरवसा राहिलेला नाही, त्याला भाजप तरी काय करणार? संसदेत बोलायला वेळ दिला जात नाही किंवा विरोधी नेत्यांचे माईक बंद केले जातात, हा राहुल यांचा आरोप हास्यास्पद आहे. दिलेल्या वेळेत आपण काय मुद्देसूद बोलतो हे महत्त्वाचे आहे. डॉ. राम मनोहर लोहिया यांना संसदेत जेमतेम पाच मिनिटे बोलायला मिळायची पण तेवढ्या काळात ते काँग्रेस सरकारला घाम फोडत असत.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणाऱ्या ठरावावर राजकीय भाषण केले. सर्वाधिक वेळ राहुल यांनाच मिळाला होता. मोदी सरकारवर ते बेफाम आरोप करीत राहिले. भाषण संपल्यावर अध्यक्षांनी तुम्हाला पूर्ण वेळ दिला हे बजावून सांगितले व त्याला राहुल यांनी होकारार्थी प्रतिसादही दिला.

राहुल गांधी ब्रिटनमध्ये आपल्या भाषणात म्हणाले:

(१) भारतीय संसदेत विरोधी पक्षाला आवाज उठवायला संधी दिली जात नाही, हे लज्जास्पद आहे. चीन आमच्या प्रदेशात येऊन बसला आहे, पण आम्ही सरकारला संसदेत त्यावर प्रश्न विचारू शकत नाही.

(२) भारत हा मुक्त विचारांचा देश होता, तसा आज राहिलेला नाही. आम्ही एक दुसऱ्याचा आदर करायचो, आता तसे घडत नाही.

(३) केंब्रिजमध्ये आम्ही बोलू शकतो, पण भारतीय विद्यापीठात आम्ही विचार मांडू शकत नाही. विरोधी पक्षाला संसदेत कोणत्याही विषयावर चर्चा घडवू दिली जात नाही.

दि. ५ मार्चला ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले – भारताने चीनपासून सावध राहण्याची गरज आहे. जे लोक मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्यावर कारवाई होते. बीबीसीच्या बाबतीतही असेच घडले. सरकारची जे प्रशंसा करतात, त्यांना पुरस्कार दिले जातात. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी राहुल यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसच्या स्वयंघोषित राजकुमाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा माणूस भारताच्या एकतेला धोका निर्माण करतोय. भारतातील लोकांना चांगले ठाऊक आहे की, राहुल गांधी पप्पू आहे. पण, विदेशातील लोकांना हे ठाऊक नसावे. विदेशी भूमीवरून मोदी सरकारवर हल्ला करण्याचे व भारताची बदनामी करण्याचे काम राहुल गांधी यांनी गेल्या सहा वर्षांत आजवर सात वेळा तरी केले आहे. राहुल यांचा ‘भारत जोडो’ यात्रेतही मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर आगपाखड हा एकमेव अजेंडा होता. तोच अजेंडा ते विदेशातही राबवतात. ब्रिटनमध्ये भारताच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या राहुल यांना देशाबाहेर घालवून द्या, अशी मागणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केली. विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला देशभक्त होऊ शकत नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले, अशी साध्वींनी पुस्ती जोडली. गेल्या नऊ वर्षांत सर्वात जास्त आणि पाठोपाठ पराभव पत्करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी विदेशात जाऊन भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतात यामागे त्यांचा दुसरा हेतू काय असू शकतो?

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -