Friday, May 17, 2024
HomeदेशCyclone Biperjoy : बिपरजॉय चक्रीवादळाची धडकी; कच्छ-सौराष्ट्रातील किनारपट्टीपासून १० किमीपर्यंतचा परिसर केला...

Cyclone Biperjoy : बिपरजॉय चक्रीवादळाची धडकी; कच्छ-सौराष्ट्रातील किनारपट्टीपासून १० किमीपर्यंतचा परिसर केला रिकामा

Cyclone Biperjoy : गुजरात किनारपट्टीला १४ जूनला ऑरेंज तर १५ जूनला रेड अलर्ट जारी

अहमदाबाद : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) गुजरातकडे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टी भागात धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा १४ जूनला ऑरेंज तर १५ जूनला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून ओलांडण्याची शक्यता आहे. हे वादळ १५ जूनला दुपारी ताशी १२५-१३५ किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

या चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) कोकण-गोवा भागात तर १५ जूनला गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कच्छ-सौराष्ट्रातील किनारपट्टीपासून १० किमीपर्यंतचा परिसर रिकामा केला असून आतापर्यंत ७५०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गुजरातच्या कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी या किनारी जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आणखी २३ हजार लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

वादळामुळे (Cyclone Biperjoy) गुजरातच्या किनारी भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील दोन मुले भुज येथील असून, त्यांच्या अंगावर भिंत पडली, तर एका महिलेवर झाड पडले.

मंगळवारी सकाळी ६ वाजता हवामान खात्याच्या अपडेटनुसार, वादळ (Cyclone Biperjoy) ताशी ८ किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. सोमवारी रात्री अडीच वाजता हे वादळ पोरबंदरपासून २९० किमी आणि जखाऊ बंदरापासून ३६० किमी अंतरावर होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ १४ जूनच्या सकाळपर्यंत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते पुनरावृत्ती होईल आणि उत्तर-ईशान्य दिशेने सरकेल.

दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली तर अमित शाह आज दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.

बांगलादेशने या वादळाला ‘बिपरजॉय’ (Cyclone Biperjoy) असे नाव दिले आहे. याचा अर्थ ‘आपत्ती’ किंवा ‘विपत्ती’ असा होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -