Sunday, June 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजबांधकाम व्यवसायिक विशाल आगरवालसह दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

बांधकाम व्यवसायिक विशाल आगरवालसह दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : मद्यधुंद अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवून दोन जणांना चिरडल्याप्रकरणी त्याचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल आगरवाल (५०) याच्यासह अन्य दोघांना सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयाने २४ मेपर्यंत बुधवारी पोलीस कोठडी सुनावली.

याप्रकरणी आगरवाल यास मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. आगरवाल याच्यासह नितेश शेवानी (३४), जयेश गावकर (वय २३) यांना बुधवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. सरकारी वकील विद्या विभुते युक्तिवाद करताना म्हणाल्या, आरोपी अल्पवयीन मुलगा हा दोन बारमध्ये दारू पिण्यास गेला होता.

ब्लॅक बारमध्ये केवळ मेंबर्सना प्रवेश असताना त्याचे ओळखपत्र पाहिले गेले का? त्याला आणि त्याच्या मित्रांना कसा प्रवेश दिला, आरोपींचा एकत्रित तपास करावयाचा आहे. आरोपींनी जे बिलाचे पैसे दिले, त्याबाबत तपास करावयाचा आहे. आरोपीचे वडील विशाल आगरवाल यांनी मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला पार्टी आणि पबमध्ये जाण्यास परवानगी कशी दिली, वाहन परवाना नसताना विना क्रमांकाची आलिशान कार त्याला दिली गेली. गुन्हा दाखल झाल्यावर त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क केल्यावर त्यांनी पुण्यात असताना शिर्डीला असल्याचे पोलिसांना खोटे सांगितले, असे सरकारी वकिलांनी प्रश्न उपस्थित केले.

फरार असतानाच्या काळात विशाल आगरवाल संभाजीनगरमध्ये सापडले. त्यांच्याकडील मोबाईल त्यांनी कोठे तरी लपवून ठेवले आहेत. गुन्हा घडल्यानंतर त्यांनी कोणाला संपर्क केला, हे समजू शकले नाही. साधा फोन केवळ त्यांच्याकडे आढळला. पबमध्ये जाण्यास त्यांनी मुलास किती पैसे दिले, याची चौकशी करायची आहे. महागडी पॉर्श कार विना क्रमांक कशी वापरली, याचाही तपास करावयाचा आहे. गाडीत चालक असताना त्याने जबाब दिला की, मुलाच्या वडिलांनी त्यास गाडी चालविण्यास सांगितले, तर त्या गाडीचे रजिस्ट्रेशन झाले नसताना अल्पवयीन मुलास वाहन चालविण्यास देऊन दुसऱ्याच्या जीवास धोका निर्माण करण्यात आला. आरोपी शेवानी याने मुलास वयाची खात्री न करता बारमध्ये प्रवेश दिला, तर गावकर यांनी मद्य परवाना न पाहता त्याला ब्लॅक बारमध्ये दारू पुरवली, हेही सरकारी वकिलांनी निदर्शनास आणून दिले.

पोलीस निरीक्षक गणेश माने म्हणाले, तपासात आरोपींनी सहकार्य केले नाही. पोलिसांना चकवा देत विशाल आगरवाल संभाजीनगर येथे गेले. त्यांनी मूळ मोबाईल स्वतःजवळ ठेवला नाही, त्यामागचा उद्देश काय आहे? फरार काळात त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पॉर्श गाडी रजिस्टर न करता त्यांनी पुण्यात फिरवली, याबाबत वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो. वेगवेगळ्या मुद्द्यावर आणि शहरात तपास करावयाचा आहे. त्यामुळे आरोपींना आठ दिवस सलग पोलीस कोठडी मिळावी, अशी पोलिसांनी मागणी केली.

बचाव पक्षाचे वकील अमोल डांगे आणि प्रशांत पाटील प्रतिवाद करताना म्हणाले, की पक्षकार यांचे हॉटेल यापूर्वी पोलिसांनी जप्त केले आहे. आम्ही थेट मुलास दारू दिलेली नाही. जयेश गावकर यांना पोलिसांनी ४१ (१) नुसार नोटीस चौकशी देणे गरजेचे होते. दोन संबंधित बार हे एक्साईज विभागाने सील केले आहेत. गाडीमध्ये चालक असताना नेमकी गाडी कोण चालवत होते, हा तपासाचा भाग आहे.

कोर्टाच्या परिसरात आगरवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न

दरम्यान, आरोपी विशाल आगरवाल यास पोलीस बंदोबस्तामध्ये व्हॅनमध्ये पोलीस आयुक्तालयातून शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात येत असताना शिवाजीनगर कोर्टच्या प्रवेशद्वार क्रमांक चार या ठिकाणी वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते सचिन जामगे यांनी अचानक शाईची बॉटल बाहेर काढून काळी शाई आगरवाल यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र ,पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गाडी कोर्टात नेली. मात्र ,या प्रकारामुळे सदर परिसरात धावपळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -