Sunday, May 19, 2024
Homeदेशसीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर शोक संदेश

सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर शोक संदेश

नवी दिल्ली : भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांचा तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये १४ जण प्रवास करत होते. यामध्ये रावत यांच्या पत्नीचाही समावेश होता. या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला.

या दुर्घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

देशाने एक पराक्रमी पुत्र गमावला

देशाने एक पराक्रमी पुत्र गमावला. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा केली, जी शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सर्व अधिकाऱ्यांचे निधन झाले हे वेदनादायी आहे. जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबाप्रति माझ्या संवेदना. – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

उत्कृष्ट सैनिक, एक सच्चा देशभक्त

हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे. या अपघातात आम्ही जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. त्यांनी अत्यंत तत्परतेने भारताची सेवा केली. या संकटाच्या परिस्थितीत मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. जनरल बिपीन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, ज्याने आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन महत्वपूर्ण होते. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. .– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

त्यांचे योगदान आणि निष्ठा शब्दांत व्यक्त करणे कठीण

देशासाठी एक फार दु:खदायक दिवस आहे. कारण आपण एका दुर्दैवी घटनेमध्ये आपले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना गमावलं आहे. ते सर्वात शूर सैनिकांपैकी एक होते. ज्यांनी आपल्या मायभूमीची पूर्ण निष्ठेनं सेवा केली आहे. त्यांचं योगदान आणि निष्ठा शब्दांत सांगता येत नाही. मला खूप वेदना होत आहेत. – अमित शाह, गृहमंत्री

माजी लष्करप्रमुखांचा अशाप्रकारे मृत्यू चिंताजनक

अत्यंत धक्कादायक बातमी. देशाचे माजी लष्करप्रमुख आणि त्याच्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी यांना या पद्धतीने मृत्यू येणे, ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरले ते अतिशय उच्च दर्जाचे होते. त्या हेलिकॉप्टरचा एकंदर दर्जा याबद्दल काही चर्चा होऊ शकत नाही. मात्र केवळ मशीन चांगले असून चालत नाही, परिस्थिती देखील कशी आहे याकडे दुर्लक्ष करता येत नाही. – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

देशासह लष्कराचे अपरिमित नुकसान

जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि संरक्षण दलातील इतर ११ जणांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन होणं हे प्रचंड वेदना देणारं आहे. बिपिन रावत यांच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे देशाचं आणि लष्कराचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे.” – राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

लष्करी सेवेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली

जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण देश हळहळला. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिका जबाबदारीने सक्षमपणे बजावताना देशाच्या लष्करी सेवेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. रावत यांच्या मृत्यूने एक मुत्सद्दी अधिकारी देशाने गमावला. – नारायण राणे, केंद्रीय उद्योगमंत्री

योगदान विसरता येणार नाही

बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह हवाई दलातील अधिकाऱ्यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने अतीव दु:ख झाले. जनरल रावत यांचे लष्करी सेवेतील योगदान विसरता येणार नाही. – राहुल गांधी, खासदार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -