Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपुन्हा जन्म घ्या राजे...!

पुन्हा जन्म घ्या राजे…!

  • विशेष: ह. भ. प. डॉ. वीणा खाडिलकर

फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. खऱ्या अर्थाने रयतेचा राजा कोणाप्रमाणे असावा? या प्रश्नाचे केवळ आणि केवळ एकच उत्तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पूर्ण विश्वासाठी आदर्श असणारा राजा या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेला याचा प्रत्येकास अभिमान आहे. विचारांच्या माध्यमातून आजही आणि पुढेही राजे तुम्हा आम्हा सर्वांत असणारच आहेत.

मुघलांच्या तुलनेत केवळ मूठभर सैन्य असताना शिवाजी राजे कसे बरे त्यांना सामोरे गेले असतील? तसेच त्यांच्याशी दोन हात करण्याचे धाडस केले असेल? असे प्रश्न पडल्याविना राहत नाहीत. राजे पराक्रमी योद्धा असण्यासह कुशल रणनितीकार आणि गनिमी काव्याचे जनकच होते. या दोन्हींचा उत्तम संगम शत्रूशी प्रत्यक्ष लढताना साधल्याने शत्रूची त्रेधातिरपीट होणे हे निश्चितच. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ असे म्हटले जाते. युक्ती कशी उपयोगात आणावी आणि शत्रूला कसे जेरीस आणावे, याचा वस्तुनिष्ठ पाठच राजांनी घालून दिला. त्यामुळे समोर बलाढ्य संख्येने शत्रू सैन्य असूनही त्यांना महाराष्ट्राचे पाणी काय असते? याची चव चाखवण्यात आली. परिणामी शत्रूलाही कळले की, यांच्याशी दोन हात करणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नाही. संख्येने भरमसाट असलो म्हणजे समोरच्यावर एक प्रकारे मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे युद्ध आरंभ होण्यापूर्वीच मानसिक स्तरावर ते आधीच जिंकता येते. हा भ्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात उपयोगी ठरला नाही.

वैज्ञानिक प्रगतीमुळे अनेक देश अणुबॉम्ब सज्ज आहेत. यासह त्यांच्याकडे नानाविध शस्त्रे आहेत. सोबतीला दूरसंचार (टेलिकम्युनिकेशन) आहे. उपग्रहांच्या (रडार) साहाय्याने शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवता येत आहे. ज्यावेळी विज्ञान नव्हते, त्या पूर्वी विज्ञानालाही थिटे ठरवेल, असे युद्ध कौशल्य, गुप्तहेर खाते, युद्ध सज्जता (पायदळ-घोडदळ आदी, आरमार) आदी त्यांच्याकडे होती. अशा सूत्रांच्या साहाय्याने त्यांनी शत्रूला धूळ चारल्याने येथील रयतेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची टाप नव्हती. चौरंगा करणे, कडेलोट करणे या कठोर शिक्षा कोणाला ठाऊक नाहीत, असे नाही. प्रतिदिन येणाऱ्या बातम्यांत ऐकतो, वाचतो की खून, दरोडे, बलात्कार, दुसऱ्याची संपत्ती हडपणे यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण कसे वाढत आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी कडक शिक्षा करणे हा उत्तम आणि रास्त मार्ग आहे. जेव्हा तातडीने आणि कडक शिक्षा होते तेव्हा गुन्हेगारांवर अंकुश राहतो. अन्यथा ते मोकाटपणे गुन्हे करत सुटतात. त्यांच्या या मोकाट आणि सुसाटपणाचा लोकांना त्रास भोगावा लागतो. काही प्रसंगी तो त्रास लोकांच्या प्राणावरही बेततो. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युगाला अनुसरून कोणत्या प्रकारे कृतीत आणता येतील, याचा गांभीर्याने अभ्यास झाला पाहिजे. गुन्हे वाढत राहणे, कैद्यांची संख्या वाढत राहणे, न्यायालयीन खटल्यांचा ढीग वाढत राहणे. याला आळा घालणे अत्यावश्यक आहे.

व्यक्तीकडे पाहताना धर्म, पंथ, जात यांनी न पाहता प्रथम माणूस म्हणून त्याच्याकडे कसे पाहावे? हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकता येईल. आज या विचारांची नितांत आवश्यकता भासत आहे. समाज हा पंथ आणि जाती यांत विभागला गेला आहे. यास्तव एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा अल्प झाला आहे. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे शूर मावळे, सेनापती आदी लढवय्ये योद्धे राजांच्या सैन्यात होते. त्या ठिकाणी पंथ, जात यांना कुठेच थारा नव्हता. रयतेचे सुख आणि आक्रमकांपासून स्वराज्याचे रक्षण ज्यांच्या डोळ्यांसमोर होते त्यांना स्वराज्यापुढे पंथ, जात मान्यच नव्हते, हेच सुस्पष्ट होते. त्यातच स्वराज्याचे कल्याण होते. किंबहुना या एकीमुळेच मुघल आक्रमकांसमोर संख्येने अल्प असूनही टिकाव लागू शकला. स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या खमक्या शिलेदारांचे संघटन करणे शक्य झाले ते केवळ शिवरायांच्या व्यापक विचारसरणीमुळे.

विज्ञान, तंत्रज्ञान नसताना भक्कम जलदुर्ग, किल्ले बांधले. त्यांनी ते बांधले. पण त्यांचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने कैक किल्ले पडीक स्थितीला आले. इतका मोठा ऐतिहासिक ठेवा लाभलेला असूनही त्यांच्या संवर्धनासाठी कसोशीने प्रयत्न का होऊ शकले नाही? हा प्रत्येक शिवप्रेमीला सातवणारा प्रश्न आहे. यासह आणखी एक प्रश्न म्हणजे ऐतिहासिक ठेव्याच्या मुद्द्यावर आवश्यक असलेली तळमळ – कळकळ कुठेतरी अल्प होती का? लोकांना या ठेव्याचे संवर्धन व्हावे असे वाटत असले तरी लोकांच्या हाती संवर्धन (बांधकामाच्या दृष्टीने) करण्याचा भाग नाही. जे नतद्रष्ट किल्ल्यांवर जाऊन कचरा करतात त्यांना संवर्धन याविषयी देणे-घेणे नाही. त्यांच्याकडूनच किल्ले स्वच्छ करून घ्यावे. आजमितीला हाच ठेवा उत्तमपणे जपला असता तर महाराष्ट्रातील किल्ले हाच विषय जगासाठी विशेष ठरला असता. कारण प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य त्यांना अभ्यासता आले असते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक गुण. त्यावर एक विषय होऊ शकतो, असे ते अमूल्य गुण आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासह राजांविषयी बालपणापासूनच माहिती दिली पाहिजे. शाळांत त्या विषयी गांभीर्य नसेल, तर पालकांनी पाल्यांना त्या विषयी अवगत केले पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. भारताला अनेक पराक्रमी राजांचा इतिहास लाभला आहे. तो पाल्यांना समजला पाहिजे. मुलांना गेम्स, जंक फूड, कार्टून यांविषयी पुष्कळ माहिती असते. त्याऐवजी त्यांचा तो वेळ शिवाजी महाराज आणि त्यांच्या सम राजांच्या इतिहासाची माहिती जाणून घेण्यासाठी वळता करण्यासाठी प्रयत्न करावे. म्हणूनच यासाठी बालपणापासूनच मुलांवर त्या आनुषंगाने संस्कार करावेत. जेणेकरून पुढे जाऊन ते पाल्य स्वतःहून इतरांनाही पराक्रमी राजांविषयी सांगेल.

‘छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे. पण ते शेजारच्या घरात,’ हे वाक्य अनेकदा ऐकले असेल. इतके आपण संकुचित कसे? यातून आधी बाहेर आले पाहिजे. घराघरांत शिवबा जन्माला यावेत, असे प्रत्येक कुटुंबाला वाटले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -