Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनभुजबळांची आदळआपट...

भुजबळांची आदळआपट…

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नेते मंत्री म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन दोन महिने झाले तरी पक्षातील अंतर्गत धुसफूस अजून थांबलेली नाही. आम्ही एकच आहोत, पक्षात फूट पडलेली नाही, असे शरद पवार व सुप्रिया सुळे दोघे बापलेक मधून-मधून सांगत असले तरी चाळीस आमदारांसह एक मोठा गट साहेबांचे नेतृत्व झुगारून भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला आहे, हे वास्तव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, हे सत्य आहे. अजित पवार यांनी चार वर्षांत तीन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले आहे. पण आता शिंदे- फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाल्यावर शरद पवारांवर जमेल तेवढी टीका करण्याची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यातही छगन भुजबळ हे आघाडीवर आहेत.

शरद पवार आणि अजित पवार, या काका-पुतण्यात गेली काही वर्षे शीतयुद्ध चालू आहे. ज्यावेळी २०१९ मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा ठिणग्या उडाल्या होत्या. आता २०२३ मध्ये २ जुलैला अजित पवारांनी एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ज्वाला भडकल्या. एकिकडे शरद पवारांना सर्वेसर्वा म्हणायचे, त्यांना दैवत म्हणून संबोधायचे, त्यांच्या पाया पडायचे आणि दुसरीकडे ते भाजपबरोबर जमवून घेण्यासाठी कसे उतावीळ झाले होते, याचे तारखावार गौप्यस्फोट करायचे अशी दुहेरी निती अजित पवार गटाने अवलंबिली आहे. प्रफुल पटेल, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांनी संधी मिळेल तेव्हा पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सर्वात धारदार वार छगन भुजबळ यांनी केले आहेत. ज्या भुजबळांना साहेबांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणले, त्यांचे मंत्री म्हणून पुनर्वसन केले. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यावर त्यांना पहिले प्रदेशाध्यक्ष नेमले, आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी मोठी पदे दिली, त्या साहेबांवर भुजबळ का भडकले आहेत? साहेबांच्या विरोधात ते उघडपणे आक्रमक का झाले आहेत? साहेबांच्या नावाने ते जाहीरपणे का खडे फोडत आहेत? स्वत: अजित पवार हे काकांशी कौटुंबिक संबंध कायम राखत संयम बाळगत असताना भुजबळ मात्र त्यांच्याविरोधात आदळआपट का करीत आहेत?

डिसेंबर १९९१ मध्ये नागपूरला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू असताना शिवसेनेत मोठी फूट पडली. छगन भुजबळांसह सेनेचे १६ आमदार अज्ञातवासात निघून गेले होते. त्यावेळी शरद पवार हे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. राज्यात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. तत्कालीन गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या देखरेखीखाली भुजबळांसह सेनेच्या १६ आमदारांना एका अतिथीगृहात बंदोबस्तात ठेवले होते. शिवसेना फोडण्यामागे सर्व आराखड्याचे सूत्रधार हे शरद पवार हेच होते. शिवसेनाप्रमुखांवरील निष्ठा सोडून भुजबळ काँग्रेसच्या छावणीत दाखल झाले व त्यांना तत्काळ कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. शिवसेनाप्रमुखांनी मंडल आयोगाच्या शिफारसींना विरोध केला व आपल्याला विरोधी पक्षनेते पद न देऊन ओबीसी समाजावर अन्याय केला, असा आक्रोश तेव्हा भुजबळांनी केला होता. भुजबळांवर पवार साहेबांचे संरक्षक कवच असल्यानेच भुजबळ काँग्रेसमध्ये येऊनही सुरक्षित राहिले. शिवसेनाप्रमुख मात्र कित्येक वर्षे भुजबळांना लखोबा लोखंडे म्हणून संबोधित होते. भुजबळही काँग्रेस सरकारमध्ये असताना शिवसेनाप्रमुखांना टी. बाळू म्हणून हिणवत होते.

विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेसमध्ये बंडाचा निशाण फडकवले व काँग्रेसने पवारांना पक्षातून निलंबित केल्यावर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा भुजबळांनी पवारांना सुरुवातीपासून साथ दिली. दि. १० जून १९९९ रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. भुजबळांनी पवारांचा विश्वास संपादन केला होता. पवारांनी त्यांना पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, दोन वेळा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम व अन्न नागरी पुरवठा मंत्री अशी महत्त्वाची खाती त्यांना पवारांच्या मर्जीमुळे मिळाली. पण याच भुजबळांनी यंदाच्या वर्षी २ जुलैला अजित पवारांबरोबर जाण्याचा व एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. पवारांना साथ देत असताना भुजबळ भाजप व शिवसेनेच्या विरोधात (ठाकरे गट) लढले आणि तेच भुजबळ शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत. भुजबळांचे वय आता ७५ आहे. शिवसेनेत असताना शिवसेनाप्रमुख हे भुजबळांचे गॉडफादर होते. काँग्रेसमध्ये व राष्ट्रवादीत शरद पवार हेच त्यांचे सर्वेसर्वा होते. आता मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना अजितदादांना धरून राहावे लागणार आहे.

भ्रष्टाचार व मनी लॉड्रिंगच्या आरोपावरून भुजबळांना मार्च २०१४ मध्ये अटक झाली होती. केंद्रीय चौकशी यंत्रणांनाही त्यांची चौकशी केली होती. सन २०१८ मध्ये त्यांना जामीन मिळेपर्यंत तुरुंगात राहावे लागले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात त्यांना व त्यांचा पुतण्या पंकजसह सात जणांना जामीन मंजूर केला. सन २०१४मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्र सदनचा घोटाळा चौकशीसाठी अँटी करप्शन ब्युरोकडे देण्यात आला. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन उभारणीत घोटाळा झाल्याचा इन्कार भुजबळ यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतानाही भुजबळांनी ओबीसी नेता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. याच वर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून त्यांना विनवणी करण्यात छगन भुजबळ आघाडीवर होते. नंतर साहेबांनी सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल असे पक्षाचे दोन कार्यकारी अध्यक्ष नेमल्याचे जाहीर केले. जुलैमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भुजबळ व चाळीस आमदार शिंदे-फडणवीस शरद पवारांना आव्हान देत बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्ताधारी आघाडीत सामील झाले.

पवार-भुजबळ संघर्षाची ठिणगी प्रथम येवला व नंतर बीडमध्ये उडाली आणि दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत जनतेपुढे आल्याचे दिसले. बीडमध्ये भुजबळ यांनी साहेबांच्या विरोधात प्रथमच तोफ डागली. भुजबळ म्हणाले, ‘साहेब मला एक कळलं नाही, तुम्ही २३ डिसेंबर २००३ रोजी माझ्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला, तेव्हा मी गृहमंत्री होतो. तेलगी प्रकरण चालू होते. तेलगीला मीच अटक करायला लावली होती. त्याच्यावर मी मोक्का लावला होता. कडक कारवाई केली. आणि तुम्ही मला बोलावलं व सांगितलं की राजीनामा दे… माझी काय चूक होती? राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यावर मी पहिला प्रदेशाध्यक्ष होतो. पक्षासाठी सर्व राज्यभर फिरलो. निवडणुकीनंतर विलासराव मुख्यमंत्री झाले व मी उपमुख्यमंत्री झालो. मग माझा का राजीनामा घेतला? झी टीव्हीसमोर दगडफेक झाली म्हणून मला बोलावून घेतले व राजीनामा दे म्हणून सांगितले. १९९२-९३ मध्ये (मुंबई महापालिकेचे) गो. रा. खैरनार यांनी तुमच्यावर अनेक आरोप केले होते, तेव्हा तुमचा कोणी राजीनामा मागितला नव्हता…’ उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा गेल्या महिन्यात बीडला झाली. त्या सभेत भुजबळांनी थेट पवारसाहेबांवर टीका केली. भुजबळ म्हणतात – ‘साहेब बैठकीत वेगळं बोलतात, बाहेर वेगळं बोलतात. गेले ५-६ वर्षांत साहेबांची भूमिका नेहमीच तळ्यात-मळ्यात होती. या गोष्टी आम्हाला पटत नव्हत्या. २०१४ मध्ये अजितदादांचा सकाळचा शपथविधी झाला, तर म्हणे गुगली टाकली. राजकारणात अशी गुगली टाकायची असते का? गुगलीवर स्वत:च्याच प्लेयरला आऊट करायचे असते का?’ येवल्याच्या सभेत पवारसाहेबांनी गेल्या वेळी भुजबळांना तिकीट दिले म्हणून मतदारांची माफी मागितली. त्याचा संदर्भ देऊन भुजबळ म्हणाले – ‘तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनीच स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तुम्हाला माफीच मागायची असेल, तर ५४ ठिकाणी मागावी लागेल…’

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -