Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीआरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री शिंदेंनी उठवली

आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री शिंदेंनी उठवली

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मुंबईत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. तांत्रिक बाब पूर्ण झाल्यामुळे आता कारशेडचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवाद्यांकडून अधिक आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याची शक्यता आहे.

याआधीही मुंबईतील आरे जंगलात मेट्रो कारशेडला मुंबईकर, पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. मेट्रो कारशेड हे इतरत्र ठिकाणी तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी बिबट्यांचा अधिवास असून जैवविविधता असल्याचे पर्यावरणवाद्यांनी म्हटले होते. आरेमधील बांधकामामुळे जंगलच नव्हे तर इथे असलेल्या जैवविविधतेवरही परिणाम होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने २०१९ मध्ये आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी संध्याकाळी वृक्षतोड सुरू केली होती. त्यावेळी स्थानिक आदिवासींसह पर्यावरण प्रेमींकडून रात्रभर आंदोलन सुरू होते. अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला स्थगिती देत कांजूर येथील जागेसह इतर पर्यायांवर विचार सुरू केला. कांजूर येथील जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. मागील महिन्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या नव्या सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे येथील मुंबईकर आणि पर्यावरण प्रेमींकडून दर रविवारी या निर्णयाला विरोध म्हणून निषेध करण्यात येत आहे.

एक लाख कोटींच्या डीलसाठी आरेचा बळी; पर्यावरणवाद्यांचा आरोप

आरेतील मेट्रो-३ चे कारशेड उभारून येथील जमिनीचा व्यावसायिक वापर आणि कांजूरमार्ग येथील पर्यायी जागाही विकासकांना देण्याचा डाव असून या दोन्ही जागांसाठी सुमारे एक लाख कोटींची डील असल्याचा गंभीर आरोप आरोप ‘आरे कन्झर्वेशन ग्रुप’ने एका पत्रकार परिषदेत केला होता. कांजूरमार्ग येथील जागा ही मेट्रो-३सह, मेट्रो ४, मेट्रो ६ आणि मेट्रो १४ साठीदेखील फायदेशीर ठरणार असल्याचा दावा आरे बचाव कार्यकर्त्यांनी केला आहे. कांजूरमार्ग येथील जागा ही महाराष्ट्राचीच असताना राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा खासगी मालकीची असल्याचे सांगत दिशाभूल करत असल्याचा आरोपही ‘आरे बचाव’च्यावतीने करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -