Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीvirtual classrooms : ‘आयटीआय’मध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे मुख्यमंत्री एकनाथ...

virtual classrooms : ‘आयटीआय’मध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आता व्हर्च्युअल क्लासरूम (virtual classrooms) सुरू करण्यात येणार आहे. तसेच कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुम/ स्मार्टरुमचे (Virtual Class Room / Smart Class Room) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आयुक्त डॉ रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांची उपस्थिती होती. तर राज्यातील विविध आयटीआयमध्ये लोकप्रतिनिधींसह ७५ आयटीआयचे प्रशिक्षणार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. अतिदुर्गम भागातील होतकरु प्रशिक्षणार्थींनाही कमी साधनसामग्रीसह जगातील अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग प्रयत्नशील आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यात ७५ व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यात एकूण ९० क्लासरूम तयार आहेत. व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरअक्टिव पॅनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

आयटीआयमध्ये आता पारंपरिक शिक्षण न देता स्पर्धात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तरुणांना कुशल बनवण्याबरोबरच उद्योग निर्मिती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. तरुणांसाठी रोजगार निर्मितीपेक्षा रोजगार देणारे हात तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

राज्य शासनाने एक वर्षात ७५ हजार नोकऱ्या देण्याचा संकल्प केला असून प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम घेतला आहे. अधिसंख्य पदाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यामध्ये उद्योग आणण्यासाठी 600 सामंजस्य करार करण्यात आले. तीन लाख रोजगार देण्यात आले. देशाला विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान असणार आहे असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

राज्य उद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग आले तरच रोजगार उपलब्ध होणार आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे ही शासनाची जबाबदारी आहे. यासाठी शासन परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. दावोस औद्योगिक परिषदेत १.३७ हजार सामंजस्य करार करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात आणण्यात आली. आपण उद्योगांना चांगल्या सोयीसुविधा निर्माण करून दिल्या आहेत. तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे.काळाची आवश्यकता पाहून जगातील विकसित कौशल्य प्रशिक्षणार्थींना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर मुख्य सचिव श्री. आशिषकुमार सिंह यांनी केले. सूत्रसंचालन प्रिया सावंत यांनी तर आभार संचालक दिगांबर दळवी यांनी मानले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -