Friday, May 17, 2024
Homeक्रीडाIPL 2024चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर

चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर

दिल्ली बिघडवणार सुपर किंग्जचे गणित?

  • वेळ : दुपारी ३.३० वा.
  • ठिकाण : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील साखळी गटातील लढतींनी चांगलाच रंग भरला असून प्ले ऑफ प्रवेशाची चुरसही वाढली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दिल्लीच्या संघाला त्यांच्याच घरात पराभूत करण्याचे आव्हान तुलनेने तगड्या चेन्नईसमोर आहे. करिष्माई कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली सुपर किंग्ज शनिवारी कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवून प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.

यंदाच्या मोसमातील या दोन संघांमधील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला पराभवाची चव चाखली होती. त्याची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान चेन्नईच्या संघासमोर आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. चेन्नईने आजचा सामना जिंकला, तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो दुसरा संघ ठरेल. मात्र चेन्नईचा पराभव झाला, तर संघाला दुसऱ्या संघाच्या निकालावर त्यांना अवलंबून राहावे लागेल.

दिल्ली कॅपिटल्स संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे; परंतु या हंगामाचा शेवट गोड करून चेन्नईचे समीकरण बिघडवण्यात दिल्ली कोणतीही कसर सोडणार नाही. चेन्नईचा संघ सध्या १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पण दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतरांच्या गणितावर अवलंबून राहावे लागेल. विजयामुळे चेन्नईचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित होईल. परंतु ते दुसरे स्थान मिळवतील की नाही? हे लखनऊ आणि कोलकाता यांच्यातील सामन्यावर ठरेल. लखनऊचेही १५ गुण आहेत. पण चेन्नईचा रनरेट चांगला आहे.

फिरोजशाह कोटलाची विकेट संथ असून धोनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. जडेजा, मोईन अली आणि महिश तिक्षणा यांनीही फिरकी विभागात चांगली छाप पाडली आहे. ऋतुराज, डेव्हन कॉनवेने यांनी मोसमात चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कल्याणचा सुपुत्र तुषार देशपांडेने या मोसमात संघासाठी सर्वाधिक १९ विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे पंजाब किंग्जवर १५ धावांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर दिल्लीचा संघ आत्मविश्वासासह या सामन्यात उतरेल. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघ या सामन्यातही कोणत्याही दबावाशिवाय खेळेल आणि अशा स्थितीत चेन्नईला सावध राहावे लागेल. अक्षर पटेल वगळता दिल्लीच्या संघातील इतर भारतीय फलंदाज या हंगामात अपयशी ठरले. दिल्लीने आतापर्यंत जे जे सामने जिंकले आहेत, त्यात त्यांच्या गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी फिरकी विभाग चांगल्या प्रकारे हाताळला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियालाही आपली लय सापडली आहे. आता वार्नरसेना धोनीच्या विजयाच्या अपेक्षांना ब्रेक लावून चेन्नई एक्स्प्रेसचे प्ले ऑफ प्रवेशाचे स्वप्न धुळीस मिळवेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण मुंबईकरांचेही प्लेऑफचे भवितव्य यावर अवलंबून आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -