Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सनोकरीच्या नावाने झाली फसवणूक

नोकरीच्या नावाने झाली फसवणूक

  • गोलमाल : महेश पांचाळ

चेन्नईतून मुंबई ‘रिटर्न’

चेन्नईला मर्चंट नेव्हीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी होती. ‘नोकरी डॉट कॉम’वर पाहिलेल्या जाहिरातीनंतर रविकांत शेणईला (नाव बदलेलेले) आपण या पदासाठी अर्ज करावा, असे वाटले. रविकांतने आपला प्रोफाइल ‘नोकरी डॉट कॉम’ या वेबसाइटवर टाकला. हा प्रोफाइल पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हितेशकुमार शर्मा नावाच्या व्यक्तीचा रविकांतला फोन आला.

सीएमए सीजीएम किंवा मर्चंट नेव्हीमध्ये वरिष्ठ एचआर रिक्रूटमेंट ऑफिसर या पदावर भरती होणार असल्याचे रविकांतला सांगण्यात आले. त्यानुसार रविकांतने व्हॉट्सअॅपवर कागदपत्रे हितेशकुमारला पाठविली. तसेच युनिक प्लेसमेंट/सीएमए सीजीएमच्या ईमेलवर काही कागदपत्रे मागितले. यादरम्यान हितेशकुमार शर्माकडून अर्जदार रविकांतला मेडिक्लेम, स्टे इन कंपनी (राहण्याची व्यवस्था), इमिग्रेशन, सिक्युरिटी चार्ज, व्हिसाच्या नावावर टप्प्याटप्प्याने त्याच्या एचडीएफसी बँक खात्यात ट्रान्सफर करायला सांगितले. जसे सांगण्यात येत होते, तसे पैसे ट्रान्सफर केले जात होते. ही रक्कम होती ४ लाख ४७ हजार रुपये इतकी. रविकांतला जॉइनिंग लेटर पाठवण्यात आले होते. नोकरी पक्की होती. त्यामुळे आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन तो मुंबईतून चेन्नईला निघाला. हितेशने जो पत्ता दिला होता, त्या पत्यावर रविकांत तेथील मुख्यालयात पोहोचला; परंतु तिथे पोहचल्यानंतर अशा कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सध्या सुरू नसल्याचे सांगण्यात आले, तेव्हा रविकांत आतून कोसळला. आपण फसलो गेलो याची त्याला जाणीव झाली; परंतु दुसऱ्या राज्यात एकटाच. आता काय करावे? हे त्याला कळत नव्हते. नोकरीच्या आशेने सुमारे साडेचार लाख रुपये हातून गेल्याची जाणीव त्याला झाली.

आपली फसवणूक झाल्यामुळे काही जवळचे मित्र आणि घरच्या मंडळींना त्याने फोन केला. त्याचे पूर्ण अवसान गळून पडले होते; परंतु आई-वडिलांनी त्याला मोबाइलवरून संवाद साधत सावरण्याचा प्रयत्न केला. ‘पैसे गेले तर जाऊ दे. तु सुखरूप घरी परत ये’ असा धीर घरच्या मंडळींनी दिल्यानंतर स्वत:ला सावरत रविकांत मुंबईत परतला. तो दहिसर परिसरात राहतो. त्यामुळे आपली जशी फसवणूक झाली, तशी इतरांची होऊ नये, या हेतूने त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. झालेला सर्व प्रकार आणि एचडीएफसी बँकेत हस्तांतरण केलेले पैसे, ईमेलद्वारे केलेले पत्रव्यवहार याच्या तपशीलासह रविकांतने दहिसर पोलीस ठाण्यात २८ एप्रिल रोजी रितसर तक्रार दाखल केली. दहिसर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

दहिसर पोलिसांचे सायबर अधिकारी अंकुश दांडगे यांनी बँक तपशील आणि तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर संशयित आरोपी हा दिल्ली परिसरात असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण चार पथके तयार करण्यात आली. त्यापैकी एका पथकाकडून मोठ्या शिताफीने आरोपी रविकुमार अशोककुमार शर्मा (३०) याला बेगमपूर नवी दिल्ली येथून अटक करण्यात आली. मात्र रविकांतशी बोलताना त्याने स्वत:चे नाव हितेश असे सांगितले होते, ही बाब तपासात उघड झाली. सध्या आरोपी रविकुमार शर्मा हा पोलीस कोठडीत आहे. त्याने अशा पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची माहिती उघड झाली आहे. तो एकटा आहे की नोकरीच्या नावाने फसवणूक करणारे मोठे रॅकेट आहे? याचा शोध पोलीस घेत आहे.

naukri.comच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला मुंबईतील दहिसर पोलिसांना अटक करण्यात यश आले असले तरी नोकरीच्या नावावर बाजारात मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत. कधी कधी जॉबसाठी प्रयत्न करत असताना काही कागदपत्रासोबत पैसे भरावे, असे सांगितले जाते; परंतु ती रक्कम छोटी असल्याने पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार येत नाहीत. मात्र Naukari.com या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्याची लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरी डॉट कॉम किंवा अन्य वेबसाइटच्या माध्यमातून जर आपली फसणवणूक झाली असेल, तर तक्रारीसाठी विद्यार्थी किंवा पालकांनी पुढे यावे, असे पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ १२ स्मिता पाटील यांनी दिली आहे.

तात्पर्य : ऑनलाइनच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून फसविण्याचे ताजे प्रकरण असो किंवा आतापर्यंतच्या इतर प्रकरणांत सायबर गुन्ह्यात पकडलेले आरोपी हे महाराष्ट्राबाहेरचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ज्याची कधी भेट झालेली नाही. त्याला कधी पाहिले नाही, अशा व्यक्तींवर विश्वास ठेवून लाखो रुपयांचा व्यवहार आपण करणार असाल, तर फसगत होण्याचा धोकाही तितकाच आहे.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -