Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024चहलची फिरकी; यशस्वीचे फटके

चहलची फिरकी; यशस्वीचे फटके

राजस्थानकडून कोलकाताचा सुपडा साफ

ईडन गार्डन्स (वृत्तसंस्था) : युजवेंद्र चहल, आणि यशस्वी जयस्वाल यांच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतील धडाक्यापुढे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ झुकला. कोलकाताने दिलेले माफक आव्हान राजस्थानने ९ विकेट आणि ४१ चेंडू राखून सहज पार केले. विजयामुळे राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान कायम असून कोलकाताला मात्र गाशा गुंडाळावा लागला आहे.

कोलकाताने दिलेले १५० धावांचे लक्ष्य राजस्थानने सहज गाठले. जोस बटलर भोपळीही न फोडता माघारी परतला. त्याला रसेलने धावबाद केले. त्यानंतर मात्र यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी कोलकाताला विजयाचे स्वप्न पडण्याचीही संधी मिळू दिली नाही. यशस्वीने १२ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करत ४७ चेंडूंत नाबाद ९८ धावा फटकवल्या. त्याने कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याच्या तावडीतून एकही गोलंदाज सुटला नाही. दुसऱ्या बाजूने कर्णधार संजू सॅमसनने नेतृत्वाला साजेशी अशी खेळी खेळली. त्यानेही मोठ्या फटक्यांची बरसात कायम ठेवली. संजूने २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २९ चेंडूंत नाबाद ४८ धावा तडकावल्या. त्यामुळे राजस्थानने १३.१ षटकांत एका फलंदाजाच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. कोलकाताचे जवळपास सगळेच गोलंदाज महागडे ठरले. जोस बटलर धावबाद झाला. तो वगळता कोलकाताच्या एकाही गोलंदाजाला बळी मिळवता आला नाही.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला १४९ धावांत रोखले. राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहलसमोर केकेआरच्या भल्या भल्या फलंदाजांनी हातच टेकले. युझवेंद्र चहलने नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, शार्दुर ठाकूर आणि रिंकू सिंह या चार फलंदाजांची शिकार केली. याचबरोबर युझवेंद्र चहल हा आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला. केकेआरकडून संथ सुरूवात करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. आपल्या होम ग्राऊंडवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थानचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टने पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. बोल्टने सलामीवीर जेसन रॉयला १० धावांवर, तर रहमनुल्ला गुरबाजला १८ धावांवर बाद केले. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर केकेआरला पॉवर प्लेमध्ये ३७ धावाच करता आल्या. पॉवर प्लेमधील संथ सुरूवातीनंतर नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी केकेआरचा डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. अय्यरनेही आपपला गिअर बदलला होता. मात्र ही जोडी युझवेंद्र चहलने फोडली. त्याने राणाला २२ धावांवर बाद केले. यानंतर आक्रमक झालेल्या अय्यर आणि आंद्रे रसेल यांनी केकेआरला १३ व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र त्यानंतर केएस आसिफने रसेलला १० धावांवर बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -