Sunday, May 19, 2024
Homeदेशसीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन

सीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन

सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नीचादेखील अपघातात मृत्यू

कुन्नूर : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. या अपघातात रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले आहे. तर हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बुधवारी दुपारी तामिळनाडूच्या कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर भागात भारतीय हवाई दलाचे एमआय १७५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळून हा अपघात घडला.

कुन्नूर येथील डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तेथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातात सीडीएस बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान रावत यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली.

मृतांमध्ये बिपिन यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, तसेच अधिकारी ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल, आदी १३ जणांचे या अपघातात निधन झाले आहे.

दरम्यान बिपिन रावत हे एका व्याख्यानमालेत सहभागी होणार होते.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि अन्य अधिकारी या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. यावेळी घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र अपघात झालेले ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तेथे पोहोचण्यास अडचणी येत होत्या.

जनरल बिपीन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान बिपिन रावत यांचे पार्थीव गुरुवारी नवी दिल्ली येथे आणण्यात येणार आहे.

‘हेलिकॉप्टर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर आदळत होते’

तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरी जंगलात भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. दरम्यान हे हेलिकॉप्टर पडताना पाहिलेल्या एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने घटनेचे गांभीर्य सांगितले. त्याचे नाव कृष्णासामी आहे. ‘अचानक एक मोठा आवाज ऐकला. यामुळे घरातून बाहेर आलो तेव्हा एक हेलिकॉप्टर एका झाडावर आदळून दुसऱ्या झाडावर आदळत पेटले. जेव्हा ते आदळत होते तेव्हा त्याला आग लागली होती.
याचवेळी २-३ जण त्या हेलिकॉप्टरमधून उडी मारत होते. सर्वांचे शरीर आगीने वेढलेले होते.’, असे कृष्णासामीने म्हटले.

बिपीन रावत यांच्याविषयी…

बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचे बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले.

वरुण सिंह

भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वरुण सिंह यांनी २०२० मध्ये एका मोठ्या संकटातून तेजस लढाऊ विमानाला वाचवले होते. त्यांच्या या धाडसामुळेच त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

यापूर्वीही मृत्यूच्या दाढेतून बचावले होते बिपीन रावत

सीडीएस बिपिन रावत यांचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०१५ मध्ये बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी ही घटना घडली होती. त्यावेळी बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले नव्हते. त्यांची २०१६ मध्ये सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. रावत हे देशातील पहिले सीडीएस आहेत. लेफ्टनंट जनरल बिपिन रावत त्यावेळी नागालँडमधील दिमापूर येथील लष्कराच्या ३-कॉर्प्सच्या मुख्यालयाचे प्रमुख होते. त्यांच्या चित्ता हेलिकॉप्टरने दिमापूर सोडले होते. पण काही उंचीवर त्यांचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपिन रावत या अपघातातून बचावले होते.

लष्कराकडून अतीव दु:ख व्यक्त

भारतीय लष्कराने हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत असताना बिपीन रावत यांच्या योगदानाबाबत भाष्य केले आहे. पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी लष्कराच्या उच्च संरक्षण संघटनांमध्ये अतिशय महत्त्वाच्या दूरगामी सुधारणांचा प्रारंभ केला. देशी बनावटीच्या लष्करी सामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्यामध्ये आणि भारताच्या संयुक्त थिएटर कमांडचा पाया घालण्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यांनी दिलेला हा वारसा पुढे सुरू राहील, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

चीनला दिला होता इशारा

जनरल बिपीन रावत यांनी नेहमीच पाकिस्तानच्या तुलनेत चीनला सर्वात मोठा शत्रू मानले होते. कोणत्याही गैरप्रकाराला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. पुन्हा गलवानसारखी घटना घडला तर त्यांना मागच्या वेळी दिलेल्या भाषेतच उत्तर मिळेल, अशा शब्दांत त्यांनी चीनला इशारा दिला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -