Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBrother sister relationship : “फुलोंका तारोंका सबका कहना हैं...”

Brother sister relationship : “फुलोंका तारोंका सबका कहना हैं…”

  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

सत्तरच्या दशकात “हरे राम हरे कृष्ण” चळवळ पाश्चिमात्य तरुण-तरुणीत खूप लोकप्रिय झाली होती. सुंदर गोऱ्यापान शरीरावर उठून दिसणारी भगवी वस्त्रे, डोक्याचा चमनगोटा केलेला, हातात मृदंग, कपाळावर गंध लावलेले तरुण ‘हरे रामा हरे कृष्णा’चा जप करत लंडनच्या ट्राफलगार स्ट्रीटवरसुद्धा फिरताना दिसत. त्या काळी हिप्पी पंथही खूप पसरला होता. नंतर त्यात अमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्याही शिरल्या.

याला अनेक कारणे होती. औद्योगिक संस्कृतीत जगणे यंत्रवत झाल्यामुळे जगण्यातला निवांतपणाच संपला. कुटुंबाच्या विघटनामुळे तरुणवर्गाला मोठ्या भावनिक पोकळीला सामोरे जावे लागत होते. भौतिक सुबत्ता विपुल; परंतु मनाला शांती नाही, त्यात टोकाचे एकटेपण संवेदनशील मनांना असह्य झाले. त्यातून काहीजण अमली पदार्थांच्या आहारी गेले, तर काही पौर्वात्य अध्यात्मात मन:शांतीचा शोध घेऊ लागले. त्यातूनच ही ‘हरे राम हरे कृष्ण’ चळवळ वाढली. भारतातही हे लोण लगेच पोहोचले. देव आनंदने १९७१ साली काढलेला ‘हरे राम हरे कृष्ण’ हा सिनेमा याच विषयावरचा!

देव आनंद एकदा काठमांडूत गेला होता. तिथे त्याच्या जर्मन मित्राचा फोन आला. तो एक डॉक्युमेंटरी करायला तिथेच आलेला होता. मित्राने सांगितले की, काठमांडूत एका ठिकाणी परदेशी लोक एकत्र येतात. मग काय? देवसाहेब पोहोचले, तिथे काय असते ते पाहायला! तिथल्या पार्टीत सगळ्या परदेशी मुला-मुलीत एक तरुणी मात्र अजिबात परदेशी वाटत नव्हती.

देवसाहेबांनी वेटरला तिच्याविषयी विचारले. त्याने दुसऱ्याच दिवशी दोघांची भेट घडवून दिली. कॅनडातून पळून आलेल्या त्या मुलीचे नाव होते ‘जसबीर’. पण ती सांगत होती ‘जेनिस.’ देवसाहेबांना आपल्या पुढच्या सिनेमाची कथाच मिळाली! तोच ‘हरे राम हरे कृष्ण.’

देवसाहेबांनी स्वत:च कथा लिहून प्रमुख भूमिकेसाठी निवडले झीनत अमान, मुमताज व प्रेम चोपडाला! संगीत मिळाले आरडींचे आणि गाणी लिहिली आनंद बक्षीजींनी!

माँट्रीयल इथे राहणाऱ्या जयस्वाल कुटुंबांची ही कथा. पती-पत्नीतील टोकाच्या मतभेदामुळे घटस्फोट होतो आणि श्रीमती जयस्वाल छोट्या प्रशांतला (देव आनंद) घेऊन भारतात परत येतात. चिमुकली जसबीर (झीनत अमान) नव्या आईसह वडिलांबरोबर कॅनडातच राहते. तिला तिच्या आयाने सांगितले असते की, तुझी आई आणि भाऊ वारलेले आहेत. त्यामुळे तिला त्यांची काहीच आठवण राहत नाही.

पुढे एक दिवस प्रशांतला वडिलांचे पत्र येते की, जसबीर घरातून निघून गेली आहे आणि काठमांडूत कुठेतरी राहते आहे. वडिलांच्या सांगण्यावरून तो तिला शोधतो तेव्हा त्याला हिप्पी लोकांच्या टोळीत एक मुलगी सापडते. तीच जसबीर असली तरी आपले नाव जॅनीस असल्याचे सांगून त्याला टाळते. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या बहिणीला त्यातून सोडवून घरी परत नेण्यासाठी भावाने केलेल्या धडपडीची ही कहाणी!

त्यात एका प्रसंगात प्रशांत दोघा बहीण-भावाने लहानपणी म्हटलेले गाणे गाऊन बहिणीच्या स्मृती जाग्या करण्याचा प्रयत्न करतो. आनंद बक्षीजींचे ते गाणे किशोरदा आणि लतादीदींनी गायले. शब्द होते –
‘फूलोंका, तारोंका, सबका कहना हैं,
एक हजारोंमें मेरी बहना हैं…
सारी उमर, हमें संग रहना हैं…

लहानपणी छोटी झीनत हे गाणे म्हणताना भावाने केलेल्या कौतुकाने हरखून जायची. आता मात्र अमली पदार्थाच्या प्रदीर्घ सेवनामुळे तिची स्मृती, विचार करण्याची क्षमताही, कमी झालेली आहे. गाणे कानावर पडताना फक्त बालपणीची अंधुक, अस्पष्ट दृश्ये आठवू लागतात. प्रशांत तिचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना म्हणतो, ‘तू जेव्हापासून दूर गेलीस तेव्हापासून आम्ही फार दु:खात आहोत. डोळ्याला डोळा लागत नाही. आयुष्यातील सगळे सौख्यच हरवले आहे –
जबसे मेरी आँखोंसे हो गयी तू दूर,
तबसे सारे जीवनके सपने हैं चूर
आँखोंमें नींद ना मनमें चैना हैं
एक हजारोंमें…

‘बहीण आणि भाऊ हे एकाच झाडाच्या दोन फांद्यासारखे असतात. मी तुला विसरलो नाही, मग तू मला कसे काय विसरलीस?’ तू मला का ओळख देत नाहीस? या भावाजवळ तू हक्काने येऊन आपले मन मोकळे कर ना –
देखो हमतुम दोनों हैं इक डालीके फूल,
मैं ना भूला, तू कैसे मुझको गई भूल..
आ मेरे पास आ, कह जो कहना हैं,
एक हजारोंमें मेरी बहना हैं…

आनंदजींनी गाण्यात आजवर अगणित विषय हाताळले आहेत. या गाण्यात त्यांनी अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांसाठी खूप छान संदेश सहज गुंफला आहे. जीवनात दु:ख तर येणारच. पण त्याला घाबरून कसे चालेल? दु:खाला घाबरून, टाळून, पुढे जायचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. माणसाने दु:खाला हिमतीने तोंड दिले पाहिजे. सुख हवे असेल, तर थोडे दु:ख भोगून त्या सुखाची किंमत मोजली पाहिजे –
जीवनके दुखोंसे यूँ डरते नहीं हैं,
ऐसे बचके सचसे गुज़रते नहीं हैं,
सुखकी हैं चाह तो, दुःख भी सहना हैं.
एक हज़ारोंमें…

कुणालाही समजावताना त्याचीही बाजू लक्षात घ्यावी लागते. म्हणून गीतकार पुढे म्हणतात -‘लोकांनी तुझे मन समजावून घेतले नाही ही त्यांची चूकच होती. पण मी तर तुझा भाऊच आहे. मला तुझ्या डोळ्यातली प्रेमाची तहान स्पष्ट दिसतेय. तू माझ्याजवळ ये आणि आपले मन मोकळे कर. माझी बहिण तर हजारात एक आहे ना! मग ती माझ्यापासून अशी दूर कशी राहू शकते?….
ये न जाना दुनियाने, तू हैं क्यों उदास,
तेरी प्यासी आँखोंमें, प्यारकी हैं प्यास,
आ मेरे पास आ, कह जो कहना हैं…
एक हजारोंमें…

लहानपणी तर तू आमच्यासाठी एका सुंदर जपानी बाहुलीच होतीस. आई आणि बाबा आजही तुझी आठवण काढतात. ते म्हणतात आपल्या सर्वांना आयुष्यभर बरोबर राहायचे आहे ना? मग बेटा, तू आपल्या हक्काच्या घरी परत चल ना –
भोली-भाली जापानी गुड़िया जैसी तू
प्यारी-प्यारी जादूकी पुड़िया जैसी तू
डैडीका, मम्मीका, सबका कहना हैं…
सारी उमर हमें…

पूर्वी सगळी नाती किती घट्ट होती. कुटुंब हा माणसाचा केवढा पक्का भावनिक आधार असायचा! जसजसा माणूस कुटुंबांपासून दूर गेला तसतसा तो दुर्बल, विमनस्क, अस्थिर मनाचा झाला. भलत्याच गोष्टी आणि विचारांच्या आहारी जावून आयुष्य दु:खी करून घेत गेला. हे सगळे तब्बल ५२ वर्षापूर्वी ओळखून ते समाजापुढे मांडणारे कलाकार, दिग्दर्शक गीतकार किती द्रष्टे असतील ना? त्याच काळाचा तर हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -