Sunday, May 19, 2024
Homeदेशगुजरातेत पूल तुटला, १९० हून अधिक ठार

गुजरातेत पूल तुटला, १९० हून अधिक ठार

पुलाखाली अडकलेले असू शकतात मृतदेह, चिखलामुळे शोधणे कठीण, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

गांधीनगर : गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी सकाळी १९० वर पोहोचली आहे. यात २५ मुले आहेत. मृतांमध्ये महिला आणि वृद्धांचाही समावेश आहे. १७० जणांची सुटका करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता ७६५ फूट लांब आणि अवघ्या ४.५ फूट रुंद केबल झुलता पूल कोसळून ही दुर्घटना घडली. १४३ वर्षे जुना हा पूल ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आला होता.

गेल्या ७ महिन्यांपासून हा पूल बंद होता. त्याची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर दुर्घटनेच्या ५ दिवस आधी २५ ऑक्टोबरला हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. रविवारी येथील गर्दी क्षमतेपेक्षा जास्त होती. हेदेखील अपघाताचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

एनडीआरएफ, आर्मी आणि एअर फोर्सचे पथक बचाव कार्यात गुंतले आहेत. मच्छू नदीतील पाणी कमी करण्यासाठी चेकडॅम तोडण्यात येत आहे.

काही महत्वाचे अपडेट्स

१. मोरबी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे पोस्टमॉर्टम होणार नाही.

२. राजकोटमधील भाजप खासदाराच्या कुटुंबातील १२ जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

३. एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने पुलाखाली मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली आहे.

४. हेल्पलाइन क्रमांक 02822243300 जारी केला आहे. मोरबी आणि राजकोटच्या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वॉर्ड करण्यात आले आहेत.

याप्रकरणी ब्रिजच्या व्यवस्थापन कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या दुर्घटनेत ८ लोकांचे प्राण वाचवणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, येथे हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. ज्यांना पोहता येत होते ते पोहत बाहेर पडत होते. मुले बुडत होती, आम्ही त्यांना आधी वाचवले. त्यानंतर ज्येष्ठांना बाहेर काढण्यात आले. पाइपच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढले जात होते.

मोरबीचे भाजप खासदार मोहन कुंडारिया यांनी सांगितले की, पूल कोसळल्यामुळे लोक जिथे पडले तिथे १५ फूट पाणी होते. काही लोक पोहत बाहेर आले, पण बरेच लोक अडकून राहिले.

हा पूल महापालिकेच्या अखत्यारीत येतो, असे रस्ते व इमारत विभागाचे मंत्री जगदीश पांचाळ यांनी सांगितले. पुलाची क्षमता १०० लोकांची असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र रविवार सुटीचा दिवस असल्याने अपघाताच्या वेळी पुलावर ४०० ते ५०० लोक जमा झाले होते. यामुळे पूल मधूनच तुटला.

केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार;

राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाइकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पटेल यांनी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -