Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीBRICS Summit 2023 : BRICS मध्ये आणखी सहा देशांचा समावेश; ब्रिक्स झालं...

BRICS Summit 2023 : BRICS मध्ये आणखी सहा देशांचा समावेश; ब्रिक्स झालं ब्रिक्स प्लस!

ब्रिक्स परिषदेत चांद्रयानाच्या कौतुकाबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार

जोहान्सबर्ग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर आहेत. दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे सुरु असलेल्या ब्रिक्स (BRICS) परिषदेत नुकतीच मोठी घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामाफोसा (Cyril Ramaphosa) यांनी ही घोषणा केली आहे. ब्रिक्सचा आता विस्तार झाला असून, त्यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे.

ब्रिक्समध्ये याआधी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश होता. त्या देशांच्या आद्याक्षरांवरूनच संघटनेला ब्रिक्स असं नाव देण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश झाल्याने ब्रिक्स संघटनेतील सदस्य देशांची संख्या ११ झाली आहे. ब्रिक्समध्ये इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचा समावेश करण्यात आला असून, या संघटनेचं नामकरण ब्रिक्स प्लस असं करण्यात आलं आहे.

रामाफोसा यांनी सांगितले की, ब्रिक्सच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्याला आमची सहमती आहे. तसेच इतर टप्पे यानंतर पार पडतील. सध्या आम्ही अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला ब्रिक्सचे पूर्ण सदस्य बनण्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे देश १ जानेवारीपासून संघटनेचे सदस्य बनतील.

चांद्रयानाच्या कौतुकाबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार

आज ब्रिक्स संमेलनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी चांद्रयानाच्या यशाबद्दल भारताचे अभिनंदन करणाऱ्या राष्ट्रांचे आणि राष्ट्रप्रमुखांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या यशाचे वर्णन मानवतेचे यश असे केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. हे यश संपूर्ण मानवतेच्या यशाशी जोडले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगी भारतातील लोक आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या वतीने मी जगातील इतर वैज्ञानिकांचे आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्व देशांचे आभार मानतो.

तसेच आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी ब्रिक्सच्या विस्ताराचे समर्थन केले. ते म्हणाले, नवीन सदस्य जोडल्याने ब्रिक्स, ही संघटना मजबूत होईल, असा भारताचा विश्वास आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी माझे मित्र रामाफोसा (दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष) यांचेही आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -