Saturday, May 18, 2024

हद्द

  • संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

काही वर्षांपूर्वी कुठल्याशा मासिकात मी पाहिलेलं एक व्यंगचित्र मला आज नव्यानं आठवलं. त्या व्यंगचित्रात एक चोर आणि त्याच्यामागे एक पोलीस पळताना दाखवला होता. पोलीस एका रेघेपाशी येऊन थांबलाय आणि पळणाऱ्या त्या चोराला म्हणतोय, ‘जा मर. हवा तिकडे जा. माझ्या पोलीस स्टेशनची हद्द संपलीये…’

त्यावेळी ते व्यंगचित्र पाहून मला मोठी गंमत वाटली होती. पण आज अंतर्मुख होऊन विचार केल्यानंतर जाणवतंय की, त्या व्यंगचित्रकाराने रेषांच्या फटकाऱ्यातून समाजातल्या केवढ्या मोठ्या दुरवस्थेवर फटकारा मारला होता.

या पोलीस स्टेशनची हद्द इथपर्यंत, त्या पोलीस स्टेशनची हद्द तिथपaर्यंत… गुन्हा नेमका कोणाच्या हद्दीत घडलाय याच्यावर आधी वितंडवाद होतात आणि नंतर तक्रार नोंदवून घेतली जाते ही वस्तुस्थिती. दुर्दैवाने अजूनही तशीच आहे.

काहीजणांच्या बाबतीत तर म्हणे एकच इमारत दोन-दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. म्हणजे एकाच फ्लॅटमधला हॉल एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत, तर बेडरूम दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत.

अशा वेळी नवरा बायकोचं भांडण विकोपाला जाऊन कधी पोलीसात तक्रार करायची झाली, तर भांडण सुरू झालं आणि कुठे संपलं. त्याची हद्द ठरवणं हेच मोठं कटकटीचं काम असेल नाही का? असो…! यातला विनोदाचा भाग सोडून दिला तरी मूळ प्रश्न कायम उरतोच की हद्द कुठे सुरू होते आणि कुठे संपते…? हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे मागे अशीच एक बातमी पेपरात वाचली होती.

अंकलेश्वर वऱ्हाणपूर महामार्गावर तापी नदीवर एक पूल आहे. त्या पुलाचा निम्मा भाग सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर उर्वरित भाग दोंडईच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. एका युवकाने या पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. त्या तरुणाचा मृतदेह तीन दिवस पाण्यावर तरंगत होता. दिवसभरात या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो नागरिकांनी पुलावर थांबून त्या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिला. मात्र हा मृतदेह दोंडाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे की सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत? यावर विचारमंथन सुरू असल्यामुळे त्या मृतदेहाला कुणीही वाली नव्हता.

हद्द ठरवण्याची ही सत्य घटना… पण हा हद्द ठरविण्याचा प्रकार केवळ पोलीसांच्याच बाबतीत होतो असे नाही, तर पूर्वी फायर ब्रिगेडच्या बाबतीतही असे झाल्याचीही उदाहरणे आहेत.

हद्द ठरवण्याच्या वादात वादात वेळेचा अपव्यय होतो. बराच वेळ विनाकारण वाया जातो. कामं अडून रहातात. नुकसान वाढतच जातं. वास्तविक हद्द ही संकल्पना आपली कामं सुलभ होण्यासाठी केली गेली आहे. कामाची विभागणी करताना एकाच व्यक्तीवर किंवा एका गटावर कामाचा बोजा पडू नये म्हणून त्यांच्या कर्यक्षेत्राच्या मर्यादा निश्चित करण्यासाठी वेगवेगळे विभाग केले आणि त्या त्या विभागाची हद्द ही संकल्पना अस्तित्वात आली. पण पुढे…

पुढे या हद्दीने मात्र हद्दच केली. विचार करा, आग लागलेली इमारत आमच्या वॉर्डच्या हद्दीत येत नाही, असं अग्निशमन केंद्रानं उत्तर दिलं, तर काय होईल?

अपघात झालेली गाडी आमच्या हद्दीत नाही, असं पोलीस म्हणू लागले, तर जखमींचं काय होईल?

खरं तर अपघातात सापडलेल्या व्यक्तीला तातडीने मदतीची आवश्यकता असते. अशा वेळी पोलिसांची हद्द ठरवणं, पंचनामा करणं, त्यावर पंचांच्या सह्या घेणं, हा अपघात की घातपात? याची चौकशी वगैरे होईपर्यंत अनेकदा अपघातात सापडलेल्या त्या व्यक्तीचा मृत्यूही होण्याची शक्यता असते. अशा वेळी हद्द म्हणजे कामामध्ये अडथळा निर्माण करणारे कुंपण ठरते.

हे कुंपण आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतं. कोणत्याही सरकारी, निमसरकारी कचेरीत गेलात, तर ‘हे काम आमच्या सेक्शनचं नाही.’ असं उत्तर कधी ना कधी तरी तुम्हाला मिळालं असेलच. अनेकदा ही हद्द आपल्या घरातदेखील ठरविली जाते. ‘हे काम माझं नाही. हे काम बायकांचं’, असं सांगून पुरुष बऱ्याच कामातून अंग काढून घेतात.

‘स्वयंपाक, धुणी-भांडी, केर काढणं ही कामं बायकांची.’ असं म्हणणारा पुरुषवर्ग आणि ‘ट्युबलाइट बदलायचं काम पुरुषांचं.’ असं म्हणून अंधारात बसून राहणारी गृहिणी. दोघांनीही आपापल्या कामाचं डिपार्टमेंट ठरवून वाटणी करून टाकलेली असते. ऑफिसमध्येदेखील ‘हे काम माझं नाही.’ असं म्हणून कर्मचारी काम टाळून ते काम दुसऱ्यावर ढकलतात.

अगदी शाळेतही हा प्रकार पाहायला मिळतो. सातवीचा शिक्षकदेखील पाचवीचा वर्गावर तास घेताना कुरकुरतो. नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त काम करायची पाळी आली की काम टाळण्यासाठी सर्वसामान्य माणसं नियमावर बोट ठेवतात. पण अशा प्रकारे नियमानुसार काम करणारी सामान्य माणसं आयुष्यभर सामान्यच रहातात. कारण त्यांची वृत्ती संकुचित झालेली असते.

संकुचित वृत्तीची माणसं आयुष्यात कधीच मी आणि माझं या हद्दीपलीकडे जाऊन विचार करीत नाहीत. महापुरुषांच्या बाबतीत मात्र नेमका उलटा प्रकार असतो. तिथं केवळ मी आणि माझा असा खुरटलेला संकुचित विचार नसतो. तिथं ‘वसुधैव कुटुंबकम्’ असा व्यापक विचार असतो म्हणूनच तर ते महान ठरतात. एक संस्कृत श्लोक आठवला म्हणून सांगतो.

अयं निजः परो वेत्ती गणनां लघुचेतसाम्।
उदार चरितानाम् तु वसुधैव कुटुंबकम्।

अर्थ : हा माझा आणि हा परका असं केवळ संकुचित स्वभावाची माणसं म्हणतात. उदार अंतःकरणाच्या महापुरुषांसाठी तर संपूर्ण पृथ्वीच एक कुटुंब असतं.

जे जे देखिले भूत । ते ते मानिजे भगवंत’ असं म्हणणारेच खऱ्या अर्थानं संतत्त्वाला पोहोचतात.

संत नामदेवांनी महाराष्ट्राची हद्द ओलांडून पार पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका फडकावली. डॉक्टर कोटणीस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हिंदुस्थानची हद्द ओलांडून चक्क चीनमध्ये जाऊन तिथल्या रुग्णांची सेवा केली. सेवाव्रती मदर टेरेसांच्या बाबतीतही हाच प्रकार घडला. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. महान व्यक्ती स्थळ-काळाच्या सगळ्या मर्यादा ओलांडून केवढा उदार विचार करतात त्याचं उदाहरण पाहायचं असेल, तर उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं…! भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण ह्या नरकासुराच्या वधाची कारणंही तशीच आहेत.

नरकासुराचं मूळ नाव होतं भौमासूर त्याने आजूबाजूच्या शेकडो राजांची राज्य जबरदस्तीने बळकावली होती. त्यांच्या राण्यांना आपल्या जनानखान्यात कोंडलं होतं. केवळ राण्यांनाच नव्हे, तर राज्यातल्या इतर अनेक सुंदर तरुण स्त्रियांना जबरदस्तीने आपल्या वासनेची शिकार बनवलं होतं. एक दोन नव्हे, तर हजारो स्त्रियांचं आयुष्य त्याने नासवलं होतं. त्याचं राज्य म्हणजे नागरिकांसाठी एक जिवंत नरकच बनला होता म्हणून या भौमासूर नावाच्या राजाला नाव पडलं होतं ‘नरकासूर.’

या नरकासुराचं राज्य होतं कामरूप देश म्हणजे आजच्या काळातला आसाम, मेघालयच्या आसपासचा भूभाग. या कामरूप देशापासून भगवान श्रीकृष्णाची द्वारका शेकडो कोस दूर होती. नरकासुरानं द्वारकेकडे नजर वर करून पाहिलंही नव्हतं. त्या नरकासुराचं आणि भगवान श्रीकृष्णांचं काहीही वैर नव्हतं. पण तरीदेखील भगवंतानी आपल्या देशाची हद्द ओलांडली. नरकासुराच्या कामरूप देशावर आक्रमण केलं. नरकासुराचा वध केला आणि त्या सोळा हजार स्त्रियांची मुक्तता केली. पुढे त्या स्त्रियांना त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी, वडिलांनी, नवऱ्याने मुलांनी स्वीकारण्याचं नाकारल्यानंतर त्या स्त्रियांना भगवान श्रीकृष्णाने आपल्या नावाचा कृष्णमणी गळ्यात धारण करून ‘आजपासून तुम्ही माझं नाव लावा.’ असं सांगून त्या सोळा हजार स्त्रियांना समाजात मानाचं स्थान दिलं. त्यांचं पुनर्वसन करून वृंदावनात पहिला महिला आश्रम उभारला.

जरा विचार करा. काय गरज होती भगवान श्रीकृष्णांना द्वारकेची हद्द ओलांडून कोसो मैल दूर त्या देशात जायची…? माझ्या राज्यात सगळं व्यवस्थित चाललंय ना? मग मी कशाला त्या नरकासुराच्या राज्यात नाक खुपसू? असा मध्यमवर्गीय पांढरपेशेपणा त्यांनी केला नाही.

केवळ ‘मी आणि माझं ही संकुचित वृत्ती असणारी आपण सर्वसामान्य माणसं आपापली कार्यक्षेत्र ठरवतो. स्वतःभोवती एक कुंपण आखून घेतो. स्वतःच स्वतःची हद्द ठरवतो. त्या हद्दीच्या बाहेर पाऊल ठेवायला धजावत नाही. हद्दीची मर्यादा ओलांडून नवं काही करायची आपली वृत्ती नसते आणि म्हणूनच आपल्या आयुष्यालादेखील हद्द… म्हणजेच मर्यादा पडतात. कुंपणात जन्म होतो आणि मृत्यूही कुंपणात होतो. सामान्य म्हणून जन्माला येतो आणि सामान्य म्हणूनच मरून जातो. पण असामान्य माणसं अशा प्रकारे हद्द न ठरवता आपली कार्यक्षेत्र विस्तारत नेतात. स्वतःच्या कर्तृत्वाला मर्यादा घालत नाहीत.

म्हणूनच हद्दीची लक्ष्मणरेषा कधी पाळायची आणि हद्द ओलांडून सीमोल्लंघन कधी करायचं हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -