Friday, May 17, 2024

संतांचे ग्रंथ

  • अध्यात्म: ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

संतांचे ज्ञानच असे असते की, त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो. त्यांचा अर्थ संतांच्या कृपेवाचून कळणे कठीण आहे. वडिलांचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दांत आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते, तितपत पोथीतल्या शब्दांचा अर्थ आपल्याला सांगता येईल. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण, ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे, त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढूनताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. ग्रंथ वाचीत असताना आपली मते बाजूला ठेवावीत; एक अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले, तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही, म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा.

आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले, तर आपण त्यातले अक्षर अन् अक्षर वाचतो. तसे, ज्ञानेश्वरी, दासबोध, हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही यासाठी किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असे करणे योग्य नाही. खरे म्हणजे, संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक थोडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात; ‘मोठ्या संताचा ग्रंथ आहे’ म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात; आणि त्याहीपेक्षा, ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झालं म्हणणे केव्हाही अयोग्यच. म्हणूनच संतांच्या मनावर सुख-दुःखाचा परिणाम होत नाही.

संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक यांच्या नात्यागोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात, याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय. संत एकांतात जातात याचे कारण असे की, लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते, असे मुळीच नाही. पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात.

(कोणत्याही संताचा ग्रंथ वाचताना, तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचावा.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -