Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीबोगस क्लीन अप मार्शल? दंडाची रक्कम देण्यापूर्वी खातरजमा करून घ्या

बोगस क्लीन अप मार्शल? दंडाची रक्कम देण्यापूर्वी खातरजमा करून घ्या

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनामास्क फिरणा-या व्यक्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तिंवर कारवाईसाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शल यांना दंडाची रक्कम देण्यापूर्वी, क्लीन अप मार्शलनी गणवेष परिधान केलेला आहे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक नमूद केला आहे, याची खातरजमा केल्यानंतरच नागरिकांनी दंडाची रक्कम भरावी व पावती देखील घ्यावी. याअनुषंगाने कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुखपट्टी अर्थात मास्क लावून वावरणे प्रत्येकास बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास रुपये २०० इतका दंड देखील आकारला जातो. मुंबई महानगरामध्ये कोविड १९ विषाणू संसर्ग पुन्हा एकदा वाढीस लागला आहे. त्यामुळे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी विनामुखपट्टी अर्थात विनामास्क फिरणा-या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

जे नागरिक मास्क परिधान करणार नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी, प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी एक याप्रमाणे खासगी सुरक्षारक्षक क्लीन अप मार्शल संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांचे क्लीनअप मार्शल गणवेष परिधान केलेले असतात. या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व त्यांचा अनुक्रमांक लिहिलेला असतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा मास्क परिधान न करणे या प्रत्येक उल्लंघनाकरिता रुपये २०० याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाते. त्या दंडाची पावती देखील क्लीनअप मार्शल कडून संबंधित नागरिकास दिली जाते.

सबब, मुंबई महानगरातील नागरिकांना महापालिकेतर्फे आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारची कारवाई होत असताना, क्लीनअप मार्शल यांनी गणवेष परिधान केलेला असणे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक असणे, तसेच दंडाची पावती देणे या सर्व बाबी आवश्यक आहेत.

संबंधित नागरिकांनी दंडाची रक्कम क्लीनअप मार्शलकडे देण्यापूर्वी या सर्व बाबींची खातरजमा करावी. दंड भरल्यानंतर त्याची पावती आवर्जून घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -