Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनदेणे मराठी शाळेचे

देणे मराठी शाळेचे

  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? हा विषय या सदरांतून विविध संदर्भात चर्चिला गेला आहे. माझ्या एका तरुण प्राध्यापक सहकाऱ्याचे मला याबाबत विशेष कौतुक वाटले. आपल्या दोन्ही मुलींकरता त्याने मराठी माध्यम निवडले. खरे तर तुम्ही मुलांना कोणत्या माध्यमात घातले आहे किंवा पालक म्हणून काय ठरवताय, हा प्रश्न विचारणे मी केव्हाच सोडून दिले आहे. सरसकट इंग्रजी माध्यमाकडे झुकणारा मराठी भाषक पालकांचा कल हा मुद्दा माझ्यासारख्या मराठीकरता आग्रही असणाऱ्या कार्यकर्तीला वैफल्य आणणारा आहे.

पण अमोल भोसले या अगदी तरुण प्राध्यापकाने आपल्या मुलींकरता मराठी माध्यम निवडणे हा मुद्दा मला या विषयाच्या पार्श्वभूमीवर विशेष वाटला. मी त्याला म्हटले, ‘अरे वा, तुला का वाटला हा निर्णय घ्यावासा? त्यावर तो म्हणाला, ‘मी मराठी माध्यमातूनच शिकलोय ना. मग तसंच मुलांना मराठीतून शिकवणे हे अगदी स्वाभाविकपणे घडले.’ कविता, चित्र, अभिनय या सर्व कला त्याच्या दोन्ही मुलींमध्ये सहज रुजल्या आहेत. निर्मितीशीलता, अभिव्यक्ती, सर्जनशीलता या गोष्टींची रुजवात मुलांमध्ये मातृभाषेतून सहज होते. तसेच इतरांना समजून घेण्याची संवेदनशीलता वाढते.

उच्च मध्यम वर्ग व मध्यम वर्गातील पालक अनेकदा असे म्हणू लागले आहेत की, मराठी शाळेत भाजीवाले नि रिक्षावाल्यांची मुले येऊ लागली आहेत, त्यामुळे आमच्या मुलांना आम्ही पाठवू शकत नाही. म्हणजे या अशा भिंती आपणच आपल्या मुलांमध्ये निर्माण करायच्या. मग समाज कसा प्रवाही राहणार? तळागाळातील माणसांना समजून घेण्याची क्षमता आपण मुलांमधून संपवून टाकायची, हे क्रूर आहे. श्रीमंत वर्गातील मुलांनी त्यांच्याच वर्गातील मुलांशी मैत्री करायची? ही कुठली सवय आपण मुलांना लावतोय.

समाजातील या अशा भिंतींमुळेच आपण अजून वर्गांना जखडून आहोत. माझी मुलगी जे. जे. स्कूलमध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करत असताना मला म्हणाली, ‘आई, तू मला मराठी शाळेत शिकवलेस हे किती छान केलेस. गावागावांतून चित्रकलेचा अभ्यास करण्याकरता आलेली मुले त्यांचे प्रश्न, अडचणी सहज सांगतात नि त्या सोडवण्याकरता काय करायचं, हे आम्ही मिळून ठरवतो. तसंच परदेशातली नि परराज्यातील मुले देखील आमच्याकडे आहेत, त्यांच्याशी देखील संवादाचा आत्मविश्वास माझ्यात आहेच. मराठी शाळा मुलांना काय देते? याचे उत्तरच मला तिच्या उद्गारांतून मिळाले.

मराठी शाळा मुलांना समाजाशी जोडून ठेवते. माणसांचे चेहरे वाचायला शिकवते. समाजाच्या प्रश्नांचा अर्थ उलगडायला मदत करते. आणि विश्वाच्या अवकाशात उभे राहण्याचे सामर्थ्यही देते. हे केवळ भावनिक मनोगत नव्हे, मराठी शाळेत शिकलेल्या हजारो मुलांनी हे सिद्ध केले आहे. पण हे मायभाषेचे देणे समजून घ्यायला आपल्याला वेळ आहे का?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -