Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीविधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपची बाजी

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपची बाजी

नागपुरात बावनकुळे तर अकोल्यात खंडेलवाल विजयी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांपैकी चार जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर मात केली आहे. नागपूरमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेतर अकोला-वाशिम-बुलडाणामधून वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला. सहा जागांपैकी चार जागांची निवड बिनविरोध झाली होती. त्यातील दोन जागा भाजपाने जिंकल्या होत्या. ज्या दोन जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले त्या दोन्ही जागा भाजपानेच जिंकल्या.

नागपूरमध्ये काँग्रेसने भाजपाचे नगरसेवक रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. परंतु भाजपाचे नेते आणि तेथील उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे भोयर यांच्यावर सहज मात करतील हे लक्षात आल्यावर मतदानाला काही तासांचा अवधी असताना काँग्रेसने आपला पाठिंबा अपक्ष उणेदवार मंगेश देशमुख यांना जाहीर केला आणि भोयर यांना वाऱ्यावर सोडले. काँग्रेसच्या या धोरणामुळे महाविकास आघाडीतले त्यांचे मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्याबरोबर फरफटत गेले. त्यामुळे लढत बावनकुळे आणि देशमुख यांच्यात झाली आणि बावनकुळे यांनी अधिकची ६० मते मिळवत घसघशीत विजय मिळवला. याशिवाय भाजपाची ३१८ मतेही त्यांच्याकडेच राहिली. भोयर यांना अवघे एक मत मिळाले.

अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया रिंगणात होते. ते येथून तीन वेळा निवडून आले होते. परंतु या सरळ लढतीत भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी ४३८ मते मिळवत बाजोरिया यांना धूळ चारली. त्यांना ३२८ मते मिळाली.
याआधी कोल्हापूर, मुंबई आणि धुळे-नंदुरबार या मतदारसंघातून अनुक्रमे सतेज पाटील (काँग्रेस), राजहंस सिंह (भाजपा), सुनील शिंदे (शिवसेना) आणि अमरीश पटेल (भाजपा) बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकांच्या आधीच शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून आल्या होत्या. विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यावयाची ही जागा होती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -