Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीभाजप पदाधिकाऱ्याकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण

भाजप पदाधिकाऱ्याकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण

दोषींवर कारवाईची आमदार रोहित पवार यांची मागणी

पुणे : भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेल्या आक्रमक आंदोलनाची जोरदार चर्चा झाली. या आंदोलनात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उचलल्याने मोठा वादही रंगला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे,’ असे म्हणत रोहित पवार यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून रोहित पवार यांनी राज्य पातळीवरील भाजप नेत्यांनाही लक्ष्य केले आहे. ‘चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारे आहे,’ असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला आहे, आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -