Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीBilkis Bano : सुप्रीम कोर्टाच्या सकारात्मक निर्णयानंतर बिल्कीस बानो यांची प्रतिक्रिया

Bilkis Bano : सुप्रीम कोर्टाच्या सकारात्मक निर्णयानंतर बिल्कीस बानो यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालय आणि समर्थकांचे मानले आभार

नवी दिल्ली : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि २००२ च्या गुजरात दंगलीत तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या (Bilkis Bano Case) करणाऱ्या ११ आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने (Gujrat Government) घेतला होता. मात्र, या प्रकरणी खुद्द बिल्कीस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) धाव घेतली. त्यासह काही जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. दोषींच्या शिक्षेच्या माफीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत गुजरात सरकारला न्यायालयाने झटका दिला. गुजरात सरकारला शिक्षा माफ करण्याचा अधिकार नव्हता असं म्हणत न्यायालयाने दोषींच्या शिक्षामाफीचा निर्णय रद्द केला. काल या प्रकरणी सुनावणी पार पडली.

इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सकारात्मक निर्णय मिळाल्याने बिल्कीस बानो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “आज खरोखरच माझ्यासाठी नवीन वर्ष आहे. माझ्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू आहेत. गेल्या दीड वर्षांत मी पहिल्यांदाच हसले आहे. निकाल लागल्यानंतर मी माझ्या मुलांना मिठी मारली. माझ्या मनावरचं मोठं दडपण दूर झालंय, आता जीव भांड्यात पडला आहे आणि मी मोकळा श्वास घेऊ शकते आहे”, या आशयाचं वक्तव्य बिल्किस बानो यांनी केलं. तसंच, “माझ्यासाठी हाच न्याय वाटतो. मला, माझ्या मुलांना आणि स्त्रियांना समान न्याय देण्याच्या वचनाची आशा दिल्याबद्दल मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते”, असंही त्या म्हणाल्या.

माझ्यासारख्या महिलेचा प्रवास…

बिल्किस बानोच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्यांचेही त्यांनी आभार मानले. ती म्हणाली, “मी आधीही म्हणाले होते आणि आज पुन्हा सांगते, माझ्यासारख्या महिलेचा प्रवास एकट्याने कधीच होऊ शकत नाही. माझे पती आणि माझी मुले माझ्यासोबत आहेत. या द्वेषाच्या काळात मला माझ्या मित्रांनी खूप प्रेम दिलं आणि या कठीण काळात माझ्यासोबत ते उभे राहिले. माझ्याकडे एक अधिवक्ता शोभा गुप्ता या असाधारण वकील आहेत. त्या २० वर्षांहून अधिक काळ माझ्यासोबत राहिल्या.”

“दीड वर्षापूर्वी, १५ ऑगस्ट २०२२ रोजी ज्यांनी माझे कुटुंब उद्ध्वस्त केले होते आणि माझ्या अस्तित्वाला धक्का पोहोचवला होता, त्या आरोपींना सोडून देण्यात आलं होतं. तेव्हा मी पूर्णपणे कोसळले होते. मला वाटलं की आता माझं धैर्य संपलं आहे. पण अनेकांनी मला सहकार्य केलं. भारतातील हजारो सामान्य लोक आणि महिला पुढे आल्या. या महिला माझ्यासोबत उभे राहिल्या, माझ्या बाजूने बोलल्या आणि सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली”, असंही बानो म्हणाल्या.

सर्वांसमोर कायदा समान

“देशभरातून सहा हजार लोकांनी आणि मुंबईतील ८ हजार ५०० लोकांनी अपील लिहिली; १० हजार लोकांनी खुले पत्र लिहिले. तसेच कर्नाटकातील २९ जिल्ह्यांतील ४० हजार लोकांनी पत्र लिहिले. या प्रत्येक लोकांसाठी, तुमच्या मौल्यवान एकता आणि सामर्थ्याबद्दल मी खूप आभार मानते. फक्त माझ्यासाठीच नाही तर भारतातील प्रत्येक स्त्रीला न्याय मिळवून देण्याची, संघर्ष करण्याची इच्छाशक्ती तुम्ही मला दिली. मी आपली आभारी आहे. माझ्या स्वतःच्या आणि मुलांच्या आयुष्यासाठी या निकाला महत्त्वपूर्ण आहे. आज माझ्या हृदयातून निघणारी प्रार्थना सोपी आहे, सर्वांसमोर कायदा समान आहे”, असंही बानो म्हणाल्या.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -