Friday, May 17, 2024
Homeकोकणरायगडअनोळखी कॉलपासून सावध रहा; अलिबागच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन

अनोळखी कॉलपासून सावध रहा; अलिबागच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन

अलिबाग (वार्ताहर) : अनोळखी महिलेकडून व्हीडिओ कॉल करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार जिल्ह्यात वाढू लागला आहे. अनेक तरुण याला बळी पडत असून, बदनामी होऊ नये, फसवणूक झाल्यानंतर भीतीपोटी मागणीनुसार त्या व्यक्तींना गुगल पे, फोनपे द्वारे रक्कम पाठविली जाते. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचा धोका वाढण्याची भीती जिल्ह्यात सुरु झाली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेष करुन तरुणांनी अनोळखी व्हीडिओ, ऑडीओ कॉलपासून सावध रहावे. अनोळखी कॉल रिसीव्ह करू नये, काळजी घ्यावी असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी केले आहे. बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल उपलब्ध आहेत. मोबाइलशिवाय एक क्षणही राहू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लहान मुले रडत असली, तर त्याला शांत करण्यासाठी त्या मुलांच्या हातात मोबाईल दिले जाते. लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळीच्या करमणुकीचे साधन मोबाईल बनले आहे. मोबाईलमध्ये वेगवेगळे अॅप असून, त्यात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचाच फायदा घेत काही मंडळीकडून ऑनलाईन फसवणूक जिल्ह्यात वाढू लागली आहे. आर्थिक लूट करण्यासाठी कधी कॉल करून लॉटरी लागण्याचे अमिष दाखविले जाते, तर कधी एखाद्या महिलेमार्फत व्हीडिओ कॉल केले जातात.

कधी क्राईम ब्रँचमधून बोलतो असे सांगून फसविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात काही तरुण बळी पडून कधी गुगल पे, फोन पेद्वारे संबंधित व्यक्तींना मागणीनुसार रक्कम पाठवितात. यातून या तरुणांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबिल्या असून, यामध्ये आता हनी ट्रॅपचाही समावेश करण्यात आला आहे. अनोळखी मोबाईलवरून एखादी महिला व्हीडिओ कॉल करून जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करते. यास अनेक तरुण बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून २५ ते ३८ वयोगटातील तरुण मंडळींना एका महिलेमार्फत व्हीडिओ कॉल केला जात आहे. त्यानंतर सोशल मीडियावर तो व्हीडिओ व्हायरल करून धमकी दिली जात आहे.

व्हीडिओ बंद करण्यासाठी काही रक्कम `गुगल पे करा’ असे सांगितले जात आहे. त्यानंतर अन्य राज्यातून क्राईम ब्रँचमधून अधिकाऱ्यांचा फोन येतो. त्यांच्याकडूनही धमकावून शिक्षा लागण्याची धमकी दिली जाते. या प्रकारामुळे बदनामी होऊ नये यासाठी अनेक तरुण त्यांच्या मागणीनुसार रक्कम गुगल पे द्वारे पाठवित देखील आहेत. मानसिक व आर्थिकदृष्ट्या होणाऱ्या या फसवणुकीची तक्रार करण्यास देखील काही तरुण स्थानिक पोलीस ठाण्यात जाण्यास धास्तावत आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या या प्रकारामुळे अनेकवेळा भीतीपोटी मानसिकदृष्ट्या खचून काही तरुण आत्महत्यादेखील करण्याच्या मार्गावर असतात. वेगवेगळ्या राज्यातील देशातील ही मंडळी असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचताना पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मोबाईलचा वापर करणारे, विशेष करून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे असून, कोणत्याही अनोळखी व्यक्तीचे कॉल रिसिव्ह करू नये. या कॉलपासून सावध राहा असेही आवाहन दुधे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -