Monday, May 5, 2025

पालघर

सफाळे रेल्वे फाटक केले कायमचे बंद...!

सफाळे रेल्वे फाटक केले कायमचे बंद...!

गावातील नागरिकांना बाजारपेठा, गावाशी संपर्क साधण्यासाठी हाल

पर्यायी पादचारी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांची मागणी

सफाळे: सफाळेतील पुर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या सरतोडी भागातील रेल्वे उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन ३० मार्च रोजी निर्सगवासी काळूराम धोधडे उड्डाणपूल या नावाने नामकरण करून उद्घाटन करून वाहतुकीस खुला करण्यात आला. यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सफाळे स्थानकाजवळ फाटक क्रमांक ४२ हे मंगळवार १ एप्रिलपासून कायमचे बंद करण्यात आले. येथील ५० हजाराहून अधिक लोकवस्ती असलेल्या गावातील नागरिकांना बाजारपेठ व गावाशी संपर्क साधण्यासाठी आणि रेल्वे गाड्या पकडण्यासाठी अतोनात हाल झाले. येथील ग्रामस्थांकडून सबवेची तसेच अन्य पर्यायी मार्गाची उभारणी करून मगच फाटक कायमचे बंद करण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र, त्याकडे संबंधित यंत्रणेने केराची टोपली दाखवल्याने प्रवाशांना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेच्या अस्तित्वात असणाऱ्या दोन लाईनच्या विस्तारीकरण प्रकल्प सुरू असून समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग व उपनगरीय क्षेत्राचे चौपदरीकरण या कामामुळे आगामी काळात सहा रेल्वे लाईन कार्यरत होणार आहेत. सफाळे गाव व बाजारपेठ ही विद्यमान रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला वसलेली असून सफाळे पश्चिमेकडे असणाऱ्या किमान ५० हजार लोकवस्तीला बाजारपेठ व गावाशी संपर्क ठेवण्यासाठी लेव्हल क्रॉसिंग नंबर ४२ हाच पर्याय उपलब्ध होता. मात्र सफाळे रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेच्या बाजूला उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन ३० मार्च रोजी तो कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर तत्काळ १ एप्रिल रोजी सफाळे स्थानकाजवळील फाटक क्रमांक ४२ लागलीच कायमचे बंद करण्यात आले.

दरम्यान रविवार १६ मार्च रोजी विद्यमान खासदार डॉ हेमंत सवरा यांच्या हस्ते पूर्व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र तो पूर्ण होण्यास बराच विलंब आहे. उड्डाणपुलामुळे पूर्व पश्चिम वाहतूक सुरू झाली असली तरी आता प्रवाशांना मात्र काही मीटरच्या अंतरातही एक ते दीड किलोमीटरचा वळसा घालून बाजारपेठ, बँका, पतसंस्था, शाळा कॉलेजमध्ये जाण्याची वेळ ओढवली आहे.

पश्चिमेकडील दहा ते बारा गावातील वाहनचालकांना पूर्व पश्चिम वाहतूक करण्यास नव्या उड्डाणपूलाचा फायदा होणार असला तरी रेल्वे फाटक कायमचे बंद केल्याने पहाटे भरणारा बाजार, दैनंदिन तसेच आठवडा बाजारातील खरेदीसाठी येणारे गोरगरीब नागरिक, दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी, वृद्ध, विकलांग व्यक्ती बँक, पतपेढ्या, शासकीय कार्यालयात जाणारे आदीचे मात्र मोठे हाल होत आहेत. त्यामुळे पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना सबवे किंवा अन्य पर्यायी व्यवस्था रेल्वे प्रशासनाने करण्याची मागणी धुळखातच आहे.

स्थानकाच्या पुर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी एकमेव पुल उपलब्ध आहे. त्यावरून जाताना सर्वसामान्य व्यक्तींची दमछाक होते. आता त्यात वयोवृद्ध व्यक्ती, रुग्ण, भाजीविक्रेते, मासळी विक्रेते यांचे देखील भयंकर हाल होत असून गाड्या चुकण्याचे प्रकार घडत आहेत. एकंदरीतच रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांच्या आणि पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून न घेता पूर्व-पश्चिम भागाला जोडणारे रेल्वे फाटक तडकाफडकी बंद करून सफाळे परिसरातील नागरिकांशी दुजाभाव केल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment