Sunday, May 4, 2025

कोकणताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरत्नागिरी

Kokan Cashew Industry : कोकणात काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन

Kokan Cashew Industry : कोकणात काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन

दापोली : कोकणातील काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन करणे तसेच काजू प्रक्रियादार, उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आणि कोकणात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी ‘सीसीआयएफ’ या संस्थेने दापोली येथे मंथन बैठक आयोजित केली होती. या संस्थेच्या पुढाकाराने काजू उत्पादक, प्रक्रियादार यांच्या समस्या समजावून घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांमध्ये उद्यमशीलता वाढीसाठी कोकण कृषी विद्यापीठासोबत कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशनने नुकताच सामंजस्य करार केला आहे.

कोकणातील काजू उत्पादकांची सद्यस्थिती अडचणी दीर्घकालीन उपाययोजना यावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शास्त्रज्ञ प्रदीप हळदवणेकर, काजू प्रक्रिया आणि मूल्यसाखळी सल्लागार विवेक अत्रे, काजू प्रक्रिया क्लस्टर उद्योजक जयवंत ऊर्फ दादा विचारे काजू फेडरेशनचे धनंजय यादव यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत कार्डियन करेक्ट संस्थेचे रवींद्र अमृतकर आणि सहकार भारतीचे शैलेश दरगुडे सहभागी झाले होते. सहकारी शेतकरी उत्पादक संस्था आणि विविध कार्यकारी सोसायट्यांना बळकटी देऊन या समस्येवर तोडगा काढता येईल, असे शैलेश दरगुडे यांनी मत मांडले.

कोकणात रोजगार वाढीच्या संधीमध्ये वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंद असलेले छोट्या मोठ्या क्षमतेचे काजू प्रक्रिया युनिटस् पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक आहे. काजू प्रक्रिया करणाऱ्या लघुउद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषीमंत्री, पणनमंत्री, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, विभागीय आयुक्त कोकण यांच्यासमवेत धोरण निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.

Comments
Add Comment