ठाणे : अडीच वर्षांची कारकिर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचे पर्व आहे. अडीच वर्ष दिवस रात्रं काम करून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक शिवसेनेत येत आहेत. आता कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी ही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘एकनाथ पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.
Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारणार स्वतंत्र पोलीस चौकी
शिवसेनेकडून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्षांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा ‘एकनाथ पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात एवढं मोठ पद मिळाले, मानसन्मान मिळाला पण काही विघ्नसंतोषी लोकांना हे पचले नाही. त्यांना ध्यानीमनी एकनाथ शिंदेची आठवण येते, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही, तर लोकांच्या सेवेत रमणारा आहे. कितीही टीका केली तरी यापुढे काम करत राहणार, असे शिंदे म्हणाले. कोविड होता तेव्हा काहीजण घरात हात धुवत बसले होते. आपण मात्र जीवाची पर्वा न करता पीपीई कीट घालून रुग्णांना धीर देण्याचे काम केले. अडीच वर्षांतील कामाची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतली, असे ते म्हणाले.
ठाण्यात आपण वाढलो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता ठाणे बदलतंय. अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात साकारले जात आहेत. ठाण्याचे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करताना रक्ताचे पाणी केले. या काळात इर्शाळगडावरील बचाव कार्य, कोल्हापूरचा पूर, चिपळूणमधील पूर आणि बचाव कार्याच्या आठवणी शिंदे यांनी यावेळी काढल्या. जे बोललो ते करुन दाखवले. अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात रोख रक्कम जमा केली. लाडकी बहिणी योजना कधीच बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.