
अदानींच्या मुद्यावरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज, सोमवारी सुरुवात झाली. यावेळी विरोधकांनी गौतम अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज आधी ११: ४५ वाजेपर्यंत आणि त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली, परंतु राज्यसभा अध्यक्षांनी नियमांचा हवाला देत त्यास परवानगी दिली नाही. गदारोळामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज ११: ४५ वाजेपर्यंत तहकूब केले.राज्यसभेचे कामकाज ११: ४५ वाजता पुन्हा सुरू झाले, मात्र विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. यावर नाराजी व्यक्त करत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. संविधान दिनानिमित्त उद्या, मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू राहणार नाही. त्यामुळे बुधवारी पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू होणार आहे.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या(Maharashtra assembly election 2024) निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नवीन सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार ...
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, नियमानुसार विषय मांडण्यात येतील, असे आश्वासन सरकारच्या वतीने बैठकीत देण्यात आले होते. परंतु, विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे पहिल्याच दिवशी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्याचा प्रसंग ओढावला.