Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Rajesh Tope Car : राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड का केली?

Rajesh Tope Car : राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड का केली?

जालना : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर आज अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. जालना (Jalana) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली टोपे यांची गाडी पार्क केलेली असताना या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात गाडीची समोरची काच फुटली. गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली.

हल्ल्यावेळी टोपे यांचा चालक गाडीमध्येच उपस्थित होता. शिवाय चार ते पाच जणांच्या टोळक्याने गाडीवर दगडफेक केल्याचे त्याने सांगितले. हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.

जालन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानिमित्ताने राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. त्याचवेळी त्यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी असताना गाडीच्या समोरील भागावर दगडफेक करण्यात आली. राजेश टोपे यांच्या गाडीवर नेमका कुणी हल्ला केला हे अद्याप समोर आलेलं नाही.

मराठा आरक्षणासारख्या (Maratha reservation) धगधगत्या मुद्दयामुळे मराठवाडा आणि विशेषतः जालना जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. जालन्यात सध्या जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यावेळीच राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोहोचून पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment