
- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
मंजरी फडणीस सुंदर, आकर्षक रूप, हिंदी चित्रपटसृष्टीच्या ग्लॅमरस दुनियेत टॉपवर राहूनदेखील जमिनीवर पाय असणारी व तेलुगू, तमिळ, कन्नड, बंगाली, मराठी चित्रपटात काम केलेली अभिनेत्री. सतत चांगले काम करण्याची इच्छा मनी बाळगणारी, लाघवी स्वभावाची अशी अभिनेत्री आहे.
तिचे वडील आर्मीत होते. घरात कडक शिस्त होती. दर तीन वर्षांनी त्यांची बदली होत असे. त्यामुळे कुटुंबाचे स्थलांतर होत असे. तिचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळजवळील सागर येथे झाला. नागालँड, शिमला, जम्मू, दिल्ली, मुंबई असा तिचा बालपणी प्रवास झाला. तीन वर्षांची असतानापासून तिला रंगभूमीची आवड निर्माण झाली. तिला रंगमंचावर वावरायला आवडत असे. मुंबईच्या फोर्टमधील सेंट ॲन्स हायस्कूलमध्ये तिचे इ. ८ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण झाले. शाळेतील यलो हाऊसमध्ये ती होती. त्यांच्यात झालेल्या अभिनयाच्या स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले होते. अभ्यासात ती हुशार होती. मोठेपणी मानसोपचारतज्ज्ञ झाली असती.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. अकरावीत असताना कॉलेजच्या फॅशन शोमध्ये तिने भाग घेतला होता. हळूहळू तिला अभिनयामध्ये करिअर करावसे वाटले. आशीष भूयान सरांकडून तिने अभिनयाचे धडे गिरविले. १२ वीनंतर तिने आई-वडिलांकडे हट्ट करून अभिनयाच्या करिअरसाठी मुंबई गाठली. मॉडेल कोऑर्डिनेटर व काही प्रोडक्शन हाऊसला तिने तिचे फोटो दिले.
त्यानंतर एका आठवड्याच्या आत तिला एका हिंदी चित्रपटासाठी ऑडिशन्ससाठी फोन आला. तिने ऑडिशन्स दिली व तो चित्रपट तिला मिळालादेखील. त्या हिंदी चित्रपटाचे नाव होते ‘रोक सके तो रोक लो.’ त्या चित्रपटात शाळेत जाणाऱ्या मुलीची भूमिका होती. त्यात अभिनेता सनी देओल विशेष भूमिकेत होता. हा चित्रपट काही चालला नाही. त्यानंतर तिने फालतू हा बंगाली चित्रपट केला.
त्यानंतर तिच्या आयुष्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आला. तिने एका चित्रपटासाठी ऑडिशन्स दिली. जवळजवळ दीड वर्षे झाली; परंतु पुढे त्याचे काहीच झाले नाही. तिने कास्टिंग डायरेक्टरला त्या चित्रपटाविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली, “तो चित्रपट बंद झाला; परंतु आमिर खान एक चित्रपट निर्माण करीत आहे. त्यात एक भूमिका आहे. त्यासाठी प्रयत्न कर.” तिने त्यासाठी ऑडिशन्स दिली. त्या एका भूमिकेसाठी ४०० मुलींनी ऑडिशन्स दिली होती. मोठ्या चतुराईने तिची ऑडिशन दिग्दर्शकाला दाखविली गेली व तिची निवड त्या चित्रपटासाठी झाली व चित्रपटाचे नाव होते ‘जाने तू या जाने ना’ यातील गाणी लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर मिळालेल्या यशाबद्दल व एकूणच आलेल्या अनुभवाबद्दल मंजरीला विचारले असता ती म्हणाली, “हा चित्रपट ४ जुलै २००८ ला रिलीज झाला. त्यावेळी मी बँकॉकला एका तेलगू चित्रपटाचे शूटिंग करीत होते. त्यावेळी माझ्या मोबाइलमध्ये रेंजचा प्रॉब्लेम झाला होता. एक आठवडाभर माझा फोन सुरू नव्हता. मी त्याकडे लक्ष दिले नाही. मी माझ्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. एका आठवड्यानंतर मी मुंबईला एअरपोर्टवर पोहोचले. तेव्हा माझ्या लक्षात आले की सगळेजण माझ्याकडेच पाहत होते. त्यांनी त्या चित्रपटातील मेघना मीच आहे हे ओळखले होते. वर्तमानपत्रात माझ्यावर लेख लिहिले गेले, ते मी वाचले. महाराष्ट्र टाइम्सचा ‘टॅलेंट ऑफ दी ईयर’ हा अॅवॉर्ड मला मिळाला. स्टारडस्टचा बेस्ट परफॉर्मन्सचा अॅवॉर्ड मिळाला. एका रात्रीत मला सगळेजण ओळखू लागले होते. अभिनेता आमिर खानने देखील माझ्या कामाचे कौतुक केले. त्यांनी वॉल्ट डिस्नेच्या ‘डोको मोनो’ चित्रपटासाठी माझी शिफारस केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अब्बास टायरवाला यांच्याकडून मी भरपूर गोष्टी शिकल्या. ते चांगला अभिनय करून दाखवतात. एकूणच त्या चित्रपटाचं प्रोडक्शन हाऊस खूपच चांगलं होत.”
त्यानंतर मंजरीची अभिनयाची गाडी सुस्साट वेगाने धावू लागली. सिद्धू सिकाकुलम हा तेलगू चित्रपट केला. नंतर मुथिराई हा तमीळ चित्रपट तिने केला. या चित्रपटासाठी तिने गाणेदेखील गायले. त्यानंतर तिने निर्माता दिग्दर्शक इंद्रकुमारचा ‘ग्रँड मस्ती’ चित्रपट केला. नंतर अनुभव सिन्हाचा ‘वॉर्निंग’ चित्रपट केला. तिची ‘बारोट हाऊस’ हा चित्रपट खूप गाजला. त्यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. नंतर ‘अदृश्य’ या मराठी चित्रपटात तिने आंधळ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. सस्पेन्स थ्रिलर हा चित्रपट अल्ट्रा झकास ओटीटीवर पहायला मिळेल. दहा वर्षांपूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीरलाल यांनी मंजरीची एका चित्रपटासाठी ऑडिशन्स घेतली होती; परंतु तो चित्रपट काही निर्माण झाला नाही. त्यावेळी दिग्दर्शक कबीरलाल यांनी मंजरीला आश्वासन दिले की, जेव्हा केव्हा ते चित्रपट करतील, तेव्हा ते तिला संधी देतील.
दहा वर्षांनंतर त्यांनी लक्षात ठेऊन तिला ‘अदृश्य’मध्ये संधी दिली. या गोष्टीचं तिला खूप अप्रूप वाटलं. तिच्या आयुष्यातील सर्वात चांगली भूमिका या चित्रपटामुळे तिला मिळाली. याबद्दल ती दिग्दर्शक कबीरलाल यांची सदैव ऋणी राहणे पसंत करते.
त्यानंतर तिचे मासूम, ये दुरियाँ या वेबसीरिज आल्या. ‘मिया, बिवी और मर्डर’ ही वेबसीरिज आली. दि फ्रीलान्सर ही तिची वेबसीरिज डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झालेली आहे. ‘चलती रहे जिंदगी’ व ‘पुणे हायवे’ हे तिचे आगामी चित्रपट आहेत. आजही ती भविष्यात चांगले काम करण्याची इच्छा बाळगून आहे.