
मुंबई: आपल्या पत्नीला धक्का लागल्याने पतीने केलेल्या मारहाणीत एका प्रवाशाचा मृत्यू (passenger death) झाल्याची घटना शीव (sion) स्थानकात घडली. मारहाणीदरम्यान हा प्रवासी रेल्वे रुळावर पडला. याच वेळेस रेल्वेची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दिनेश राठोड असे या मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अविनाश माने आणि शीतल माने या दोघा नवराबायकोला अटक केली. मुंबईच्या शीव येथील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या जिन्यावरून हे माने नवराबायको प्लॅटफॉर्मवर उतरत होते. त्याचवेळेस दिनेश राठोड(वय २६)चा धक्का शीतल माने यांना लागला. धक्का लागल्याने रागाने शीतल यांनी दिनेशला मारण्यास सुरूवात केली.
धक्का दिल्याच्या रागात केली मारहाण
बायकोला धक्का दिल्याने रागाच्या भरात अविनाश यांनीही दिनेशला मारण्यास सुरूवात केली. दरम्यान, त्याचवेळी दिनेशचा तोल जाऊन तो रेल्वे रूळावर पडला. याचवेळी समोर येणाऱ्या धीम्या लोकलने त्याला धडक दिली. रेल्वेच्या या धडकेत तरूणाचा मृत्यू झाला. दिनेश हा नवी मुंबईच्या घणसोली भागात राहात होता. तो बेस्टमध्ये कामाला होता अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, हे सर्व प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अविनाश आणि शीतल माने यांना अटक केली आहे.